विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय अर्थव्यवस्थेचे मूल्यवर्धन करत आणि विकसित भारत @2047 च्या दिशेने वाटचाल करत येत्या काही वर्षात देशाची अंतराळ अर्थव्यवस्था 8 अब्ज डॉलर्स वरून पाच पट वाढ नोंदवत 44 अब्ज डॉलर्सपर्यंत झेप घेईल: केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह

Posted On: 25 FEB 2025 7:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2025

 

“भारतीय अर्थव्यवस्थेचे मूल्यवर्धन करत आणि विकसित भारत @2047 च्या दिशेने वाटचाल करत येत्या काही वर्षात देशाची अंतराळ अर्थव्यवस्था 8 अब्ज डॉलर्स पासून पाच पट वाढ नोंदवत 44 अब्ज डॉलर्सपर्यंत झेप घेईल” असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे टाईम्स नेटवर्कतर्फे आयोजित “व्यापार परिषदे”ला संबोधित करताना सांगितले.

भारतीय अंतराळ क्षेत्राने केलेली उल्लेखनीय प्रगती अधोरेखित करत केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की,अंतराळ क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात केलेली वाढीव तरतूद हा उपरोल्लेखित यशाचा महत्वाचा प्रेरक घटक ठरला आहे. अंतराळ क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिप्पट वाढ करण्यात आली असून 2013-14 मधल्या  5,615 कोटी रुपयांच्या तरतुदीवरून आता 2025-26 मध्ये ही तरतूद 13,416 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. अंतराळ क्षेत्राच्या वाढीला चालना देण्याप्रती सरकारची कटिबद्धता यातून दिसून येते.

01.JPG

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की 2014 हे वर्ष भारताच्या अंतराळ प्रवासाला महत्वाचे निर्णायक वळण देणारे ठरले कारण या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी धोरणांमध्ये धडाडीने बदल घडवून आणत भारताच्या अंतराळ क्षेत्राच्या क्षमता खुल्या करण्यासाठी चौकटीबाहेरील निर्णय घेतला.मोदी सरकारने तयार केलेल्या सक्षम वातावरणाला श्रेय देत केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की या सरकारने श्रीहरीकोटाची दारे सामान्यांसाठी खुली केली आणि थेट परदेशी गुंतवणुकीचे (एफडीआय) स्वागत करत अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या सहभागाला परवानगी दिली.  

या कार्यक्रमात बोलताना, केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी किफायतशीर आणि स्वदेशी तंत्रज्ञानासह भारत आता अंतराळ संशोधन कार्यक्रमात कशा प्रकारे भरारी घेत आहे हे अधोरेखित केले.

अंतराळ तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रांवर होत असलेला परिवर्तनशील परिणाम देखील त्यांनी अधोरेखित केला. 

अंतराळ आणि उपग्रह तंत्रज्ञानाविषयी भारताच्या आत्मनिर्भरतेला बळकट करत केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी दळणवळण तसेच संपर्क व्यवस्था सुधारण्यात इस्रोने निभावलेल्या भूमिकेची देखील चर्चा केली. इस्रोतर्फे 433 परदेशी उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले असून त्यातून इस्रोला 292 दशलक्ष युरो आणि 172 दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न मिळाले आहे हे त्यांनी ठळकपणे नमूद केले.

02.JPG

चंद्रयान आणि आदित्य एल 1 यांसारख्या महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांमध्ये महिलांनी मध्यवर्ती भूमिका निभावल्याचा आवर्जून उल्लेख करत डॉ.जितेंद्र सिंह यांनी समावेशक अंतराळ परिसंस्थेची जोपासना करण्यासाठी भारत करत असलेले प्रयत्न अधोरेखित केले.

भारत किफायतशीर, भविष्यवेधी आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने संरचित आणि संपूर्णतः स्वदेशी पद्धतीने विकसित तंत्रज्ञानांसह जागतिक अंतराळविषयक शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी दिली. भारतीय अंतराळ क्षेत्र केवळ जागतिक मार्ग अनुसरणार नाही तर अंतराळ संशोधन क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात करत जागतिक मंचावर स्वतःची नेतृत्ववादी भूमिका घडवणार आहे याचा पुनरुच्चार करत त्यांनी भाषणाचा समारोप केला.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2106217) Visitor Counter : 13


Read this release in: English , Tamil , Urdu