अर्थ मंत्रालय
सीजीएसटी मुंबई विभागाने उघडकीला आणला ₹ 140 कोटींचा बनावट जीएसटी पावत्यांचा व्यवहार
Posted On:
12 FEB 2025 10:00PM by PIB Mumbai
मुंबई, 12 फेब्रुवारी 2025
केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) मुंबई विभागा अंतर्गत, ठाणे सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी 140 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या व्यवहारांचा समावेश असलेले बनावट जीएसटी पावत्यांचे रॅकेट उघडकीला आणले आहे. 26.92 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) चा छडा लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. तपासाअंती, या बनावट व्यवहारांचा सूत्रधार कपाडिया महमद सुलतान याला, प्रॉक्सी आणि डमी व्यवहार करण्यासाठी 18 बनावट कंपन्या निर्माण करून त्यांचे व्यवस्थापन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
सुलतान हा मिरारोड पूर्व, ठाणे येथील रहिवासी असून, त्याच्या विरोधात बनावट पावत्या तयार करण्यासाठी बनावट कंपन्यांचे जाळे तयार केल्याचा आणि वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बेकायदेशीरपणे आयटीसी जारी केल्याचा आरोप आहे. आरोपीने केवळ सरकारची फसवणूक करण्याच्या उद्देशाने रॉयल एंटरप्राइझ, सरस्वती एंटरप्रायजेस, लुकास इन्फ्राट्रेड एलएलपी आणि मारुती ट्रेडिंग यासह 18 हून अधिक डमी कंपन्या स्थापन केल्याचे या तपासात आढळून आले आहे. हा घोटाळा करण्यासाठी सुलतानने अनेक व्यक्तींचे आधार, पॅन आणि इतर केवायसी कागदपत्रांचा गैरवापर केला, जे त्याने पैशांच्या मोबदल्यात मिळवले. त्यानंतर त्याने या ओळखपत्रांचा गैरवापर करून जीएसटीची नोंदणी केली आणि बनावट कंपन्यांच्या नावाने बँक खाती उघडली. तसेच, सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 70 अंतर्गत नोंदवलेल्या जबाबानुसार, त्याने फसव्या आयटीसीचा लाभ घेतल्याची आणि ते जारी केल्याची कबुली दिली.
कपाडिया महंमद सुलतान याला, सीजीएसटी कायद्याच्या कलम 69 अंतर्गत, कलम 132 अन्वये उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. सुलतान याला, 11 फेब्रुवारी 2025 रोजी ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2102536)
Visitor Counter : 44