माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘अचप्पाज् अल्बम’ हा एनएफडीसीचा मल्याळम चित्रपट बर्लिनेलच्या युरोपियन फिल्म मार्केट 2025 मध्ये प्रदर्शित
अचप्पाज् अल्बम आणि कार्केन अशा चित्रपटांद्वारे एनएफडीसी भारतीय कथांना जागतिक व्यासपीठावर प्रतिष्ठा मिळवून देत आहे
Posted On:
19 FEB 2025 7:55PM by PIB Mumbai
मुंबई, 19 फेब्रुवारी 2025
भारतीय चित्रपटसृष्टीच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारा, ‘अचप्पाज् अल्बम’ (इंग्रजी शीर्षक: ग्रॅम्पाज् अल्बम), हा एक हृदयस्पर्शी मल्याळम भाषेतील बालचित्रपट, जर्मनीत सुरू असलेल्या बर्लिन चित्रपट महोत्सव 2025 चा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या युरोपियन फिल्म मार्केट (ईएफएम) मध्ये प्रदर्शित झाला.
पिढ्यानपिढ्यांच्या कौटुंबिक बंधावरील एक अनोखे नाट्य सादर करणारा ‘अचप्पाज् अल्बम’ हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करेल. या चित्रपटातील काल्पनिकता आणि विनोदाचे मिश्रण यांचा आनंददायी अनुभव मुलांसोबत प्रौढांनाही नक्कीच भुरळ घालेल. ‘अचप्पाज् अल्बम’ हा चित्रपट म्हणजे काल्पनिकता, टाईम ट्रॅव्हल, व्यक्तीमत्वाची अदलाबदल आणि स्वतःचा शोध अशा अनेक धाग्यांनी विणलेला शेला आहे. आदिनाथ कोठारे, प्रियंका नायर, ओमाना औसेफ, अंजना अप्पुकुट्टन, जॉनी अँटनी आणि नवोदित सिद्धांशू संजीव सिवन यांसारख्या विविध भाषिक प्रसिद्ध कलाकारांच्या चमूचे नेतृत्व डॉ. मोहन आगाशे यांच्याकडे असून ते या चित्रपटात रोमांचकारी दुहेरी भूमिका साकारत आहेत.
असा हा अनोखा भविष्य काळातील चित्रपट 15 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनाने आंतरराष्ट्रीय वितरक, चित्रपट महोत्सव आयोजक आणि चित्रपटप्रेमींना जगभरात आकर्षणाचा विषय असलेल्या भारतीय कथाकथनाचा आस्वाद घेण्याची संधी दिली.

दुसरीकडे, बर्लिनेल चित्रपट महोत्सवाच्या प्रसिद्ध फोरम विभागात प्रदर्शनाकरिता विचारात घेण्यासाठी एनएफडीसी च्या ‘कार्केन’ चित्रपटालाही आमंत्रित करण्यात आले होते. मात्र हा चित्रपट त्या विभागाच्या अंतिम यादीत पोहोचू शकला नाही. ‘कार्केन’ या चित्रपटात अरुणाचलमधील एका ग्रामीण डॉक्टरची कथा रंगवण्यात आली आहे. कर्तव्य आणि स्वप्नांमध्ये अडकलेला हा डॉक्टर अभिनय क्षेत्रात उतरण्याकरिता द्याव्या लागणाऱ्या ऑडिशनसाठी आपली नोकरी आणि नातेसंबंध धोक्यात घालतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक संकटे उलगडत असताना त्याला प्रेमभंग, कौटुंबिक संघर्ष आणि जीवन-मरणाचा प्रश्न बनणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीचाही सामना करावा लागतो. शेवटी, नवीन स्पष्टतेसह, तो त्याचा खरा मार्ग स्वीकारतो आणि नव्या रुपात तो ऑडिशनसाठी बाहेर पडतो.

इफ्फी-इंडियन पॅनोरमा समितीने निवड केलेल्या ‘कार्केन’चे सर्वत्र कौतुक झाले. या चित्रपटात अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकारांनी अभिनय केला आहे. चित्रपटाचा जागतिक प्रीमियर 55 व्या इफ्फीमध्ये झाला होता. मणिपूर राज्य चित्रपट विकास महामंडळाच्या इखोइगी इम्फाळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने ईशान्येकडील राज्यांमध्ये प्रीमियरसाठी देखील या चित्रपटाला आमंत्रित केले होते. ‘कार्केन’ चित्रपट 23 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही सादर करण्यात आला होता आणि या महोत्सवाच्या प्रोग्रामिंग चमूने भारतातील सर्वोत्तम समकालीन चित्रपट म्हणून भारतीय चित्रपट विभागांतर्गत त्याची निवड केली होती. हा चित्रपट 15 फेब्रुवारी आणि 17 फेब्रुवारी 2025 रोजी पुण्यात प्रदर्शित करण्यात आला.
हे दोन्ही चित्रपट, वैविध्यपूर्ण भारतीय समाजाच्या चैतन्यशील रचनेतील विविध संस्कृतींचे उत्सव साजरे करणाऱ्या प्रामाणिक भारतीय कथांना प्रोत्साहन देण्याची एनएफडीसीची वचनबद्धता प्रतिबिंबित करतात.
* * *
PIB Mumbai | M.Pange/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2104826)
Visitor Counter : 16