ऊर्जा मंत्रालय
एनटीपीसीने आर्थिक वर्ष 2025 मध्ये 438.6 अब्ज युनिट्स वीज निर्मितीची नोंद केली, गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.88% वाढ
प्रविष्टि तिथि:
01 APR 2025 6:30PM by PIB Mumbai
मुंबई, 1 एप्रिल 2025
एनटीपीसी लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक वीज निर्मिती करणाऱ्या कंपनीने आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये आपल्या कार्यान्वयन कामगिरीत लक्षणीय वृद्धी करत एकूण ऊर्जा निर्मितीत गेल्या आर्थिक वर्ष 2024 च्या तुलनेत 3.88% नी वाढ नोंदवली आहे. एनटीपीसी समूहाने आर्थिक वर्ष 2025 मध्ये एकूण 438.6 अब्ज युनिट्स वीज निर्मिती करून गेल्या आर्थिक वर्षातील 422.2 अब्ज युनिट्सच्या आकड्याला मागे टाकले आहे.
राष्ट्राला विश्वासार्ह आणि परवडण्याजोग्या विजेचा पुरवठा करण्याप्रति एनटीपीसीची वचनबद्धता यातून दिसून येते. एनटीपीसी कंपनीने आपल्या स्थापित उर्जा क्षमतेमध्ये उल्लेखनीय वाढ दर्शवली असून त्यात विस्तार केला आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये एनटीपीसी समूहाने यशस्वीरित्या 3,972 मेगावॅट क्षमता साध्य केली असून त्यामुळे आर्थिक वर्षाच्या अखेरीस त्यांची एकत्रित स्थापित क्षमता अंदाजे 80 गिगावॅटवर पोहोचली आहे.

एनटीपीसीच्या 80 गिगावॅट इतक्या कार्यात्मक क्षमतेव्यतिरिक्त अतिरिक्त 32 गिगावॅट क्षमता असलेल्या प्रकल्पाचे बांधकाम प्रगतीपथावर असून त्यामध्ये 15 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेचा समावेश आहे. वर्ष 2032 पर्यंत 60 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा निर्मिती गाठण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. वीजनिर्मितीसोबतच, एनटीपीसी समूहाने ई-मोबिलिटी, बॅटरी साठवणूक , वेस्ट-टू-एनर्जी (टाकाऊ वस्तु पासून ऊर्जा निर्मिती), अणुऊर्जा, हरित हायड्रोजन पर्यायांसह विविध नवीन व्यवसाय क्षेत्रातही पाऊल टाकले आहे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वीज वितरणासाठी झालेल्या बोली प्रक्रियेतही आपला सहभाग नोंदवला आहे.
एनटीपीसी विषयी
एनटीपीसी लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी एकात्मिक वीज निर्मिती करणारी कंपनी आहे, जी देशाच्या एकूण विजेच्या गरजेपैकी 1/4 भाग वीज पुरवते. औष्णिक, जलविद्युत, सौर आणि पवन ऊर्जा अशा विविध ऊर्जा निर्मिती प्रकल्पांच्या माध्यमातून एनटीपीसी कंपनी देशाला विश्वासार्ह, परवडणारी आणि शाश्वत वीज पुरवण्यासाठी समर्पित आहे.
* * *
PIB Mumbai | S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2117429)
आगंतुक पटल : 52
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English