अणुऊर्जा विभाग
टाटा मेमोरियल सेंटर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्स ने स्तनाच्या कर्करोगावरील हार्मोन थेरपी प्रतिरोधामागील जीनोमिक घटकांची केली उकल
Posted On:
12 FEB 2025 9:29PM by PIB Mumbai
मुंबई, 12 फेब्रुवारी 2025
मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर (टीएमसी) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्स (एनआयबीएमजी) कल्याणी, येथील संशोधकांनी केलेल्या नवीन अभ्यासामधून एस्ट्रोजेन रिसेप्टर-पॉझिटिव्ह (ER+), या स्तनाच्या कर्करोगावरील हार्मोन थेरपी, अर्थात संप्रेरक उपचारांच्या (अंतःस्रावी) प्रतीरोधाला कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख जीनोमिक (गुणसूत्रीय) घटकांची उकल केली आहे. एस्ट्रोजेन रिसेप्टर-पॉझिटिव्ह (ER+) हा भारत आणि जगभरात सर्वसामान्यपणे आढळून येणारा स्तनाच्या कर्करोगाचा उपप्रकार आहे. कम्युनिकेशन्स बायोलॉजी या प्रतिष्ठित नेचर ग्रुप जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या या निष्कर्षांमधून, काही रूग्ण हार्मोन थेरपीला प्रतिसाद का देत नाहीत, अथवा प्रतिसाद देणे का थांबवतात,याबद्दलचा महत्वाचा दृष्टीकोन मिळतो, ज्यामुळे लक्ष्यित उपचारांच्या धोरणाला नवी दिशा प्राप्त झाली आहे.

हे निष्कर्ष महत्वाचे क्लिनिकल परिणाम देत असून, यात हार्मोन थेरपीला प्रतिरोध विकसित करणाऱ्या रूग्णांसाठी डीएनए-हानिकारक असलेल्या औषधांच्या संभाव्य पुनप्रयोजनाचा समावेश आहे.
"हे संशोधन कर्करोगावरील वैयक्तीकीकृत उपचारामधील एक महत्वाचा टप्पा आहे. औषध प्रतीरोधाचा सर्वाधिक धोका असलेले रुग्ण लवकर ओळखून, आपण उपचाराचे धोरण ठरवून, परिणामांमध्ये सुधारणा घडवू शकतो." एनआयबीएमजीमधील अभ्यासाचे प्रमुख संशोधक आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. निधान बिस्वास यांनी सांगितले. "या संशोधनामुळे भारतीय रूग्णांसाठी अचूक औषधे विकसित करण्यासाठी कर्करोगावरील मूलभूत संशोधनातील गुंतवणुकीचे महत्व अधोरेखित होत आहे." एनआयबीएमजीचे सह संचालक अरिंदम मैत्रा म्हणाले. ते या अभ्यासाचे प्रमुख संशोधक आहेत.
स्तनाचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये सर्वाधिक निदान होत असलेला कर्करोग आहे, महिलांमधील कर्करोगात त्याचे प्रमाण 28.2% असून, 2022 मध्ये त्याची अंदाजे 216,108 प्रकरणे आढळून आली. यापैकी अंदाजे 50-60% इस्ट्रोजेन रिसेप्टर-पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे कर्करोगाच्या पेशी एस्ट्रोजेन रिसेप्टर (ईआर) नावाची प्रथिने निर्माण करतात, ज्यामुळे त्या हार्मोन थेरपीसाठी अतिसंवेदनशील बनतात. टॅमोक्सिफेन आणि अरोमाटेज इनहिबिटर यासारख्या अंतःस्रावी उपचारांनी जगण्याच्या प्रमाणात लक्षणीय सुधारणा झाली आहे. सुमारे 25% रुग्णांमध्ये या औषधांना प्रतिरोध विकसित होतो, ज्यामुळे रोगाची पुनरावृत्ती होते आणि उपचारांना यश मिळत नाही. आतापर्यंत, या प्रतिरोधामागील नेमकी जीनोमिक यंत्रणा अस्पष्ट होती. या अभ्यासात संशोधकांनी मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर, येथे उपचार घेत असलेल्या 40 एस्ट्रोजेन रिसेप्टर पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांचे स्तनाच्या ट्यूमरचे आणि सामान्य उतीचे (बुकल म्यूकोसा किंवा रक्त) नमुने, याचे संपूर्ण-जीनोम अनुक्रमण केले. यापैकी निम्म्या रुग्णांमध्ये हार्मोन थेरपी-प्रतिरोधक ट्यूमर होते, तर उर्वरित निम्म्या रुग्णांमध्ये संप्रेरक उपचारांनी नियंत्रित राहणारा कर्करोग होता. उच्च-थ्रूपुट जीनोमिक डेटावर प्रगत संगणकीय आणि बायोइन्फॉरमॅटिक विश्लेषणे लागू करून, संशोधकांनी उपचार प्रतीरोधला जबाबदार असलेल्या दोन प्रमुख यंत्रणा ओळखल्या.
या अभ्यासातून सर्वप्रथम तीन-जनुक प्रतिरोधक सिग्नेचर म्युटेश - PIK3CA, ESR1 आणि TP53 जनुकांमधील उत्परिवर्तन उघड झाले, ज्याचा अंतःस्रावी उपचार प्रतीरोधाशी निकटचा संबंध आहे. हे अनुवांशिक बदल कर्करोगाच्या पेशींना अँटी-एस्ट्रोजेन औषधे असूनही जिवंत राहायला सक्षम करतात, ज्यामुळे रोगाची पुनरावृत्ती आणि प्रगतीची शक्यता वाढते.
दुसरे, अभ्यासामध्ये असे आढळले आहे, की प्रतिरोधक ट्यूमरमध्ये, विशेषत: डबल-स्ट्रँड ब्रेक दुरुस्तीमध्ये सदोष डीएनए दुरुस्ती यंत्रणा होती. या दोषामुळे जीनोमिक अस्थिरता आणि अनियंत्रित ट्यूमरची वाढ होते, ज्यामुळे हे कर्करोग उपचारांना प्रतिरोधक बनतात.
संपूर्ण अभ्यास कम्युनिकेशन्स बायोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आला असून, तो पुढील लिंक वर वाचता येईल:
https://www.nature.com/articles/s42003-025-07606-x
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2102529)