इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भविष्यासाठी सज्ज:भारताची डिजिटल अर्थव्यवस्था 2029-30 पर्यंत राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक पंचमांश योगदान देईल
प्रविष्टि तिथि:
28 JAN 2025 9:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025
मागील दशकात भारतीय अर्थव्यवस्थेचे अतिशय वेगाने डिजिटलायझेशन झाले. आर्थिक विकास , रोजगार आणि शाश्वत विकासाला चालना देण्यात डिजिटल अर्थव्यवस्थेची भूमिका समजून घेणे आणि परिमाण निर्धारित करणे धोरणकर्ते आणि खाजगी क्षेत्र या दोघांसाठी आवश्यक आहे. स्टेट ऑफ इंडियाच्या डिजिटल अर्थव्यवस्था अहवाल 2024 नुसार, अर्थव्यवस्था-निहाय डिजिटलायझेशनच्या बाबतीत भारत हा डिजिटलायझेशन झालेला जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे आणि वैयक्तिक वापरकर्त्यांच्या डिजिटलायझेशन स्तरावर जी 20 देशांमध्ये 12 व्या स्थानी आहे.
भारताची डिजिटल अर्थव्यवस्था एकूण अर्थव्यवस्थेच्या तुलनेत जवळपास दुप्पट वेगाने वाढेल अशी अपेक्षा असून 2029-30 पर्यंत राष्ट्रीय उत्पन्नाच्या जवळपास एक पंचमांश योगदान देईल. याचा अर्थ, सहा वर्षांपेक्षा कमी कालावधीत, देशातील कृषी किंवा उत्पादन क्षेत्रापेक्षा डिजिटल अर्थव्यवस्थेचा वाटा मोठा होईल.
भारताची डिजिटल अर्थव्यवस्था 2022-23 मध्ये जीडीपीच्या 11.74% (31.64 लाख कोटी रुपये किंवा 402 अब्ज डॉलर्स ) योगदान देत आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदानकर्ता म्हणून उदयास आली आहे. 14.67 दशलक्ष कामगारांना (कार्यबळाच्या 2.55%) रोजगार देणारी, डिजिटल अर्थव्यवस्था उर्वरित अर्थव्यवस्थेच्या तुलनेत जवळपास पाचपट अधिक उत्पादक आहे.

पारंपारिक क्षेत्रांचे डिजिटलायझेशन
विविध क्षेत्रांचे कशा प्रकारे डिजिटलायझेशन होत आहे आणि कंपन्यांच्या महसुलातले त्यांचे योगदान याबद्दल प्राथमिक सर्वेक्षण आणि हितधारकांच्या चर्चेने काही रंजक तथ्ये अधोरेखित केली आहेत .
व्यवसायाचे सर्व पैलू एकसमान डिजिटल होत नाहीत. बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात, 95% पेक्षा जास्त बँकिंग पेमेंट व्यवहार डिजिटल आहेत, मात्र वित्तीय सेवा एकूणच कमी डिजिटल असल्यामुळे कर्ज आणि गुंतवणूक यासारख्या महसूल-उत्पादक प्रक्रिया मोठ्या प्रमाणात ऑफलाइन राहिल्या आहेत.
किरकोळ क्षेत्र ओम्नी-चॅनल मॉडेल्सकडे म्हणजे समान अनुभव देणाऱ्या मॉडेल्सकडे वळत असून ई-टेलर्स भौतिक स्टोअर्सची भर टाकत आहेत तर एआय चॅटबॉट्स आणि डिजिटल इन्व्हेंटरी टूल्स कार्यक्षमता वाढवतात.
पुढील वाटचाल
2030 पर्यंत, भारताची डिजिटल अर्थव्यवस्था पारंपारिक क्षेत्रांच्या विकासाला मागे टाकत, देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या जवळपास एक पंचमांश योगदान देईल असा अंदाज आहे. गेल्या दशकात, डिजिटल-सक्षम उद्योगांची वाढ 17.3% झाली आहे.
विशेषतः, डिजिटल प्लॅटफॉर्म्स वेगाने विस्तारत असून आगामी काही वर्षांत अंदाजे 30% वाढीचा दर अपेक्षित आहे. 2022-23 मध्ये, डिजिटल अर्थव्यवस्थेत 14.67 दशलक्ष कामगार, किंवा भारतातील 2.55% कार्यबल होते आणि यापैकी बहुतांश रोजगार (58.07%) डिजिटल-सक्षम उद्योगात आहेत. कार्यबल प्रामुख्याने पुरुष असले तरी, डिजिटल प्लॅटफॉर्मने महिलांसाठी नोकरीच्या संधी वाढवण्यात मोठे योगदान दिले आहे, विशेषत: अशा क्षेत्रांमध्ये जेथे गतिशीलता आणि सुरक्षिततेच्या समस्या पूर्वी अडथळे होत्या.
भारताची डिजिटल अर्थव्यवस्था ही आर्थिक विकास आणि रोजगार या दोन्हींना चालना देणारा प्रमुख घटक आहे, ज्याची कार्यबळात महिलांना सक्षम बनवण्यात आणि विविध क्षेत्रांमध्ये नवीन संधी निर्माण करण्यात व्यापक भूमिका आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मचा झपाट्याने होणारा विस्तार भारतातील कामाच्या भवितव्याला आकार देणाऱ्या विद्यमान परिवर्तनाचे संकेत देत आहे .
संदर्भ :
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2095260
https://www.meity.gov.in/writereaddata/files/Report_Estimation_Measurement.pdf
पीडीएफ साठी इथे क्लिक करा
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2097187)
आगंतुक पटल : 315