ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त भारतीय मानक ब्युरो द्वारे ‘मानक कार्निव्हल'चे आयोजन

Posted On: 26 MAR 2025 8:55PM by PIB Mumbai

मुंबई, 26 मार्च 2025

 

भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) च्या मुंबई शाखा कार्यालय- I द्वारे जागतिक ग्राहक हक्क दिन 2025 निमित्त 22 मार्च 2025 रोजी नाशिक येथील के. के. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेत ‘मानक कार्निव्हल'चे आयोजन करण्यात आले होते. गुणवत्ता मानके आणि आयएसआय-चिन्हांकित (ISI-marked) बीआयएस-प्रमाणित उत्पादनांचे महत्त्व याबद्दल जागरूकता वाढवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.

मुंबई शाखा कार्यालय- I ने मानक कार्निव्हलला भेट देणाऱ्यांना मानकीकरण आणि आयएसआय-चिन्हांकित उत्पादने, तसेच ग्राहक सक्षमीकारणासाठीच्या बीआयएस केअर अॅपबद्दल माहिती देण्यासाठी बीआयएस स्टॉल उभारला होता. उत्पादनाची गुणवत्ता आणि ग्राहकांची सुरक्षितता जपण्यासाठी मानकांच्या भूमिकेवर जोर देत 20 हून अधिक उद्योग आणि महाविद्यालयांच्या स्टॉल्सनी या ठिकाणी बीआयएस-प्रमाणित उत्पादने प्रदर्शित केली. कार्निव्हलमध्ये स्टँडर्ड क्लबचे 1,200 हून अधिक सदस्य, उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सरकारी अधिकारी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या कार्यक्रमात अनेक मनोरंजक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये स्टँडर्ड क्लबच्या 20 सदस्यांचे सादरीकरण असलेली आंतरशालेय व आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धा, 1,200 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली खुली प्रश्नमंजुषा स्पर्धा, आणि गुणवत्ता मानके या विषयावर सृजनशीलतेला प्रोत्साहन देणारी आंतरशालेय पोस्टर मेकिंग स्पर्धा, याचा समावेश होता. याशिवाय, मानकीकरणाचे महत्त्व समजवण्यासाठी उत्पादन प्रात्यक्षिके आणि संवादात्मक ग्राहक जागरूकता सत्रे आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमाला बीआयएस मधील वैज्ञानिक-जी आणि उपमहासंचालक (पश्चिम विभाग) संजय गोस्वामी, डीडीजी पीआरटी, चित्रा गुप्ता, टीएनएमडीचे प्रमुख सूर्या कल्याणी आणि मुंबई शाखा कार्यालय- I चे प्रमुख पिनाकी गुप्ता यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. के. के. वाघ इन्स्टिट्यूट मधील जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर, डॉ. विनायक सेवळीकर, डॉ. नानासाहेब गुरुले, प्रा.हर्षल दांडगावल आणि डॉ. शहाबादकर उपस्थित होते.

मानक कार्निव्हलने उद्योगांना विद्यार्थी आणि ग्राहकांशी थेट संवाद साधण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान केले, ज्यामुळे गुणवत्ता आणि मानकांप्रति असलेली त्यांची बांधिलकी अधिक मजबूत झाली. उपस्थितांना दैनंदिन उत्पादनांवर असलेला मानकांचा प्रभाव तसेच सुरक्षा, विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेची हमी देण्यामधील त्यांची महत्वाची भूमिका याबद्दल मोलाचा दृष्टीकोन मिळाला. विद्यार्थी, उद्योग क्षेत्रातील नेते आणि शिक्षण तज्ञांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे, हा कार्यक्रम ग्राहक जागरूकता आणि गुणवत्तेच्या मानकांद्वारे विश्वास वाढवण्याचे  बीआयएसचे उद्दिष्ट मजबूत करण्यात यशस्वी ठरला.   

 

* * *

PIB Mumbai | S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2115549) अभ्यागत कक्ष : 65
Read this releasein: English