अर्थ मंत्रालय
ॲम्नेस्टी योजने अंतर्गत कर थकबाकी भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025
Posted On:
21 MAR 2025 5:00PM by PIB Mumbai
मुंबई, 21 मार्च 2025
ॲम्नेस्टी (कर माफी) योजनेचा कलम 128 अ अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक कर थकबाकी भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025 असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ 10 दिवस शिल्लक राहिले आहेत. करदात्यांनी कर भरल्यानंतर फॉर्म जीएसटी एसपीएल - 01/02 मध्ये ॲम्नेस्टी योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई झोनने ही माहिती दिली आहे. तसेच सर्व जीएसटी करदात्यांना ॲम्नेस्टी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन दिले असून, त्यांची थकित कर देयके मुदतीपूर्वी म्हणजेच 31 मार्च 2025 पूर्वी निकाली काढण्याचे आवाहन केले आहे.
वस्तू आणि सेवा कराच्या प्रलंबित वादांचे निराकरण सुलभ करणे, आणि आर्थिक वर्ष 2017-2018, 2018-2019 आणि 2019-2020 शी संबंधित सीजीएसटी कायद्याच्या कलम 73 अंतर्गत जारी केलेल्या मागण्यांच्या संदर्भात करदात्यांवरील भार कमी करणे, हे ॲम्नेस्टी योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजने अंतर्गत करदात्यांना योजनेच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून, संबंधित दंड आणि व्याज माफीसह, केवळ मूळ कराची रक्कम भरून त्यांच्या थकित कर दायित्वांचा निपटारा करण्याची परवानगी मिळते.
केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प-2024 मध्ये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) अधिनियम, 2017 च्या कलम 128 ए अंतर्गत माफी योजनेची घोषणा केली असून, अधिसूचना क्रमांक 21/2024-सीटी दिनांक 8 ऑक्टोबर 2024 आणि परिपत्रक क्रमांक 238/32/2024-जीएसटी दिनांक 15 ऑक्टोबर 2024 जारी केले आहे.
तसेच, ज्या प्रकरणांमध्ये सुरुवातीला 2017-2018, 2018-2019 आणि 2019-2020 या आर्थिक वर्षांसाठी कलम 74 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती, आणि कलम 73 अन्वये योग्य अधिकाऱ्याने आदेश पारित केला आहे किंवा देणे आवश्यक आहे (अपिलीय प्राधिकरण किंवा अपिलीय न्यायाधिकरण किंवा न्यायालयाच्या निर्देशानुसार), अशी प्रकरणे व्याज आणि दंड माफ करण्याच्या हेतूने कलम 128 अ अंतर्गत समाविष्ट आहेत.
कोणतेही स्पष्टीकरण अथवा सहाय्यासाठी, क्षेत्राधिकार जीएसटी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2113724)
अभ्यागत कक्ष : 84