युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून मुंबईत ‘मीट द चॅम्पियन’ कार्यक्रमाचे आयोजन


ऑलिम्पिकपटू ज्योती याराजीने 1,500 हून अधिक विद्यार्थी आणि खेळाडूंना दिली प्रेरणा

प्रविष्टि तिथि: 14 MAR 2025 8:16PM by PIB Mumbai

मुंबई, 14 मार्च 2025

 

भारतीय क्रीडा प्राधिकरण – एसएआयच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने 13 मार्च 2025 रोजी नवी मुंबईतील ‘खेलो इंडिया’ मान्यताप्राप्त अकादमी ॲग्नेल चॅरिटीज् इथे ‘मीट द चॅम्पियन’ कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला ऑलिम्पिकपटू  ज्योती याराजीची विशेष उपस्थिती लाभली. ज्योती यांनी  आपल्या क्रीडा क्षेत्रातील प्रवासाविषयी सांगत 1,500 हून अधिक विद्यार्थी आणि ‘खेलो इंडिया’तील क्रीडापटूंना प्रेरित केले.

   

एसएआय मुंबईचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे यांनी ज्योतीच्या चिकाटीचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवासातून प्रेरणा घेण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी समर्पित होऊन कठोर परिश्रमातून देशासाठी क्रीडा क्षेत्रात यश संपादन करण्याचे आवाहन युवा क्रीडापटूंना केले.

ज्योतीने आपल्या भाषणात क्रीडा क्षेत्रात सुरुवातीपासून ते 100 मीटर अडथळा शर्यतीत विक्रम करण्यापर्यंतचा प्रवास कथन केला. या प्रवासात तिच्यासमोर आलेल्या आव्हानांविषयी सांगितले. आपल्या पालकांना सुरुवातीला खेळांविषयी फारशी माहिती नव्हती आणि त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी आपले लग्न लावून देण्याचा विचार केला होता. मात्र, ज्योतीने त्यांच्याकडे एक वर्षाचा अवधी मागितला. या कालावधीत ज्योतीने दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवासाची यशस्वी सुरुवात केली.

  

आज 25 वर्षांच्या असलेल्या ज्योती याराजी हिने अनेक राष्ट्रीय विक्रम केले आहेत. भारतीय राष्ट्रध्वज पोडियमवर उंचावला जातो आणि राष्ट्रगीत वाजते तो क्षण प्रत्येक खेळाडूसाठी सर्वात अभिमानास्पद असतो, असे ज्योतीने सांगितले.शिक्षण आणि क्रीडा यांच्यातील समतोल राखण्याचे महत्त्व तिने सांगितले. तसेच क्रीडा विज्ञानाची खेळातील कामगिरी सुधारण्यात असलेली भूमिका स्पष्ट केली. तसेच, खेळामुळे तिला तेलुगुखेरीज इतर अनेक भाषा शिकता आल्या आणि जागतिक स्तरावर तिची ओळख निर्माण झाली, असे ज्योती म्हणाली.

एसएआय मुंबईच्या सहाय्यक संचालक अपूर्वा मंदा आणि ‘ॲग्नेल चॅरिटीज्’च्या प्रमुख स्निग्धा रॉय आणि विश्वस्त फादर सॅटर्निनो अल्मेडा या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तराच्या सत्रात ज्योतीशी थेट संवाद साधण्याची संधी विद्यार्थी आणि क्रीडापटूंना मिळाली. या सत्रात त्यांनी ज्योतीकडून तिची प्रशिक्षण पद्धती, मानसिक तयारी आणि आव्हानांवर मात करण्याच्या रणनीतीविषयी माहिती घेतली.

 

‘मीट द चॅम्पिअन्स’ अभियानाविषयी

‘मीट द चॅम्पिअन्स’ या  युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे आयोजित  अभियानांतर्गत नामांकित क्रीडापटू शाळांना भेट देऊन आपापले अनुभव, क्रीडा क्षेत्रातील प्रवास, आरोग्यदायी आहाराचे महत्त्व कथन करतात. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी या संवादाचे आयोजन केले जाते.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2111434) आगंतुक पटल : 91
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English