सांस्कृतिक मंत्रालय
गोव्यात 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान एनएसडीच्या भारत रंग महोत्सव या जगातील सर्वात मोठ्या नाट्य महोत्सवाचे आयोजन
29 जानेवारी रोजी कला अकादमी येथे होणाऱ्या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार
अभिनेता राजपाल यादव हे भारत रंग महोत्सव 2025 चे रंग दूत आहेत
Posted On:
27 JAN 2025 6:44PM by PIB Mumbai
गोवा, 27 जानेवारी 2025
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, (एनएसडी) गोवा येथे 29 जानेवारी 2025 ते 1 फेब्रुवारी 2025 दरम्यान भारत रंग महोत्सव हा भारतीय आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव आयोजित करत आहे.
29 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता पणजी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर कला मंदिर, कला अकादमी येथे होणाऱ्या उद्घाटन समारंभाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कला आणि संस्कृती संचालनालय, गोवा यांच्या सहकार्याने गोव्यात आयोजित, या चार दिवसीय महोत्सवात कला अकादमी येथे चार नाटके सादर होणार आहेत. गिरीश कर्नाड लिखित ‘नागमंडल’ या नाटकाने या महोत्सवाचा प्रारंभ होईल.
YWC7.jpeg)
‘भारंगम’ या नावाने ओळखला जाणारा भारत रंग महोत्सव हा जगातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव आहे. 'एक रंग, श्रेष्ठ रंग' (एक अभिव्यक्ती, सर्वोच्च निर्मिती ) या संकल्पनेअंतर्गत भारत रंग महोत्सव 2025 आयोजित करण्यात आला आहे. प्रख्यात अभिनेते आणिएनएसडीचे माजी विद्यार्थी राजपाल यादव हे यावर्षीचे रंग दूत (फेस्टिव्हल ॲम्बेसेडर) आहेत.
28 जानेवारी 2025 ते 16 फेब्रुवारी 2025 या 20 दिवसांच्या कालावधीत भारत रंग महोत्सव 2025 मध्ये भारताव्यतिरिक्त नऊ वेगवेगळ्या देशांतील 200 हून अधिक अनोखे नाट्याविष्कार सादर केले जाणार असून भारतात 11 ठिकाणी आणि परदेशात काठमांडू आणि कोलंबो या दोन ठिकाणी ते सादर केले जातील. महोत्सवाचा केंद्रबिंदू असलेल्या दिल्लीसह भारतात गोवा, आगरतळा, अहमदाबाद, भटिंडा, बेंगळुरू, भोपाळ, गोरखपूर, जयपूर, खैरागड आणि रांची येथे हे नाट्याविष्कार सादर होणार आहेत.या महोत्सवात आंतरराष्ट्रीय रंगभूमीवर कार्यरत असलेले नाट्य समूह सहभागी होणार आहेत. त्यामध्ये रशिया, इटली, जर्मनी, नॉर्वे, झेक रिपब्लिक, नेपाळ, तैवान, स्पेन आणि श्रीलंका या देशातील नाट्य समूहांचा समावेश आहे.
दिल्लीतील ‘एनएसडी’ परिसरामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत या महोत्सवाबद्दल बोलताना, एनएसडीचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी म्हणाले, "भारत रंग महोत्सव हा व्यापक दृष्टीकोन असलेला जागतिक व्यासपीठावरचा सर्वोत्कृष्ट नाट्य महोत्सव बनला आहे. या महोत्सवामुळे जगभरातील रंगकर्मींना नाट्य कला सादरीकरणासाठी एक व्यासपीठ तर प्राप्त होतेच , त्याच बरोबर विविध पारंपरिक कला प्रकारांच्या एकत्रीकरणाची संधीही उपलब्ध होते. याशिवाय, महोत्सवामध्ये नाट्य कला आणि इतर सर्जनशील क्षेत्रातील मान्यवरांमध्ये ज्ञान तसेच कल्पनांची देवाणघेवाण सुलभ झाली आहे."
अभिनेते राजपाल यादव यावेळी म्हणाले की, 1997 मध्ये एनएसडीचा विद्यार्थी म्हणून पदवी घेतल्यानंतर, ‘भारंगम 2025’ साठी रंगदूत म्हणून एनएसडीमध्ये परतणे म्हणजे आयुष्यातील एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. “चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्षे साजरी करत असताना, या आगळ्या मेळाव्याचा भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. "मर्यादित साधन सामुग्रीमध्ये येथे साध्य केलेल्या उच्च दर्जाच्या कलात्मकतेचे साक्षीदार होणे, खरोखरच कौतुकास्पद आहे, हे सर्व चित्रपट जगतापेक्षा अगदी वेगळे असून, हे पाहून मी थक्क झालो," असेही राजपाल यादव म्हणाले.

विशेष म्हणजे, भारत रंग महोत्सव, एनएसडीचा 65 व्या वर्धापन दिन आणि ‘एनएसडी रेपर्टरी कंपनी’ चा 60 वा वर्धापन दिनाचा योगायोग साधत आहे. हे महत्वपूर्ण टप्पे लक्षात घेऊन, रेपर्टरी कंपनी रंग षष्ठी नाट्य महोत्सव मालिका साजरी करत आहे. या मालिकेमध्ये देशभरातील विविध व्यासपीठांवर त्यांची काही सर्वात लोकप्रिय नाटके सादर केली जात आहेत. कंपनीच्यावतीने भारत रंग महोत्सव 2025 दरम्यान कोलंबो, काठमांडू, बेंगळुरू आणि गोवा अशा ठिकाणी त्यांची निर्मिती देखील सादर केली जाणार आहे.
गोवा इथे होणा-या भारत रंग महोत्सव कार्यक्रमाचे एका दृष्टिक्षेपात वेळापत्रक:
बुधवार – 29 जानेवारी 2025 (उद्घाटन समारंभ)
नाटक : नागमंडल
वेळ: संध्याकाळी 6:00
लेखक : गिरीश कर्नाड
अनुवाद: बी.आर.नारायण
दिग्दर्शक: अमित सनौरिया आणि सरवर अली
समूह : सात्विकआर्ट सोसायटी, चंडीगढ
भाषा: हिंदी
कालावधी: 110 मिनिटे
|
गुरुवार – 30 जानेवारी, 2025
नाटक : पालशेतची विहीर
वेळ: सायंकाळी 6:30
लेखक : विजयकुमार नाईक
दिग्दर्शन : दीपक आमोणकर
नाट्य समूह : रुद्रेश्वर पणजी, गोवा
भाषा: मराठी
कालावधी: 110 मिनिटे
|
शुक्रवार – 31 जानेवारी, 2025
नाटक : माय री मैं का से कहूं
वेळ: सायंकाळी 6:30
लेखक : विजयदान देठा
दिग्दर्शक : अजय कुमार
नाट्य समूह: एनएसडी रेपर्टरी, नवी दिल्ली
भाषा: हिंदी
कालावधी: 110 मिनिटे
|
शनिवार - 1 फेब्रुवारी, 2025 (समारोप समारंभ)
नाटक: बाबूजी
वेळ: सायंकाळी 6:00
लेखक: मिथिलेश्वर
रूपांतर: विभांशू वैभव
दिग्दर्शक: राजेश सिंग
समूह : एनएसडी रेपर्टरी, नवी दिल्ली
भाषा: हिंदी
कालावधी: 110 मिनिटे
|
* * *
(PR-NSD) | PIB Panaji | N.Chitale/Sushma/Suvarna/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2096782)
Visitor Counter : 51