वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारताने उत्पादनात 14 लाख कोटी रुपयांचा तर निर्यातीत 5.3 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला, असे सीआयआय उत्पादन शिखर परिषदेमध्ये डीपीआयआयटी सचिवांनी सांगितले
उत्पादनांची निर्यात वाढत असली तरीही सेवा निर्यातीशी जुळवून घेण्यासाठी परिवर्तन आवश्यक: डीपीआयआयटी सचिव अमरदीप सिंग भाटिया
Posted On:
25 MAR 2025 7:38PM by PIB Mumbai
मुंबई, 25 मार्च 2025
20 व्या सीआयआय उत्पादन शिखर परिषदेने भारतातील उत्पादन क्षेत्राचे भविष्य पुन्हा परिभाषित करण्याच्या दृष्टीने उद्योग क्षेत्रातील अव्वल नेते, धोरणकर्ते आणि जागतिक तज्ज्ञांना एकत्र आणले होते. सध्या भारताच्या जीडीपीमध्ये या क्षेत्राचे योगदान 17% असल्याने, भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) उत्पादनासाठी 25% जीडीपी हिश्श्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली आहे, जे जागतिक उत्पादन ऊर्जाकेंद्र बनण्याच्या भारताच्या ध्येयाकडे जाणारे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात भारताच्या उत्पादन परिक्षेत्रात परिवर्तनाची तातडीची गरज यावर भर देण्यात आला. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे (डीपीआय आय टी) सचिव अमरदीप सिंग भाटिया यांनी उत्पादन आणि निर्यातीतील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकला.
उत्पादनात 14 लाख कोटी रुपयांचा आणि निर्यातीत 5.3 लाख कोटी रुपयांचा टप्पा या उल्लेखनीय कामगिरीमुळे 11.5 लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत. ही केवळ एक संख्या नाही; ती आपल्या देशाला पुढे नेणारी उपजीविका, आकांक्षा आणि आर्थिक गती दर्शवते. आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार आणि 2014 पासून मोबाईल फोन निर्यातीत वाढ - 1.29 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त - ही भारताची जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता दर्शवते. तथापि आपली उत्पादन निर्यात वाढत असताना, ती अजूनही सेवा निर्यातीपेक्षा मागे आहे, जी परिवर्तनाची संधी दर्शवते,” असे त्यांनी सांगितले.
सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी भारताच्या आर्थिक भविष्याच्या संदर्भात त्याची क्षमता मांडली. "भारत एका औद्योगिक क्रांतीच्या चौरस्त्यावर उभा आहे - जी येणाऱ्या पिढ्यांसाठी आपले आर्थिक भवितव्य निश्चित करेल. आपण आपल्या प्रगतीचा आनंद साजरा करत असताना येणाऱ्या आव्हानांनाही आपल्याला अढळ दृढनिश्चयाने तोंड द्यावे लागेल. 2047 पर्यंत भारताचे 3.7 अब्ज डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेतून 30-35 अब्ज डॉलर्सच्या ऊर्जा केंद्रामध्ये रूपांतर करण्यासाठी उत्पादन क्षेत्राने स्वतःचे योग्य स्थान मिळवले पाहिजे - आपल्या जीडीपीमध्ये किमान 25% योगदान दिले पाहिजे. ही केवळ आर्थिक गरज नाही; ती एक राष्ट्रीय निकड आहे," असे ते म्हणाले.
सीआयआय उत्पादन शिखर परिषद 2025 चे अध्यक्ष जमशेद एन. गोदरेज यांनी भारताच्या उत्पादन उत्क्रांतीची निकड अधोरेखित केली, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि थायलंड यासारख्या देशांमधील जागतिक उद्योजक स्थापित करत असणारे बेंचमार्क भारताने पूर्ण केले पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी अधिक समावेशकतेचे, विशेषतः उत्पादन क्षेत्रात महिला नेतृत्वाचे आवाहन केले आणि नवोपक्रम चालविण्यामध्ये एमएसएमई, स्टार्टअप्स आणि कॉर्पोरेट नेत्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक गीतांजली विक्रम किर्लोस्कर यांनी भारताच्या आर्थिक यशातील उत्पादनाची भूमिका अधोरेखित केली. उत्पादनाच्या विस्ताराला पाठिंबा देण्यासाठी लवचिक पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले, तर बीसीजीचे व्यवस्थापकीय संचालक आणि वरिष्ठ भागीदार, प्रॅक्टिसेसचे अध्यक्ष अभिक सिंघी यांनी पुढील औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक घटक म्हणून शाश्वतता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करण्यावर भर दिला.
सीआयआय पश्चिम क्षेत्राच्या अध्यक्षा स्वाती साळगावकर यांनी उत्पादन क्षेत्रातील एक ऊर्जाकेंद्र म्हणून भारताच्या विकसित होत असलेल्या भूमिकेवर भर दिला. त्यांनी नमूद केले की, "प्रगती केवळ संभाषणांनी होत नाही; ती कृतीने पुढे जाते. आपण या वळणावर उभे असताना, चला या क्षणाचा फायदा घेऊया - सहयोग करूया, नवोन्मेष साकार करूया आणि एक लवचिक, शाश्वत आणि भविष्यासाठी तयार असलेली उत्पादन परिसंस्था तयार करूया. एकत्रितपणे, आपण भारताला जागतिक उत्पादन नेता म्हणून स्थापित करूया." त्यांच्या समारोपाच्या भाषणात सीआयआय पश्चिम क्षेत्राचे माजी अध्यक्ष सुनील चोरडिया यांनी केवळ संभाषणांपेक्षा कृती करण्याचे आवाहन केले. त्यांनी भारताला जागतिक उत्पादन नेता म्हणून स्थान देण्यासाठी सहकार्य, नवोन्मेष आणि एक लवचिक, शाश्वत आणि भविष्यासाठी तयार उत्पादन परिसंस्थेचे महत्त्व अधोरेखित केले.
भारत 2047 पर्यंत 35 अब्ज डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनाकडे वाटचाल करत असताना उत्पादन त्याच्या केंद्रस्थानी असेल. 20 व्या सीआयआय उत्पादन शिखर परिषदेने भारताला जागतिक उत्पादन नेता म्हणून स्थापित करण्यासाठी धाडसी नेतृत्व, धोरणात्मक गुंतवणूक आणि धोरण-चालित नवोन्मेषाची आवश्यकता अधोरेखित केली.
S.Patil/N.Mathure/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2115031)
Visitor Counter : 31