नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांची जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला भेट; घेतला विविध प्रकल्पांचा आढावा, भागधारकांसोबतही साधला संवाद

Posted On: 30 JAN 2025 3:50PM by PIB Mumbai

मुंबई, 30 जानेवारी 2025

 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी बुधवार, दि. 29 जानेवारी 2025 रोजी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला (JNPA) भेट दिली. यावेळी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे तसेच वाढवण बंदर प्रकल्प मर्यादीतचे (VPPL  - Vadhvan Port Project Ltd) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उन्मेष शरद वाघ यांनी वाढवण बंदराच्या प्रगतीचे तपशीलवार सादरीकरण केले. भारताची सागरी व्यापार क्षमता वाढवण्यासाठी बंदराचे धोरणात्मक महत्त्व त्यांनी या सादरीकरणात अधोरेखित केले. हा प्रकल्प नियोजित वेळेआधीच पुढे जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पालघरमधल्या वाढवण बंदराशी संबंधित पर्यावरण विषयक मंजुरी, जनसुनावणी आणि प्रत्यक्षात वाढवण बंदर प्रकल्प मर्यादीतच्या पायाभरणीत महत्वाचे योगदान दिल्याबद्दल पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके (भाप्रसे) आणि पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा सत्कारही यावेळी केला गेला.

यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि वाढवण बंदर प्रकल्प मर्यादीत यांच्यात परस्पर सहकार्यपूर्ण भागिदारीविषयक सामंजस्य करार झाला. या भागिदारीअंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वाढवण बंदराच्या कार्यान्वयनाच्या गरजांनुसार आवश्यक कौशल्य - आधारित कार्यक्रमांची आखणी आणि त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठीचे प्रारुप विकसित करणे आणि कौशल्यधारीत विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे सागरी क्षेत्राकरता भविष्यातील गरजांच्यादृष्टीने सज्ज असलेले मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकणार आहे. यावेळी वाढवण बंदर प्रकल्प मर्यादीतच्या आणि मेसर्स आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेड यांच्यात हरित वाढवण बंदरासाठी सागरी किनाऱ्यालगतच्या पुनर्भरण आणि किनारा संरक्षणाच्या बांधकामासंदर्भातील करारारावही स्वाक्षऱ्या केल्या गेल्या.

या भेटीदरम्यान केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी बंदरांचे वापरकर्ते आणि व्यापार प्रतिनिधी अशा बंदराशी संबंधित भागधारकांसोबतही संवाद साधला. त्यांनी या सगळ्यांची मते जाणून घेतली आणि भारताच्या सागरी क्षेत्राच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच व्यापारविषक क्रिया प्रक्रियांचे कामकाज सुरळीत व्हावे यासाठी संभाव्या धोरणात्मक उपक्रमांवरही चर्चा केली. बंदरे म्हणजे देशाच्या आर्थिक विकासाचे प्रवेशद्वार आहेत, आणि जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण हे भारताच्या सागरी क्षमतेचे मोठे उदाहरण आहे असे शंतनू ठाकूर यावेळी म्हणाले. पायाभूत सुविधांचा विकास आणि कार्यान्वयन पद्धतींमध्ये सुधारणा आणि अद्ययावतीकरणामुळे प्रगतीला कशारितीने चालना मिळते आहे याचा अनुभव आपल्याला आजच्या भेटीत आल्याचेही त्यांनी सांगितले. भागधारकांसोबत साधलेल्या संवादातून व्यापार विषयक बदलत्या गरजा आणि अपेक्षांशी संबंधित महत्वाचे मुद्दे सखोलपणे समजून घेता आल्याचेही त्यांनी ठळकपणे अधोरेखित केले. वाढवण बंदरासारखे धोरणात्मक प्रकल्प प्रत्यक्ष सुरू करण्यासारख्या कृतीतून आपली व्यापारी क्षमता आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढवण्याचा मार्ग प्रशस्त होत असल्याचेही ते म्हणाले. सागरी उद्योगाला सक्षम करणारी,  यासाठी आवश्यक रसद सुरळीत करणारी आणि जागतिक व्यापारातील एक प्रमुख देश म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट करणारी धोरणे राबवण्यासाठी तसेच त्यादृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्या या भेटीदरम्यान शंतनू ठाकूर यांनी जवाहरलाल नेहरू बंदरातील लँडिंग जेट्टीवरील प्रवेशद्वार इमारतीचे बांधकाम आणि त्या लगतच्या परिसराच्या विकासाच्या कामाचेही भूमिपूजन केले. या इमारतीच्या बांधकामाअंतर्गत इमारतीला वैशिष्टपूर्ण ओळख मिळवून देणाऱ्या मुंबईच्या क्षितीजावर सूर्यास्ताचे दृश्य पाहण्यासाठीची विशेष जागा उभारली जाणार आहे. तसेच इथे अतिरीक्त आसन व्यवस्थेसह उपहारगृहाची सोयही उपलब्ध करून दिली जाणार आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वावरासाठी राखीव क्षेत्र, वाहनांची सुलभ ये जा आणि वाहन तळाच्या दृष्टीने विशेष सुविधा, सुरक्षा रक्षकांसाठी जागा आणि अभ्यागतांच्या सहकार्यासाठी माहिती कक्षाचीही सोय इथे उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे बंदरातून ये जा करणाऱ्या प्रवाशांची तसेच हा परिसर पाहायला येणाऱ्या अभ्यागतांसाठी सोयी सुविधा उपलब्ध होण्यासह या सगळ्याचे सुलभ व्यवस्थापनही शक्य होणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणातील सर्वात कार्यक्षम कंटेनर टर्मिनल्सपैकी एक असलेल्या जीटीआयला (Gateway Terminals India Pvt. Ltd.) देखील भेट दिली. यावेळी जीटीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ठाकूर यांना टर्मिनलच्या कामकाजाविषयी माहिती दिली. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या भेटींमध्ये जवाहरलाल नेहरू बंदर प्रधिकरणातील सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा (CPP), जवाहरलाल नेहरू बंदर प्रधिकरण विशेष आर्थिक क्षेत्र (JNPA SEZ) आणि विशेष आर्थिक क्षेत्राअंतर्गतचे मुक्त व्यापार गोदाम क्षेत्र (Free Trade Warehousing Zone  - FTWZ) या आणि अशा प्रमुख पायाभूत सुविधा आणि कार्यान्वयीन कामकाजविषयक सुविधांचा समावेश होता.

