नौवहन मंत्रालय
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने 76 वा प्रजासत्ताक दिन, देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि शौर्याचा सन्मान करुन केला साजरा
Posted On:
26 JAN 2025 1:01PM by PIB Mumbai

भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने जेएनपीए येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला. जेएनपीएचे अध्यक्ष तसेच वाढवण बंदर प्रकल्पाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उन्मेश शरद वाघ (भारतीय महसूल सेवा) प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रजासत्ताक दिनी, आपण आपल्या लोकशाही मूल्यांचे बळ, एकता आणि सेवेच्या अथक भावनेचा उत्सव साजरा करतो, असे प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात उन्मेश शरद वाघ यांनी सांगितले. आपल्या प्रगतीवर चिंतन करण्याचा हा क्षण आहे. जेएनपीएमधील आपण सर्वजण जागतिक स्तरावर भारताच्या विकासात योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे ते म्हणाले. अलीकडेच, आपल्याला बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचे स्वागत करण्याचा मान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सोनोवाल यांनी जेएनपीएमध्ये अनेक परिवर्तनकारी प्रकल्पांचे उद्घाटन केले. या प्रकल्पांमुळे आपली पायाभूत सुविधा आणि क्षमता आणखी मजबूत झाल्याचे वाघ यांनी सांगितले.

"स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मी म्हटल्याप्रमाणे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नवीन शाळेची स्थापना हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. मला हे सांगताना आनंद होत आहे की नुकतेच, केंद्रीय मंत्री सोनोवाल यांच्या हस्ते या शाळेचा भूमीपूजन समारंभ पाहण्याचे सौभाग्य आपल्याला लाभले. ही शाळा भविष्यात शिक्षणाचा दीपस्तंभ म्हणून काम करेल आणि पुढील पिढीसाठी चांगले भविष्य घडवण्याची आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करेल," असेही वाघ पुढे म्हणाले.
या कार्यक्रमात, 18 डिसेंबर 2024 रोजी बोटीवरील प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या नऊ जेएनपीए आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या सन्मानामुळे या कर्मचाऱ्यांचे शौर्य आणि निःस्वार्थ सेवा अधोरेखित झाली. त्यानंतर, सीआयएसएफ जेएनपीए युनिटने एक रोमांचक डॉग शो आणि रायफल शूटिंगचे प्रात्यक्षिक सादर करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
जेएनपीए शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्सवाच्या आनंदात भर घालणारे तसेच भारताच्या समृद्ध वारशाचा आणि विविधतेचा गौरव करणारे उत्साही सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. जेएनपीएच्या प्रजासत्ताक दिन उत्सवाने राष्ट्रीय सेवेप्रति त्यांची वचनबद्धता आणखी दृढ केली. तसेच धैर्य, अखंडता आणि समर्पण या मूल्यांचे समर्थन करणाऱ्या व्यक्तींच्या प्रयत्नांचा सन्मान केला.
जेएनपीए बाबत अधिक माहिती :
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) हे भारतातील प्रमुख कंटेनर हाताळणी बंदरांपैकी एक आहे. 26 मे 1989 रोजी स्थापन झाल्यापासून, जेएनपीए एका मोठ्या कार्गो टर्मिनलपासून देशातील प्रमुख कंटेनर बंदरात रूपांतरित झाले आहे.
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2096478)
Visitor Counter : 23