लोकसभा सचिवालय
जागतिक पटलावर नवोन्मेष व संशोधन यामध्ये भारताचे युवक अग्रस्थानी राहतील: लोकसभा अध्यक्ष
Posted On:
06 MAR 2025 9:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मार्च 2025
भारतातील उर्जावान आणि दूरदृष्टी असलेली युवा पिढी अभूतपूर्व नवकल्पनांना गती देईल आणि जगभरातल्या संशोधन क्षेत्राचे नेतृत्व करेल, असा विश्वास लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी व्यक्त केला. भारतीय महिलांमध्ये असलेल्या अतुलनीय शक्ती व लवचिकतेची प्रशंसा करताना भारताचा विकास व विकसित भारताच्या दिशेने होणारा प्रवास यामधे महिला आघाडीवर आहेत असे त्यांनी नमूद केले. व्यापक संधींचा फायदा घेऊन महिला आज विविध क्षेत्रांमध्ये आघाडी घेत आहेत असे निरीक्षण नोंदवून लवकरच त्या खऱ्या अर्थाने देशाच्या भविष्याच्या ध्वजवाहक ठरतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम वाणिज्य महाविद्यालयाने आज आयोजित केलेल्या व्यावसायिक परिषदेत विद्यार्थी व अन्य निमंत्रितांना ते संबोधित करत होते.
भारताची युवा पिढी आणि महिला जगभरात परिवर्तन घडवून आणत त्यांच्या बुद्धी व समर्पित वृत्तीच्या बळावर भविष्याला आकार देतील, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.
नवोन्मेष व संशोधनामधले भारताचे वाढते सामर्थ्य पुन्हा अधोरेखित करत; जग लवकरच भारताकडे बदल व प्रगतीचे नेतृत्व म्हणून पहायला लागेल, असा विश्वास बिर्ला यांनी व्यक्त केला. भारताची अमर्याद क्षमता वास्तवात आणण्याची गुरुकिल्ली युवा पिढीकडे असल्यामुळे युवा पिढीने या जागतिक बदलाचे शिल्पकार व्हावे असे आवाहन त्यांनी केले. जगाचे भविष्य लिहीण्यामध्ये भारताची युवा पिढी व महिला नेतृत्व करतील यात काहीही शंका नसल्याचे ते म्हणाले.
सध्याच्या स्पर्धात्मक जगात विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता व व्यापक मानसिकता जोपासावी, असे बिर्ला म्हणाले. अपयश ही यशाची केवळ एक पूर्वपायरी आहे याची आठवण त्यांनी विद्यार्थ्यांना करुन दिली. हुशारीच्या जोडीने चिकाटी हा यशाचा खरा मार्ग आहे असे त्यांनी सांगितले.
लवचिकतेचे महत्त्व अधोरेखित करुन संसाधनांच्या कमतरतेला आपल्या यशातील अडथळा बनवू नका, असे आवाहन बिर्ला यांनी विद्यार्थ्यांना केले.
शिक्षणाच्या महत्त्वाबाबत आपले विचार व्यक्त करताना बिर्ला म्हणाले की, शिक्षण हा असा दीप आहे; जो मन उजळवून टाकतो, व्यक्तीचे वैचारिक पोषण करतो आणि व्यक्तीला समाजातील परिवर्तन व प्रगतीचा प्रवर्तक होण्याची प्रेरणा देतो. युवा पिढीने बहुआयामी दृष्टीकोन विकसित करावा व यशाचा ध्यास घ्यावा आणि हे केवळ व्यक्तीगत फायद्यासाठी नाही; तर राष्ट्र उभारणीच्या भव्य उद्दीष्टासाठी करावे असे आवाहन त्यांनी युवा पिढीला केले.
* * *
N.Chitale/S.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2108950)
Visitor Counter : 29