 

जेएनपीए बद्दल:

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण हे भारतातील कंटेनर हाताळणी बंदरांमधले एक प्रमुख बंदर आहे. 26 मे 1989 रोजी या बंदराची स्थापना झाली होती. तेव्हापासूनच जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने स्वतःला  मोठ्या प्रमाणातील मालवाहतूक हातळणारे बंदर ते देशातले प्रमुख कंटेनर बंदरात परावर्तीत केले आहे.

सद्यस्थितीत जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण हे एनएसआयसीटी, एनएसआयजीटी, बीएमसीटी आणि एपीएमटी अशा पाच कंटेनर टर्मिनलची जबाबदारी सांभाळत आहे.  या बंदरात सामान्य मालवाहतूकीसाठी उथळ पाण्यावरच्या वाहतूकीचा तळही उपलब्ध आहे. सद्यस्थितीत जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण बंदरात असलेल्या  द्रवरुप मालवाहतूक (Liquid Cargo) टर्मिनलचे व्यवस्थापन भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL ) - इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड  (IOCL) संघटनेद्वारा सांभाळले जाते. याव्यतिरिक्त, नव्याने बांधण्यात आलेले सागरी तळ इतर भारतीय बंदरांना परस्परांशी जोडून घेतात, त्यामुळे कंटेनरची किनारपट्टीलगतची सुलभ वाहतूक शक्य होते.

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण हे 277 हेक्टर क्षेत्रावर विस्तारलेले आहे. या बंदराअंतर्गत भारतातील निर्याताभिमुख उद्योगांना चालना देण्यासाठी निर्माण केलेल्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांनी युक्त असे नियोजनबद्ध संरचना असलेल्या  बहु – उत्पादनांच्या विशेष आर्थिक क्षेत्राचे कामकाजही चालवले जाते.

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या माध्यमातूनच महाराष्ट्रातील वाढवण इथे बारमाही, पाण्याच्या गहिऱ्या तळाचे हरीत बंदर विकसित केले जात आहे. या बंदराच्या पूर्ण उभारणीनंतर त्याचा समावेश थेट जागतिक स्तरावरील पहिल्या 10 क्रमांकांच्या बंदरांमध्ये होणार आहे. महत्वाचे म्हणजे आपल्या स्थापनेपासूनच हे बंदर 100% हरित बंदर म्हणून ओळखले जाणार आहे.

 

* * *

PIB Mumbai | S.Tupe/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2097636) Visitor Counter : 41


Read this release in: English