दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारताच्या पुरुष क्रिकेट संघाने चॅम्पियन्स करंडक 2025 स्पर्धेत मिळवलेल्या शानदार विजयाचा विशेष रद्दीकरण मुद्रेच्या माध्यमातून भारतीय टपाल विभागाने केला गौरव
Posted On:
10 MAR 2025 10:00PM by PIB Mumbai
मुंबई, 10 मार्च 2025
भारताच्या पुरुष क्रिकेट संघाने चॅम्पियन्स करंडक 2025 स्पर्धेत मिळवलेल्या शानदार विजयाच्या गौरवार्थ, टपाल विभागाच्या महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यांनी आज एका विशेष रद्दीकरण मुद्रेचे (Special Cancellation ) अनावरण केले. दुबई इथे रविवारी 9 मार्च 2025 रोजी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या जेतेपदासाठी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर थरारक विजय मिळवला होता. या प्रतिष्ठित स्पर्धेतील भारताच्या यशाचा गौरव करण्यासाठी टपाल विभागाच्या वतीने आज मुंबईतील मुख्य टपाल कार्यालयात (GPO)ही विशेष टपाल रद्दीकरण मुद्रा प्रकाशित केली गेली.
या रद्दीकरण मुद्रेतून देशाभिमान आणि भारतीय क्रिकेट संघाने या स्पर्धेच्या जेतेपदावर आपले नाव कोरताना दर्शवलेल्या क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेच्या कामगिरीला ठळकपणे अधोरेखीत केले गेले आहे. ही विशेष रद्दीकरण मुद्रा भारतीय क्रिकेट संघाच्या अभिमानास्पद विजयी कामगिरीचे प्रतीक आहे. त्याच बरोबरीने ही मुद्रा टपाल संग्रहकांसाठी दुर्मीळ संग्रहणीय वस्तू ठरणार आहे.


मुंबईतील मुख्य टपाल कार्यालयात झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल सुचित्रा जोशी, महाराष्ट्र टपाल मंडळाच्या टपाल सेवा (टपाल आणि व्यवसाय विकास) विभागाचे संचालक मनोज कुमार यांच्यासह अनेक मान्यवर, अधिकाऱ्यांसह, भारतीय क्रीडा इतिहासातील या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमीही उपस्थित होते.

भारताच्या या दैदिप्यमान यशाचा गौरव टपाल संग्रहण वारशाच्या माध्यमातून केला जात असल्याने, हा ऐतिहासिक क्षण अजरामर होईल अशी भावना महाराष्ट्र टपाल मंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यांनी यावेळी व्यक्त केली.
ही विशेष रद्दीकरण मुद्रा असलेली पोस्ट कार्ड सर्वसामान्य नागरिकांसाठी मुंबईतील मुख्य टपाल कार्यालयात उपलब्ध आहेत.
S.Kane/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2110041)
Visitor Counter : 52