सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
अली यावर जंग राष्ट्रीय मूक व कर्णबधीर (दिव्यांगजन) प्रशिक्षण संस्थेतर्फे कर्णबधीर उपजीविका मेळा 2025 चे यशस्वी आयोजन – श्रवणदोष असलेल्या व्यक्तींसाठी रोजगाराच्या समान संधींच्या दिशेने वाटचाल
प्रविष्टि तिथि:
22 FEB 2025 4:05PM by PIB Mumbai
अली यावर जंग राष्ट्रीय मूक व कर्णबधीर (दिव्यांगजन) प्रशिक्षण संस्थेने [AYJNISHD(D)] मुंबईत वांद्रे पश्चिम इथल्या AYJNISHD संस्थेत बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या सहकार्याने कर्णबधीर उपजीविका मेळा 2025 चे यशस्वी आयोजन केले. जागतिक सामाजिक न्याय दिनी आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमाद्वारे नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या कर्णबधीर व्यक्तींना रोजगार देणाऱ्या संभाव्य व्यावसायांशी संवाद साधता आला, व्यवसाय संधी जाणून घेता आल्या आणि कृत्रिम प्रज्ञेवर आधारित कार्यक्रमांमधून कौशल्यवृद्धी करता आली.

कर्णबधीर उपजीविका मेळा 2025 च्या आयोजनासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सहाय्य लाभले. रोजगाराच्या समान संधींना महत्त्व देणाऱ्या या रोजगार मेळ्याला नोकरी शोधणाऱ्या आणि देणाऱ्याही व्यक्तींकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात भारतीय सांकेतिक भाषेतील दुभाषी व्यक्ती सहभागी झाल्यामुळे सर्व सहभागींना सर्वसमावेशकता व सुलभतेचा अनुभव घेता आला.
मेळ्यात सहभागी झालेल्या नोकरी देऊ करणाऱ्या संस्थांमध्ये महाराष्ट्र राज्य दिव्यांगजन आर्थिक विकास महामंडळ, राष्ट्रीय दिव्यांग करिअर सेवा केंद्र, अटिपीकल ऍडव्हान्टेज, डॉ. रेड्डीज फाउंडेशन, टेक महिंद्रा फाउंडेशन, ऍमेझॉन, बिग बास्केट, कल्पवृक्ष प्रा. लि. यासारख्या प्रमुख संस्थांचा समावेश होता. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे कामासाठी सर्वसमावेशक व वैविध्यपूर्ण सुविधा उपलब्ध करण्याप्रतीची त्यांची वचनबद्धता अधोरेखित होते.

AYJNISHD(D) चे संचालक डॉ. सुमन कुमार या मेळ्याच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले, “कर्णबधीर उपजीविका मेळ्याने नोकरीइच्छुक व नोकरी देणाऱ्यांच्याही सहभागातून श्रवणदोष असलेल्या व्यक्तींच्या आर्थिक समावेशनाला एक नवी उंची प्राप्त करुन दिली आहे.” अखिल भारतीय कर्णबधीर महासंघाचे अध्यक्ष सुनील सहस्रबुद्धे म्हणाले, “नोकरी देऊ करणाऱ्या व नोकरी मिळविण्यास इच्छुक असणाऱ्या अशा दोघांनाही एकत्र आणून आम्ही रोजगार मिळविण्यातील अडचणी कमी करीत आहोत आणि कर्णबधीर व्यक्तींसाठी समान संधी पुरवित आहोत.”
या मेळ्यातून केवळ तत्काळ रोजगाराच्या संधीच मिळाल्या नाहीत तर सर्वसमावेशक कामाच्या ठिकाणांबाबतच्या धोरणांचे महत्त्वदेखील अधोरेखित झाले. सहभागी व्यावसायिक आस्थापनांनी कर्णबधीर व्यक्तींची क्षमता व कौशल्ये ओळखून या उपक्रमाची प्रशंसा केली.
या मेळ्यात नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या 200 कर्णबधीर व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमातून त्यांना नोकरीसाठी मुलाखती देता आल्या, नवीन ओळखी करुन घेण्याच्या संधी मिळाल्या, स्वयंरोजगार व कौशल्य विकास कार्यशाळेत सहभागी होता आले. याचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. AYJNISHD (D) आणि त्यांच्या सहयोगी संस्थांनी सर्व व्यावसायिक, नेमणूककर्ते आणि हा मेळा यशस्वी होण्यामध्ये योगदान दिलेल्या सर्व संबंधितांचे आभार मानले.
AYJNISHD(D) विषयी
अली यावर जंग राष्ट्रीय मूक व कर्णबधीर (दिव्यांगजन) प्रशिक्षण संस्था ही मूक व कर्णबधीर व्यक्तींच्या सक्षमीकरणाच्या कार्याला समर्पित एक प्रमुख संस्था आहे.
***
M.Pange/S.Patil/S.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2105534)
आगंतुक पटल : 48
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English