नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड आणि बँक ऑफ बडोदा यांनी पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत रूफटॉप सोलार वित्तपुरवठा सुविधा देण्यासाठी केला सामंजस्य करार


भारतीय घरांना स्वच्छ ऊर्जा मिळणे सुलभ बनवण्यासाठी परवडणारे रूफटॉप सोलार वित्तपुरवठा पर्याय

Posted On: 06 FEB 2025 9:49PM by PIB Mumbai

मुंबई, 6 फेब्रुवारी 2025

 

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत (PMSGY) निवासी इमारतींच्या छतावर सौर प्रणाली स्थापित करण्यासाठी परवडणारे वित्तपुरवठा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची उपकंपनी असणाऱ्या टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड (TPREL) ने बँक ऑफ बडोदासोबत सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली आहे.  या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट संपूर्ण भारतात छतावरील सौरऊर्जा (रूफटॉप सोलार) प्रणालीच्या अवलंबनाला गती देणे हे आहे. यामुळे घरांना सहज आणि त्रास-मुक्त वित्तपुरवठा उपाय उपलब्ध होतील आणि याद्वारे देशाचे नवीकरणीय ऊर्जेकडे संक्रमण होण्यास मदत होईल.  टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड आणि बँक ऑफ बडोदा यांनी या सामंजस्य कराराद्वारे छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापन सुलभ, परवडणारे बनवण्याचा आणि लोकांना ही प्रणाली व्यापकपणे स्वीकारण्यास प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या करारामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमण आणि शाश्वत उद्दिष्टांना समर्थन मिळेल.

भारतीय कुटुंबांना परवडणारे आणि त्रासमुक्त वित्तपुरवठा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी आणि बँक ऑफ बडोदा यांनी एकत्र येत शाश्वत ऊर्जा उपायांचा अवलंब केला असून, स्वच्छ आणि हरित भविष्याच्या निर्मितीत योगदान दिले आहे.  या सहयोगांतर्गत, अर्जदार 6 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा लाभ घेऊ शकतात, यासाठीचे आकर्षक व्याजदर प्रतिवर्ष 7% पासून सुरू होतात. या कर्जासाठी निश्चित आणि फ्लोटिंग व्याज दर असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

या सहकार्याबद्दल बोलताना बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक ललित त्यागी यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. "भारताची नवीकरणीय ऊर्जा क्षमता 200 गिगावॅट च्या वर गेली असून यात सौरऊर्जा सुमारे 100 गिगावॅट आहे, असेही त्यांनी सांगितले. मजबूत धोरण अंमलबजावणी, वाढलेली स्पर्धात्मकता आणि गुंतवणूकदारांच्या सुसंवादामुळे ही लक्षणीय वाढ शक्य झाली आहे, असे त्यागी यांनी सांगितले. "बँक ऑफ बडोदा सोबतचे हे धोरणात्मक सहकार्य भारतातील प्रत्येक घरात स्वच्छ ऊर्जा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या आमच्या मिशनमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक दीपेश नंदा यावेळी म्हणाले. परवडणारे आणि सोयीस्कर वित्तपुरवठा पर्याय उपलब्ध करून देऊन आम्ही छतावरील सौरऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर सुलभ करण्यासाठी ग्राहकांना सक्षम बनवत आहोत. हा उपक्रम लोकांना केवळ त्यांच्या उर्जेचा खर्च कमी करण्यासाठी मदत  करत नाही तर राष्ट्राच्या नवीकरणीय ऊर्जा उद्दिष्टांमध्ये आणि हवामान बदलाचा सामना करण्याच्या प्रयत्नांमध्ये अर्थपूर्ण योगदानही देत असल्याचे दीपेश नंदा यांनी सांगितले.

पीएम सूर्यघर योजनेचा एक भाग म्हणून जे ग्राहक त्यांच्या घराच्या छतावर 3 kW पर्यंतच्या क्षमतेची सौर ऊर्जा यंत्रणा बसवतील, त्यांना 2 लाखांपर्यंतचे कर्ज उत्पन्नाच्या कागदपत्रांशिवाय मिळू शकेल. या योजनेसाठी केवळ 10 टक्के रक्कम स्वतःचे योगदान म्हणून द्यावी लागेल आणि कर्जावर वार्षिक 7 टक्के दराने व्याज भरावे लागेल. हे कर्ज विनातारण असून परतफेडीसाठी 10 वर्षांपर्यंतची मुदत असेल. यामुळे घरगुती ग्राहकांना सौर ऊर्जा यंत्रणा वाजवी किमतीत बसवता येईल. 3 kW ते 10 kW क्षमतेच्या मोठ्या यंत्रणेसाठी ग्राहकांना 6 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज नियमित योजनेअंतर्गत मिळू शकेल यासाठी ग्राहकांना स्वतःचे योगदान 20 टक्के द्यावे लागेल. बँक ऑफ बडोदाचे गृह कर्ज घेतलेल्या ग्राहकांना सवलतीच्या व्याजदरात म्हणजेच वार्षिक 9.15 ते 11 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल तर अन्य ग्राहकांसाठी हा व्याजदर प्रतिवर्ष 10.15 ते 12 टक्के आकारण्यात येईल. ही कर्जेही विनातारण असून परतफेडीसाठी कमाल 10 वर्षांची मुदत असेल.

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत घराच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसविणारे घरगुती ग्राहक सरकारी अनुदानासाठी पात्र असतील, यामुळे त्यांना यंत्रणा बसविण्यासाठी येणारा आगाऊ खर्च लक्षणीयरित्या कमी होईल. 2 kW पर्यंत क्षमतेच्या सौर ऊर्जा यंत्रणेसाठी ग्राहकांना मूलभूत खर्चाच्या 60 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते. 2 kW ते 3 kW पर्यंतच्या यंत्रणेसाठी 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळेल. 3 kW पेक्षा जास्त क्षमतेची यंत्रणा बसविणाऱ्या ग्राहकांना पहिल्या 3 kW साठी ठराविक अनुदान मिळेल आणि अतिरिक्त क्षमतेसाठी योजनेच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार अतिरिक्त सहाय्य दिले जाईल. हे अनुदान, वाजवी दरातील अर्थसहाय्य यामुळे घराच्या छतावरील सौर ऊर्जा यंत्रणा बसविणे भारतीय ग्राहकांसाठी आणखी सुकर होईल. याद्वारे ग्राहकांना भारताच्या स्वच्छ ऊर्जा रुपांतरणात योगदान देण्याबरोबरच वीज बिल कमी करण्यातही यश मिळेल. या उपक्रमामुळे शाश्वत ऊर्जा पर्यायांना प्रोत्साहन देण्याचा आकर्षक व वास्तविक मार्ग मिळेल आणि जास्तीत जास्त ग्राहकांसाठी सौर उर्जेचा व्यावहारिक पर्याय उपलब्ध होईल.

 

* * *

PIB Mumbai | S.Patil/Shraddha/Surekha/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2100496) Visitor Counter : 29


Read this release in: English