ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनटीपीसी पश्चिम क्षेत्र -I मुख्यालयाकडून अंतर्गत संवाद अधिक वाढवण्यासाठी क्षेत्रीय संप्रेषण बैठकीचे आयोजन

Posted On: 21 JAN 2025 6:47PM by PIB Mumbai

मुंबई , 21 जानेवारी 2025

एनटीपीसी पश्चिम क्षेत्र -I मुख्यालयाने आज आपल्या मुंबईतल्या मुख्यालयात पश्चिम क्षेत्र -I प्रकल्प आणि केंद्रांसाठी क्षेत्रीय संप्रेषण बैठकीचे आयोजन केले होते.प्रादेशिक कार्यकारी संचालक (पश्चिम- I), कमलेश सोनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रकल्प प्रमुख, विभाग प्रमुख, प्रादेशिक एचओएचआर, एचओएचआर आणि डब्ल्यूआर-I प्रकल्प आणि केंद्रांचे संघ आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

आपल्या  बीजभाषणात, कमलेश सोनी यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने निराकरण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. संघटनात्मक समन्वय मजबूत करण्यासाठी प्रभावी अंतर्गत संवाद वाढवण्यावर एनटीपीसीने लक्ष केंद्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले."व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना अर्थपूर्ण संवाद साधण्यास, दृष्टिकोन सामायिक करण्यास आणि परस्पर प्रश्न सोडवण्यास सक्षम करण्यात क्षेत्रीय संप्रेषण बैठक महत्त्वपूर्ण मंच आहे. असे मंच एनटीपीसीच्या संकल्पानुरूप प्रयत्नांमध्ये एकरूपता राखण्यात साहाय्यभूत ठरतात. तसेच कर्मचारी प्रतिनिधींकडून रचनात्मक अभिप्राय प्राप्त करण्याची संधीदेखील पुरवतात."असे सोनी यांनी सांगितले. कार्यदलापर्यंत निर्णयांचे अचूक आणि प्रभावी संप्रेषण होईल, याची सुनिश्चिती करण्याचे आवाहन त्यांनी व्यवस्थापन आणि संघांना केले, जेणेकरून सहयोग आणि विश्वासाचे वातावरण वृद्धिंगत होईल.

पश्चिम क्षेत्र -I मुख्यालयाच्या आरएचओएचआर वंदना चतुर्वेदी यांनी आपल्या भाषणात, कामगिरी-केंद्रित आणि लोक-केंद्रित संस्कृतीला चालना देण्यासाठी क्षेत्रीय संप्रेषण बैठकांचे महत्त्व अधोरेखित केले. "प्रभावी संप्रेषण प्रणाली ही संस्थेच्या यशाचा आणि प्रगतीचा पाया असते," असे त्या म्हणाल्या. एनटीपीसीची सहयोगाची तत्त्वे त्यांनी अधोरेखित केली.

या बैठकीत कर्मचारी कल्याण आणि संघटनात्मक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून परस्पर हिताच्या आणि अडचणीच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. एनटीपीसीच्या परिचालनात अधिक समावेशकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्याची वचनबद्धता सत्रादरम्यान झालेल्या रचनात्मक चर्चांमधून प्रकर्षाने दिसून आली.

एनटीपीसीविषयी :

देशातील सर्वात मोठी एकात्मिक ऊर्जा कंपनी, एनटीपीसी (राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ) लिमिटेड, आपल्या विशाल आणि वैविध्यपूर्ण ऊर्जा जाळ्यासह राष्ट्राला ऊर्जा प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. वर्ष 1975 मध्ये स्थापना झालेल्या  एनटीपीसीची कोळसा, गॅस, जलविद्युत, अक्षय आणि अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये एकूण 76 गिगावॅटपेक्षा जास्त स्थापित क्षमता आहे. शाश्वत ऊर्जा उपाय प्रदान करण्याच्या वचनबद्धतेसाठी ओळखली जाणारी  एनटीपीसी,  भारताच्या निव्वळ-शून्य उत्सर्जन भविष्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत,  स्वच्छ ऊर्जा उपक्रम आणि तंत्रज्ञानात अग्रणी आहे.


N.Chitale/S.Kakade/P.Malandkar


 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2094892) Visitor Counter : 28


Read this release in: English