महिला आणि बालविकास मंत्रालय
दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने 'बेटी बचाओ बेटी पढाओ' योजनेच्या 10 व्या वर्षपूर्तीचा साजरा केला उत्सव
Posted On:
08 MAR 2025 3:37PM by PIB Mumbai
दक्षिण गोवा जिल्हा प्रशासन आणि महिला व बाल विकास संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने माटानहय सल्दान्हा प्रशासकीय संकुल येथे 08/03/2025 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि बेटी बचाओ बेटी पढाओ (बीबीबीपी) योजनेच्या 10 व्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि लैंगिक समानतेसाठी असलेली वचनबद्धता पुनर्स्थापित करण्यात आली.

या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सामाजिक कल्याण, नदी परिवहन, अभिलेखागार आणि पुरातत्व विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई हे होते. तसेच विशेष अतिथी म्हणून कर्नल सुमन कुमारी, कमांडिंग ऑफिसर, 5 टेक्निकल ट्रेनिंग रेजिमेंट, बंबोळीम, या उपस्थित होत्या. कार्यक्रमाला दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, आयएएस अधिकारी सुश्री एग्ना क्लीटस, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक, आयपीएस अधिकारी तिकम सिंग वर्मा आणि महिला व बाल विकास संचालनालयाचे संचालक मॅन्युअल बारेटो यांनी देखील उपस्थिती लावली.

या कार्यक्रमात विविध सरकारी विभागांचे अधिकारी, शालेय विद्यार्थी, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिलेल्या महिलांचा उत्साही सहभाग दिसून आला. खेळ, शिक्षण, प्रशासन, उद्योजकता आणि सामाजिक सेवेसह कायदा आणि सुव्यवस्थेच्या क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त केलेल्या महिलांच्या यशाचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. या महिलांना उद्याच्या पिढीसाठी प्रेरणास्रोत म्हणून सन्मानित करण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. बोर्डाच्या परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तसेच विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर आपापल्या क्षेत्रांत असामान्य कामगिरी करणाऱ्या महिलांना देखील विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.
या प्रसंगी बोलताना मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दक्षिण गोवा प्रशासनाने महिलांसाठी आणि मुलींसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजनांचे कौतुक केले.
कार्यक्रमामध्ये कर्नल सुमन कुमारी यांच्या प्रेरणादायी भाषणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि जागरूकता सत्रांचा समावेश केला गेला होता. महिला शिक्षण, सुरक्षितता आणि समान संधी या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.
या वेळी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, आयएएस अधिकारी एग्ना क्लीटस यांनी आपल्या भाषणात सांगितले की आंतरराष्ट्रीय महिला दिन हा केवळ असामान्य यश साजरे करण्याचा दिवस नाही, तर सामान्य महिलांच्या अद्वितीय योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे, ज्या आपली कुटुंबे, समुदाय आणि समाज घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक, आयपीएस अधिकारी तिकम सिंग वर्मा यांनी महिला सुरक्षेचे आणि सशक्तीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि महिला व मुलींसाठी सुरक्षित आणि सहकार्यपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सतत सुरू राहतील, याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशासनाने महिलांच्या सशक्तीकरणासाठी असलेल्या विविध योजनांना अधिक बळकट करण्याच्या आपल्या वचनाचा पुनरुच्चार केला. प्रत्येक मुलीला शिक्षण, सुरक्षितता आणि तिची पूर्ण क्षमता साध्य करण्याच्या संधी मिळाव्यात, यासाठी सतत कार्य करण्याचा निर्धार या कार्यक्रमाच्या शेवटी करण्यात आला.
***
M.Pange/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2109493)
Visitor Counter : 24