अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महसूल गुप्तचर संचालनालयाने धुळे जिल्ह्यात 9.49 एकर बेकायदेशीररित्या लागवड केलेली गांजा पीक केली नष्ट


महसूल गुप्तचर संचालनालयाची अंमली पदार्थ तस्करांविरोधातील कारवाईने नशा मुक्त भारत मोहिमेला बळकटी

प्रविष्टि तिथि: 03 APR 2025 3:20PM by PIB Mumbai

मुंबई, 3 एप्रिल 2025

 

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (Directorate of Revenue Intelligence - DRI) मुंबई शाखेने पुणे आणि नागपूर मधील प्रादेशिक पथकांच्या मदतीने धुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर गांजा लागवडीविरोधात मोठी कारवाई केली. संचालनालयाला मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे तपास केला असता संचालनालयाच्या अधिकार्‍यांना महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील खामखेडा आंबे आणि रोहिणी या गावांमध्ये बेकायदेशीर गांजा लागवड केली जात असल्याचे आढळून आले होते.

त्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी मध्य प्रदेश - महाराष्ट्र सीमेवर असलेल्या दुर्गम भागाचे निरीक्षण करून संशयित ठिकाणे निश्चित केली आणि, संबंधित जिल्हा प्रशासन आणि न्यायिक दंडाधिकाऱ्यांशी समन्वय साधला. या अधिकाऱ्यांनी न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केलेल्या कारवाईत 7 ठिकाणी, एकूण 9.493 एकर क्षेत्रावर बेकायदेशीर गांजा लागवड होत असल्याचे आढळून आले. या ठिकाणी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून उत्पादनवाढीवर भर दिला गेला होता, यावरून ही अत्यंत सुनियोजित बेकायदेशीर लागवड असल्याचेही स्पष्ट झाले. याशिवाय, या शेतांमध्ये भरलेली गोणपाटातील सुकवलेला गांजा देखील आढळून आला. त्यानंतर न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणाचे मोजमाप करण्यात आले आणि जिओ-टॅग केलेले छायाचित्रण केले गेले.

त्यानंतर, जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सर्व 7 ठिकाणांचे जमीन अभिलेखही तपासण्यात आले. तपासणीअंती या जमिनी बेकायदेशीरपणे अतिक्रमित करून गांजाच्या लागवडीसाठी वापरण्यात आल्याचेही निष्पन्न झाले. त्यानुसार, अंमली पदार्थ आणि नशायुक्त घटक कायद्याच्या (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act) कलम 48 अंतर्गत या बेकायदेशीर लागवडीवरील मालमत्तेवर जप्ती आणि नष्ट करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली.

या कारवाईअंतर्गत एकूण 9.493 एकर क्षेत्रावर लावण्यात आलेली 96,049 गांजाची रोपे उपटून नष्ट करण्यात आली. तसेच, शेतात आढळून आलेल्या गोणपाटांमध्ये भरलेला 420.39 किलो गांजा जप्त करण्यात आला. प्राथमिक अंदाजानुसार, या कारवाईमुळे सुमारे 10,000 किलो गांजा बेकायदेशीर बाजारपेठेत पोहोचण्यापासून रोखला गेला आहे आणि त्यामुळे होणारे घातक दुष्पपरिणामही टाळले गेले आहेत.

अंमली पदार्थ आणि नशायुक्त घटक कायदा, 1985 अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला अशा पदार्थांची लागवड करणे, साठा बाळगणे, विक्री करणे, खरेदी करणे किंवा सेवन करणे बेकायदेशीर कृती आहे. या तरतुदींचे उल्लंघन केल्यास कठोर दंड आणि कमाल 20 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षेचीही तरतूद कायद्यात केली गेली आहे.

महसूल गुप्तचर संचालनालय सातत्याने अंमली पदार्थांच्या तस्करांविरोधात कठोर कारवाई करत आले आहे. अशा मोहिमांतून नशा मुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याप्रति महसूल गुप्तचर संचालनालयाच्या ठाम संकल्पाचीच प्रचिती येते.

 

* * *

PIB Mumbai | S.Tupe/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2118218) आगंतुक पटल : 40
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English