सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जगातील सर्वात मोठा रंगभूमी महोत्सव असलेल्या, भारत रंग महोत्सवाच्या गोवा येथील विभागीय नाट्योत्सवाला गिरीश कर्नाड यांच्या ‘नागमंडळ’’या नाटकाने प्रारंभ


गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाला गोव्यात एक संस्था स्थापन करण्यासाठी केले आमंत्रित

Posted On: 29 JAN 2025 10:03PM by PIB Mumbai

गोवा, 29 जानेवारी 2025

 

गोव्यातील भारत रंग महोत्सवाला (BRM) आज, दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी कला अकादमी, पणजी येथे,भारतातील सर्वात प्रभावशाली नाटककार गिरीश कर्नाड यांनी लिहिलेल्या 'नागमंडल' या गाजलेल्या नाटकाच्या, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने केलेल्या सादरीकरणाने प्रारंभ झाला.

या उदघाटन समारंभाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  आंतरराष्ट्रीय रंगभूमी महोत्सवाचे उदघाटन करताना डॉ. सावंत म्हणाले, की गोव्यात राष्ट्रीय नाट्य विद्यालय (NSD) आणि भारत रंग महोत्सव( BRM) 2025 या दोन्हींचे  सादरीकरण झाल्याने मला अधिक आनंद झाला आहे.“गोवा आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालय(NSD) यांच्यात सहकार्य झाल्यास ते राज्यातील आणि तेथील कलाकारांसाठी अत्यंत लाभदायक ठरेल,असा मला विश्वास  आहे. गोवावासीयांना आणि इतरांनाही त्यांच्या अमूल्य कौशल्याचा वापर करत,त्यांना गोव्यात एक संस्था स्थापन करण्यासाठी, विचार विनिमय करायला मी निमंत्रित करतो. कला, नाट्य आणि संस्कृतीचा हा उत्सव खरोखरच प्रेरणादायी आहे,”असे मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या भाषणात नमूद केले.  

"भारतभरातील अनेक भाषांना एक व्यासपीठ उपलब्ध होणे आणि एवढ्या व्यापक स्तरावर श्रोत्यांपर्यंत पोहोचताना पाहणे, खूप आनंददायी आहे. मला आशा आहे की, भविष्यात, या प्रतिष्ठित महोत्सवात कोंकणीचे प्रतिनिधित्व करण्यात येईल," असेही ते पुढे म्हणाले.

‘नागमंडल’ या वैशिष्ट्यपूर्ण नाटकाने प्रेक्षकांवर खोल परिणाम केला. चंदीगड येथील सात्विक आर्ट सोसायटी,यांनी सादर केलेल्या आणि अमित सनौरिया आणि सर्वेर अली यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाने प्रेम, विवाह आणि सामाजिक संघर्षांची गुंतागुंत अतिशय उत्तमपणे नाटकातून मांडली आहे.

गोव्याचे कला आणि संस्कृती सचिव, सुनील अंचिपाका;गोव्याचे कला आणि संस्कृती संचालक, सगुण आर. वेळीप,या उद्घाटन समारंभास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा सोसायटीचे उपाध्यक्ष प्रा.भारत गुप्ते होते, तर एनएसडीचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी यांनी यावेळी स्वागतपर भाषण केले.

कला आणि संस्कृती संचालनालय, गोवा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या चार दिवसीय महोत्सवात कला अकादमी येथे  1 फेब्रुवारीपर्यंत ‘नागमंडल’सह आणखी चार नाटके सादर होणार आहेत.  

‘भारंगम’ या प्रिय नावाने ओळख असलेला भारत रंग महोत्सव (BRM) हा जगातील सर्वात मोठा रंगभूमी महोत्सव आहे. बीआरएम- 2025 'एक रंग, श्रेष्ठ रंग' (एक अभिव्यक्ती, सर्वोत्तम सृजन) या संकल्पनेसह आयोजित करण्यात आला आहे. प्रख्यात अभिनेते आणि एनएसडीचे माजी विद्यार्थी राजपाल यादव हे यावर्षीचे फेस्टिव्हल ॲम्बेसेडर आहेत. 

28 जानेवारी 2025 ते 16 फेब्रुवारी 2025 असा 20 दिवसांचा कालावधी असलेल्या BRM- 2025 मध्ये भारताव्यतिरिक्त, नऊ वेगवेगळ्या देशांतील दोनशेहून अधिक उत्तमोत्तम नाटके दाखवली जातील, ज्यांचे सादरीकरण भारतात 11 ठिकाणी आणि परदेशात काठमांडू आणि कोलंबो या दोन ठिकाणी होणार आहे. हा उत्सव केंद्रात दिल्लीसह भारतातील गोवा, आगरतळा, अहमदाबाद, भटिंडा, बेंगळुरू, भोपाळ, गोरखपूर, जयपूर, खैरागड आणि रांची या इतर ठिकाणी सुध्दा होणार आहे. महोत्सवात सहभागी होणारे आंतरराष्ट्रीय नाट्य समूह रशिया, इटली, जर्मनी, नॉर्वे, झेक प्रजासत्ताक, नेपाळ, तैवान, स्पेन आणि श्रीलंका या देशांतून आलेले आहेत.

 

* * *

PIB Panaji | S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2097572) Visitor Counter : 17


Read this release in: English