नौवहन मंत्रालय
आंतरराष्ट्रीय सागरी संघटना (आयएमओ) चे सरचिटणीस आर्सेनियो डोमिंग्वेझ यांनी मुंबईत पवई येथील सागरी प्रशिक्षण संस्थेला दिली भेट
Posted On:
20 FEB 2025 10:42PM by PIB Mumbai
मुंबई, 20 फेब्रुवारी 2025
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एससीआय ) आणि एससीआय लँड अँड अॅसेट्स लिमिटेड (SCILAL) यांनी मुंबईत पवई येथील सागरी प्रशिक्षण संस्थेत (एमआयटी )आयोजित केलेल्या कार्यक्रमाला,आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे सरचिटणीस आर्सेनियो डोमिंग्वेझ पहुणे उपस्थित होते. या कार्यक्रमाला बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, भारतीय नौदल, तटरक्षक दल, संबंधित सागरी संघटनांचे प्रमुख अधिकारी आणि तरुण प्रशिक्षणार्थी (कॅडेट्स)उपस्थित होते.

आपल्या भाषणात,आयएमओ सरचिटणीस आर्सेनियो डोमिंग्वेझ यांनी सागरी सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, AI, AIS, स्वयंचलित किंवा मानवरहित जहाजे यासारख्या तांत्रिक प्रगती आणि जगभरातील सागरी पायाभूत सुविधांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यात, IMO बजावत असलेल्या भूमिकेचा कौतुकाने आणि अगत्याने उल्लेख केला. कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेणारा सागरी उद्योग उभारण्याबाबत भारताच्या प्रयत्नांचे, त्यांनी कौतुक केले आणि IMO ची जागतिक उद्दिष्टे साध्य करण्यात असलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या महत्त्वाचा पुनरुचार केला. कोविड-19 महासाथीच्या काळात निर्माण झालेल्या आव्हानांवर विचार मांडताना ते म्हणाले की, "नो शिपिंग, नो शॉपिंग" अर्थात सागरी व्यवहार नाही तर व्यापार नाही, हे जागतिक व्यापारात खलाशांच्या महत्त्वाच्या भूमिकेची एक मार्मिक आठवण करून देणाऱ्या वाक्याचा उल्लेख आता 'नो सीफेअरर, नो शिपिंग, नो शॉपिंग' अर्थात खलाशी नसेल तर नौवहन नाही आणि नौवहन नाही तर व्यापार नाही, असा करायला हवा. भविष्यावर लक्ष केंद्रित करत सरचिटणीसांनी, विकसनशील अर्थव्यवस्थांसोबत सतत तांत्रिक सहकार्य करण्याचे आणि उद्योग पद्धतींमध्ये पारदर्शकता आणण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात बोलताना, नौवहन महासंचालकांनी (DGS), तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचे स्थान अधोरेखित केले, तसेच भारताला जागतिक सागरी नेतृत्व म्हणून पुढे आणू शकणाऱ्या मेरीटाईम इंडिया व्हिजन (MIV) 2030 आणि मेरीटाईम अमृत काल व्हिजन 2047 या उपक्रमांवर भर दिला.त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाद्वारे सागरी क्षेत्राला मिळालेल्या सरकारच्या पाठबळाचा उल्लेख केला आणि IOCE SMART, IMO प्रकल्प आणि ग्रीन शिपिंग पॉलिसी म्हणजेच पर्यावरण पूरक सागरी वाहतूक धोरण, या सारख्या प्रमुख उपक्रमांची रूपरेषा मांडली.महासंचालकांनी ‘सागरमाला’ उपक्रम, जहाज पुनर्प्रक्रिया शाश्वतता, तांत्रिक प्रगती आणि “सागर में योग” आणि “सागर में सम्मान” सारखे महत्त्वाचे खलाशी कल्याण कार्यक्रम, तसेच सागरी राष्ट्रीय खेळ, यांबाबतही यावेळी ऊहापोह केला.

एससीआय आणि एससीआयएलएएल चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन बी. के. त्यागी यांनी सहभागींचे स्वागत केले आणि सागरी सुरक्षा तसेच पर्यावरणीय शाश्वततेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी जहाजबांधणी आणि भारतीय मालवाहतूक जहाजांची धारण क्षमता ( इंडियन फ्लॅग्ड टनेज) वाढवण्याच्या भारताच्या ध्येयाचा पुनरुच्चार केला. आयएमयूच्या कुलगुरू डॉ. मालिनी व्ही. शंकर यांनी सागरी शिक्षण आणि संशोधनातील आयएमयूच्या प्रगतीबाबत, तसेच बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयासाठी, विचार किंवा सल्लापुरवठादार (थिंक टँक) म्हणून आयएमयू च्या भूमिके बाबत चर्चा केली. विविध लिंगभाव असलेले विद्यार्थी आणि समावेशकता यावर विद्यापीठाने केंद्रित केलेल्या लक्ष्यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला.
त्यानंतर प्रश्नोत्तरांचे सत्र झाले.या सत्रात तरुण प्रशिक्षणार्थींनी जागतिक नौवहन क्षेत्राच्या शाश्वत आणि सुरक्षित भविष्यासाठी त्यांना काय करायचे आहे आणि त्याबाबत त्यांच्या महत्त्वाकांक्षा काय आहेत या बद्दल त्यांची मते मांडली. डोमिंग्वेझ यांनी भूतकाळातील चुकांमधून शिकणे आणि नाविकांसाठी गुंतवणूक करण्याचे महत्त्व,आणि सहकार्य यावर भर दिला.


समारंभाचा समारोप शिपिंगचे उपमहासंचालक (डीडीजी,डीजीएस) दीपेंद्र सिंग बिसेन यांच्या आभार प्रदर्शनाने झाला, त्यानंतर डोमिंग्वेझ यांनी एमटीआयच्या सुविधांची पाहणी केली आणि शाश्वततेचे प्रतीक म्हणून रोपटे लावले. या कार्यक्रमाने आंतरराष्ट्रीय सहकार्य, शाश्वतता आणि जागतिक सागरी उद्योगाच्या वाढी साठी भारतीय सागरी संस्थेच्या वचनबद्धतेला बळकटी दिली.
S.Bedekar/A.Save/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2105173)
Visitor Counter : 26