माहिती आणि प्रसारण मंत्रालय
न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्या एनएमआयसी भेटीमुळे भारत-न्यूझीलंड यांच्यातील चित्रपट बंध अधिक दृढ
एनएमआयसी येथील भारताच्या समृद्ध चित्रपट वारशाचे पंतप्रधान लक्सन यांनी केले कौतुक
Posted On:
20 MAR 2025 2:43PM by PIB Mumbai
मुंबई, 20 मार्च 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाअंतर्गत (एनएफडीसी) येणाऱ्या राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाने (एनएमआयसी) 19 मार्च, 2025 रोजी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांचे आपल्या परिसरात स्वागत केले. लक्सन यांची ही विशेष भेट होती.
एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन, एनएमआयसीच्या विपणन प्रमुख जयिता घोष आणि अभिनेते आनंद विजय जोशी यांनी पंतप्रधान लक्सन यांचे हार्दिक स्वागत केले. त्यानंतर गुलशन महलला त्यांनी भेट दिली. भारतीय चित्रपटांचा 100 वर्षांचा इतिहास येथे दर्शविण्यात आला आहे. संग्रहालयाच्या सभागृहात भारतीय चित्रपटांचा समृद्ध वारशाच्या शोध दर्शविणाऱ्या विविध प्रदर्शनांची माहिती त्यांना देण्यात आली. डी. रामकृष्णन आणि जयिता घोष यांनी त्यांना भारतीय चित्रपटाच्या विकासाबाबत बहुमोल माहिती दिली.

या भेटीबद्दल बोलताना पंतप्रधान लक्सन म्हणाले,“भारतीय चित्रपटांचा इतिहास कशा प्रकारे उत्क्रांत पावला आहे हे बघणे खरोखरीच मनोरंजक आहे. ही भेट म्हणजे एक अत्यंत मंत्रमुग्ध करणारा अनुभव होता आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाचा असा वैशिष्ट्यपूर्ण भाग बघण्याची संधी मिळाल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे.” डी.रामकृष्णन आणि जयिता घोष यांनी कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, “पंतप्रधान लक्सन यांचे आदरातिथ्य करणे आणि भारत आणि न्युझीलंड यांच्यातील दृढ सांस्कृतिक संबंध साजरे करणे ही एनएमआयसी तसेच एनएफडीसी यांच्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे.”

कहो ना....प्यार है... या सुप्रसिध्द भारतीय चित्रपटाच्या गीतातील गाजलेली विशिष्ट नृत्यकला सादर करण्यात पंतप्रधान लक्सन यांच्यासह न्युझीलंडचे राजदूत आणि महा वाणिज्यदूत सहभागी झाले आणि या गीताच्या स्मृती साजऱ्या करत ही भेट संपन्न झाली. वर्ष 2000 मध्ये अत्यंत गाजलेल्या आणि आता रौप्यमहोत्सव साजरा करत असलेल्या कहो ना....प्यार है... या चित्रपटाचे छायाचित्रण न्युझीलंडमध्ये झाले होते.यामुळे आज या क्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. पंतप्रधान लक्सन यांच्या या भेटीमुळे भारत आणि न्युझीलंड यांच्या दरम्यान असलेले चित्रपटीय आणि सांस्कृतिक नाते आणखी मजबूत झाले.

Jaydevi PS/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2113215)
Visitor Counter : 40