इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महा हॅकेथॉन चॅलेंज 1.0 सार्वजनिक सेवा वितरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानविषयक उपाय राबवण्यासाठी सज्ज


आपत्ती व्यवस्थापन आणि डिजिटल शासनाला गती देण्याचे नवोन्मेषकांना आवाहन

Posted On: 11 FEB 2025 7:50PM by PIB Mumbai

मुंबई, 11 फेब्रुवारी 2025

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल इंडिया भाषिणी विभागाने महाराष्ट्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने आज महा हॅकेथॉन चॅलेंज 1.0 चा प्रारंभ केला.

एआय-चालित शासन, ड्रोन-आधारित आपत्ती व्यवस्थापन, अँटी-ड्रोन सुरक्षा आणि वास्तविक वेळेत भाषण अनुवाद उपायांमध्ये नवोन्मेषाला चालना देणे हे या आव्हानाचे उद्दिष्ट आहे. याचा प्रारंभ महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला.यावेळी उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि  अजित पवार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री  आशिष शेलार उपस्थित होते.

महा हॅकेथॉन चॅलेंज 1.0 तंत्रज्ञान उत्साही, नवोन्मेषक  आणि विकासकांना देशभरातील शासन आणि आपत्ती प्रतिसादावर परिणाम करणाऱ्या महत्वपूर्ण  समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आमंत्रित करते. सहभागींना व्यापक , प्रभावी उपाय तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते जे सार्वजनिक सेवा वितरण सुधारतील , डिजिटल समावेशकतेला प्रोत्साहन देतील आणि तंत्रज्ञान  प्रगतीला चालना देतील.

आव्हानात चार श्रेणींचा समावेश आहे:

श्रेणी 1: शासनात एआयचा वापर

ही श्रेणी प्रशासकीय कामकाज सुधारणे, तक्रार निवारण प्रणाली प्रभावी बनवणे आणि महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणि विविध शहरी तसेच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संसाधन वाटप प्रभावी बनवण्यावर लक्ष केंद्रित करते. कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित उपायांमुळे  प्रक्रिया स्वयंचलित होणे आणि पारदर्शकता सुधारणे अपेक्षित आहे.

श्रेणी 2: आपत्ती व्यवस्थापनात ड्रोनचा वापर

पूर, दुष्काळ, औद्योगिक क्षेत्रात आगीच्य घटना  आणि दरड कोसळण्याचा धोका असलेल्या महाराष्ट्राला आपत्तींच्या काळात बाधित भागांमध्ये लवकर पोहोचण्यात अडचणी येतात. ड्रोन वास्तविक वेळेत देखरेख , नुकसानीचे मूल्यांकन आणि आपत्कालीन मदत वितरणासाठी एक अभिनव  दृष्टीकोन सादर  करतो आणि  आपत्ती प्रतिसादात अत्यावश्यक उपाय प्रदान करतो.

श्रेणी 3: ड्रोनविरोधी तंत्रज्ञान

मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या शहरी विभागांमधील  सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेता, अनधिकृत ड्रोन कारवायांमुळे विमानतळ, सरकारी कार्यालये, संरक्षण क्षेत्र आणि प्रमुख कार्यक्रमांना गंभीर धोका निर्माण होतो. ही श्रेणी ड्रोन-विरोधी तंत्रज्ञान वापरून या धोक्यांविरोधात लढण्यासाठी उपाय आमंत्रित करत आहे.

श्रेणी 4: भाषिणीचा वापर करून प्रत्यक्ष भाषणाचा अनुवाद

महाराष्ट्राच्या भाषिक विविधतेमुळे, अधिकृत निवेदन  आणि सेवांचा वास्तविक-वेळेत अनुवाद  करण्याची नितांत गरज आहे. ही श्रेणी भाषेतील अडथळे दूर करण्यासाठी आणि सरकारी सेवा सर्व नागरिकांना, विशेषत: ग्रामीण भागातील आणि मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलुगू आणि आदिवासी भाषा बोलणाऱ्यांपर्यंत सहज पोहचाव्यात यासाठी एआय -सक्षम भाषण अनुवाद वापरण्यावर लक्ष केंद्रित करते.

महा हॅकेथॉन चॅलेंज 1.0 सहभागींना भारतीय भाषा आणि स्थानिक गरजांमध्ये रुजलेले व्यवहार्य उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहित करते, ज्यामुळे देशभरात डिजिटल सक्षमीकरणाला चालना मिळेल.  भारताच्या तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत आणि सर्वसमावेशक भविष्यात योगदान देण्यासाठी नवोन्मेषकांना व्यासपीठ प्रदान करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

अधिक माहिती आणि नोंदणीसाठी, कृपया येथे महा हॅकेथॉन चॅलेंज पोर्टलला भेट द्या: https://bhashini.gov.in/sahyogi/startup/maha-innovation


N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2101983) Visitor Counter : 15


Read this release in: English