रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केमेक्सिल उत्कृष्ट निर्यातदारांना प्रतिष्ठित निर्यात पुरस्कार समारंभात करणार सन्मानित


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि खते आणि रसायन राज्यमंत्री अनुप्रिया पटेल निर्यात प्रोत्साहन परिषद- केमेक्सिलच्या निर्यात पुरस्कार समारंभाला राहणार उपस्थित

Posted On: 07 FEB 2025 3:48PM by PIB Mumbai

भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने स्थापन केलेली केमेक्सिल अर्थात मूलभूत रसायने, रंग आणि सौंदर्य प्रसाधने निर्यात प्रोत्साहन परिषद उद्या( 8 फेब्रुवारी 2025 रोजी) मुंबईत ग्रँड हयात हॉटेल येथे प्रतिष्ठित निर्यात पुरस्कार समारंभ आयोजित करणार आहे. या कार्यक्रमाला  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि खते आणि  रसायन राज्यमंत्री अनुप्रिया पटेल प्रमुख अतिथी म्हणून आणि महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

भारतीय रसायन उद्योगाचे आकारमान 2022 मध्ये अंदाजे 220 अब्ज डॉलर  होते आणि 2025 मध्ये ते 300 अब्ज डॉलर, तर 2040 मध्ये एक ट्रिलियन डॉलर होण्याचा अंदाज आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा तो एक अविभाज्य घटक आहे ज्याचे भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात 7% योगदान आहे. भारतीय रसायनांचे जागतिक रसायन उद्योगात 2.8 ते 3% योगदान आहे.  भारतीय रसायन उद्योगात मोठ्या प्रमाणावर विविधता आहे ज्यामध्ये 80,000 पेक्षा जास्त व्यावसायिक उत्पादने आहेत. या उद्योगात अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे 20 लाख लोकांना रोजगार मिळत आहे.

या पुरस्कार समारंभाविषयी बोलताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि खते आणि  रसायन राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी मूलभूत रसायने, डाईज, आणि डाय इंटरमिजिएट्स, सौंदर्यप्रसाधने आणि टॉयलेटरीज, एरंडेल तेल विशेष रसायने यामधील निर्यातदारांचा सन्मान करण्यासाठी हा निर्यात पुरस्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल केमेक्सिलची प्रशंसा केली.  त्या म्हणाल्या की भारतीय रसायन उद्योग हा औद्योगिक विकासाचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे. व्यापार आणि शाश्वततेमध्ये  आपण नवे टप्पे सर करत असताना रसायन उद्योगाने नव्या तंत्रज्ञानाचा, शाश्वत पद्धतींचा आणि मूल्यवर्धित उत्पादनाचा अंगिकार करावा असे आवाहन त्यांनी केले.भारत सरकार आपल्या निर्यातदारांच्या प्रगतीसाठी व्यवसाय सुलभतेसह धोरणात्मक पाठबळ देण्यास आणि उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

केमेक्सिल विषयी

रसायन उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाने केमेक्सिलची स्थापना केली आहे.

केमेक्सिलचे अध्यक्ष अभय उदेशी यांनी सांगितले की केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 ने रसायन उद्योगाला भरीव पाठबळ दिले आहे.

यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे.

  • फॉस्फोरिक ऍसिड, बोरिक ऍसिड, सॉर्बिटॉल इ. अत्यावश्यक कच्च्या मालावरील आयातशुल्कात कपात.
  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना(MSMEs) सर्वसमावेशक पाठबळ .

केमेक्सिलनुसार अर्थसंकल्पात या क्षेत्रासाठी असलेल्या महत्त्वाच्या तरतुदी:

  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना 20 कोटी रुपयांच्या मुदत कर्जासह रु. 20 कोटींची वाढीव पतहमी.
  • सूक्ष्म उद्योगांना खेळत्या भांडवलाकरता 5 लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंतची क्रेडीट कार्ड्स.
  • अनुसूचित जाती आणि जमातीमधील पहिल्यांदाच उद्योजक बनलेल्या महिलांसाठी नव्या योजना.
  • सर्व आकारमानाच्या उद्योगांना पाठबळ देण्यासाठी नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन.
  • निर्यात सुलभतेसाठी रु. 25,000 कोटींचा सागरी विकास निधी
  • निर्यातीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी निर्यात प्रोत्साहन अभियान

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2100789) Visitor Counter : 17


Read this release in: English