कंपनी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

निष्कार्बनीकरणाची क्षमता वाढवण्यासाठी आयआयसीए आणि कार्बन मार्केट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी

Posted On: 05 FEB 2025 9:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 फेब्रुवारी 2025 

 

भारताच्या कार्बन बाजारपेठेला बळकटी देण्याच्या, आणि कार्बनमुक्तीच्या प्रयत्नांना चालना देण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल म्हणून, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए) आणि कार्बन मार्केट असोसिएशन ऑफ इंडिया (सीएमएआय) यांच्यात नवी दिल्ली येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली.

रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 4 फेब्रुवारी रोजी आयआयसीए-सीएमएआय च्या जागतिक आणि भारतीय कार्बन बाजार विषयक मास्टरक्लासच्या उद्घाटन प्रसंगी या ऐतिहासिक कराराची घोषणा झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी भारताच्या आर्थिक आणि पर्यावरण विषयक भवितव्याला आकार देण्यात जैवइंधन आणि हरित हायड्रोजनच्या असलेल्या महत्वाच्या भूमिकेवर भर दिला.

त्यांनी बायो बिटुमिन, बायो एव्हिएशन-इंधन, बायो सीएनजीशी संबंधित पथदर्शी प्रकल्पांची माहिती दिली आणि "ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर हे भविष्य असून, कोणतेही साहित्य वाया जात नाही" यावर प्रकाश टाकला. पीपीपीचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, "हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे". हायड्रोजनची किंमत प्रति किलो एक डॉलर असावी, असा आपला दृष्टीकोन मांडून, या क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधन आणि विकास उपक्रमांमुळे हे उद्दिष्ट साध्य करणारा  भारत हा अग्रगण्य देश ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जैवइंधन आणि पर्यायी इंधनाशी संबंधित महत्वाच्या उपक्रमांचा उल्लेख करून, भांडवल आणि तंत्रज्ञानाचा सुरुवातीचा खर्च जास्त वाटत असला, तरी सध्या सुरु असलेल्या महत्वाच्या संशोधनामुळे कालपरत्वे त्याची खरी क्षमता लक्षात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

स्वच्छ, अधिक शाश्वत ऊर्जा परिप्रेक्ष्य निर्माण करण्यासाठी विविध इंधनांची असलेली अफाट क्षमता लक्षात घेता, वैविध्यपूर्ण जैवइंधन क्षेत्र विकसित करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे ते म्हणाले, आणि भारत लवकरच हरित हायड्रोजन निर्यातदार देश बनेल, असा विश्वास व्यक्त केला. सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूएल अलायन्स (एसएएफ) सुरू केल्याबद्दल आणि या क्षेत्रात क्षमता विकासाकरता हाती घेतलेल्या उपक्रमांबद्दल त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले.

उद्योग व्यावसायिक, धोरणकर्ते आणि शिक्षण तज्ञांना  भारताच्या विकसित होत असलेल्या कार्बन बाजारपेठेत मार्ग शोधण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्याने सुसज्ज करणे, हे  या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट आहे.

सीएमएआय, ही शाश्वत व्यावसायिक उपक्रमांना गती देण्यावर लक्ष केंद्रित करणारी अग्रगण्य उद्योग संघटना, भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राचा विकास आणि विस्तारला मदत करण्यासाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयांतर्गत, आयआयसीए या थिंक टँकचा नॉलेज पार्टनर म्हणून काम करेल.

या करारानुसार, सीएमएआय आणि आयआयसीए पुढील बाबींमध्ये सहकार्य करतील:

  • प्रशिक्षण कार्यक्रम: कार्बन बाजारपेठ, औद्योगिक क्षेत्राचे कार्बन उत्सर्जन रोखणारे उपाय आणि शाश्वत वित्त सहकार्य यावर अभ्यासक्रम विकसित करणे आणि वितरित करणे.
  • संयुक्त संशोधन: निष्कार्बनीकरण (कार्बन उत्सर्जन रोखणे) रणनीती आणि कार्बन ट्रेडिंग यंत्रणेवरील अभ्यास आणि दृष्टीकोन प्रकाशित करणे.
  • कार्यशाळा आणि संमेलन: उद्योग क्षेत्रातील भागधारक, धोरणकर्ते आणि शिक्षण तज्ञ यांच्यात संवाद सुलभ करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन.
  • धोरण प्रचार: भारताच्या निव्वळ शून्य उत्सर्जन उद्दिष्टाला चालना देणाऱ्या नियामक आणि धोरणात्मक चौकटींना समर्थन देणे.

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2100147) Visitor Counter : 10


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil