माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या वतीने आयोजित चिली आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ चित्रपट महोत्सवाच्या सहाव्या पर्वाचा प्रारंभ

Posted On: 29 MAR 2025 6:26PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (National Film Development Corporation - NFDC) वतीने  चिली आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ चित्रपट महोत्सवाच्या सहाव्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. 26 मार्च 2025 ते 30 मार्च 2025 असे पाच दिवस हा चित्रपटांचा सोहळा सुरू आहे. या महोत्सवाच्या या वर्षीच्या पर्वात सिनेरसिकांना चिली आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या निवडक आशयघन चित्रपटांची पर्वणी अनुभवायला मिळते आहे. या चित्रपटांमधून भारत आणि चिलीमधील सिनेमॅटिक अर्थात चित्रपट क्षेत्राअंतर्गतचे परस्पर सहकार्य अधोरेखित होत असून, यातून जागतिक कथात्मक मांडणीलाही चालना मिळते आहे.

या चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला चिलीचे महावाणिज्यदूत गुस्तावो गोंझालेझ, दिग्दर्शक जॉर्ज लोपेझ सोतोमेयर तसंच अर्जेंटिना, इंडोनेशिया, इजिप्त, मेक्सिको, उझबेकिस्तान आणि इस्रायलच्या वाणिज्य दूतांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते. या कार्यक्रमाच्या  सूत्रसंचालनाची धुरा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या विपणन व्यवस्थापक जयिता घोष यांनी सांभाळली. याशिवाय त्यांनी गोंझालेझ आणि दिग्दर्शकांमधील भारत आणि चिलीमधल्या सिनेमॅटिक सहकार्याविषयीच्या संवाद सत्राच्या सूत्रधार म्हणूनही भूमिका पार पाडली. या संवाद सत्रानंतर 40 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सोतोमेयर दिग्दर्शित एल अल्टिमो ग्रुमेट या अभिजात चिली चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचा प्रारंभ झाला. यंदाच्या महोत्सवात दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांमध्ये डेट उना वुएल्टा एन एल एअर, एल अल्टिमो ग्रुमेट या चिली चित्रपटांसह आणि समीक्षकांनी प्रशंसेला पात्र ठरलेल्या किस्सा, आयलंड सिटी या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या चित्रपटांचा समावेश आहे. 30 मार्च रोजी या चित्रपटांच्या पुनर्खेळांनी महोत्सवाचा समारोप होणार आहे.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आगामी वर्षांत या  महोत्सवांच्या आयोजित होणाऱ्या पर्वांसाठी सहाव्या देशासोबत सहकार्य करण्याकरता उत्सुक असल्याची भावना महामंडळाचे  महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन यांनी व्यक्त केली आहे. अशा प्रयत्नातून जागतिक भागीदारीचा विस्तार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण मजबूत करण्याची  राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची  वचनबद्धताही त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.

या महोत्सवासाठी आलेल्या पाहुण्यांना अविस्मरणीय अनुभवाची अनुभूती देण्याच्या उद्देशाने चिलीच्या महावाणिज्यदूतांच्या वतीने चिली खाद्यपदार्थांची मेजवानी दिली गेली. या महोत्सवातील सकस आशयघन चित्रपट तसेच भारताच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय संबंधांमुळे हा महोत्सव भारताच्या सीमा ओलांडून कथात्मक मांडणीचा उत्सव साजरा करणारा महोत्सव ठरला आहे.

***

S.Kakade/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2116644) Visitor Counter : 38


Read this release in: English