वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
देशांतर्गत पुरवठा साखळ्या मजबूत करण्यासाठी आर्थिक राष्ट्रवादाचा अवलंब करावा असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे फिक्कीच्या 98 व्या स्थापना दिनाच्या समारंभात आवाहन
प्रविष्टि तिथि:
07 APR 2025 10:02PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारतीय उद्योगांना किरकोळ स्वस्त आयातीचा पर्याय निवडण्याऐवजी देशातील पुरवठादारांना पाठबळ देत आर्थिक राष्ट्रवादाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईत भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ अर्थात फिक्कीच्या (Federation of Indian Chambers of Commerce & Industry - FICCI) 98 व्या स्थापना दिनानिमीत्त झालेल्या समारंभाला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी संबोधित केले. आपल्या संबोधनात त्यांनी उपस्थितांना महात्मा गांधी यांच्या राष्ट्रवादी विचारांचा दाखला दिला. भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील आघाडीच्या दिग्गजांनी, अल्प मुदतीच्या काळात परदेशी पर्याय अधिक किफायतशीर वाटत असले तरी देखील त्यांच्याऐवजी देशांतर्गत मूल्य साखळ्यांना प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले. यानिमित्ताने गोयल यांनी जपान आणि कोरियाचे उदाहरणही मांडले. या दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार विषयक करार असूनही, तिथले देशांतर्गत उद्योग हे सामूहिक जाणिवेच्या भावनेतून सातत्याने आपल्या स्थानिक पुरवठादारांनाच पाठबळ देत असल्याचे गोयल यांनी सांगितले.
सद्यस्थितीत जागतिक व्यापार विषयक पद्धतींमध्ये बदल होत आहेत, आणि अशा काळात भारत स्वतःला उत्पादनाचे केंद्र या नात्याने एक व्यवहार्य पर्याय म्हणून स्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याच्या पार्श्वभूमीर पियुष गोयल यांनी हे महत्वाचे वक्तव्य केले आहे. सद्यस्थितीत जगभरात भू-राजकीय अस्थिरता कायम असूनही, कायद्याचे राज्य, भेदभावरहित धोरणे आणि 1.4 अब्ज ग्राहकांची देशांतर्गत बाजारपेठ अशा घटकांमुळे भारत हा जगासाठीचा एक आकर्षक पर्याय असल्याचेही गोयल यावेळी म्हणाले.
SZUQ.jpeg)
युरोपियन मुक्त व्यापार संघटनेने भारताला तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यासह 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याप्रति वचनबद्धता दर्शवली असल्याचेही गोयल यांनी यावेळी सांगितले. ऑस्ट्रेलिया, युरोपीयन महासंघ (European Union - EU), यूके, अमेरिका, चिली आणि पेरू यांच्यासोबतच्या व्यापार विषयक करारांच्या प्रगतीची माहितीही गोयल यांनी दिली. देशांतर्गत उद्योग क्षेत्राने या मुक्त व्यापार विषयक करारांचा (Free Trade Agreements - FTAs) लाभ घेतला पाहीजे असे आवाहनही पियुष गोयल यांनी केले.
आपण सगळ्यांनी आगामी काही वर्षांत भारताला जगाच्या पटलावर महत्वाचे स्थान देण्यासाठी भारतात गुंतवणूक करण्याचा सामुहिक संकल्प करू या, आपण भारताला जगात सर्वोत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक करू या असे आवाहन गोयल यांनी आपल्या संबोधनाच्या समारोपात केले.

यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते फिक्कीच्या माजी अध्यक्षांचा सत्कारही केला गेला. यावेळी फिक्कीचे अध्यक्ष हर्ष वर्धन अग्रवाल यांनी फिक्कीच्या इतिहासाचा मागोवा घेतला आणि संस्थेच्या महत्त्वाच्या उपक्रमांविषयी उपस्थितांना माहिती दिली.
***
JPS/TP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2119941)
आगंतुक पटल : 29
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English