इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस.कृष्णन् यांनी नवी मुंबईत केली संरक्षण धोरणात्मक इलेक्ट्रॉनिक प्रणालीसाठी ईएमआय आणि ईएमसी चाचणी सुविधा केंद्राची पायाभरणी
Posted On:
20 JAN 2025 9:53PM by PIB Mumbai
मुंबई , 20 जानेवारी 2025
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन् यांनी आज नवी मुंबईत धोरणात्मक इलेक्ट्रॉनिक प्रणालीसाठी ईएमआय आणि ईएमसी चाचणी सुविधा केंद्राची पायाभरणी केली. सोसायटी ऑफ ऍप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च(SAMEER) या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संशोधन संस्थेकडून ही प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. चाचणी, प्रमाणीकरण आणि स्वदेशी बनावटीच्या संरक्षण आणि धोरणात्मक इलेक्ट्रॉनिक प्रणालींचे अनुपालन यांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्याच्या दृष्टीने या प्रयोगशाळेची रचना करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे गट समन्वयक एस.के.मारवाहा आणि समीरचे महासंचालक डॉ.पी.हनुमंत राव हे देखील उपस्थित होते.

यावेळी बोलताना एस. कृष्णन् म्हणाले की इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अतिशय ताकदीने भारतात इलेक्ट्रॉनिक उत्पादन निर्मितीचा पाठपुरावा करत आहे. ईएमसी अनुपालन चाचणी आणि प्रमाणीकरणाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी धोरणात्मक इलेक्ट्रॉनिक प्रणालीकरिता ‘समीर’ मध्ये एक समर्पित प्रयोगशाळा स्थापन केली जात असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. संरक्षण क्षेत्रासाठी धोरणात्मक इलेक्ट्रॉनिक्स, नागरी आणि स्वयंचलित वाहन उद्योगांशी संबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या झपाट्याने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठेतील मागणीची पूर्तता या सुविधेमुळे होईल,असे त्यांनी सांगितले.

ही प्रस्तावित आणि होऊ घातलेली लष्करी मानक ईएमसी प्रमाणीकरण प्रयोगशाळा नवी मुंबईत ‘समीर’ येथे स्थापन केली जात असल्याची माहिती समीरचे महासंचालक डॉ. पी. हनुमंत राव यांनी दिली. या सुविधेमुळे संपूर्ण ईएमसी चाचणी/संशोधन आणि संरक्षण, भारताचा पश्चिम विभाग त्याबरोबरच संपूर्ण भारतभरातील ग्राहक आणि वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक प्रणाली उत्पादकांसाठी अनुपालन प्रमाणीकरणाची सोय होणार आहे.
धोरणात्मक इलेक्ट्रॉनिक प्रणालीच्या चाचणीसाठी ईएमसी चाचणी सुविधेची स्थापना या नावाच्या या प्रकल्पासाठी मंत्रालयाकडून संपूर्ण अर्थसाहाय्य दिले जाणार असून आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्यात ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. महत्त्वाच्या मोहिमा-उपक्रमात या प्रणाली तैनात करण्यापूर्वी स्वदेशी संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक अनुकूलतेसाठी लष्करी आणि नागरी मानके पूर्ण करण्यास सक्षम करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
प्रणालीच्या कार्यप्रदर्शनात सुधारणा होण्याच्या दृष्टीने, सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च म्हणजेच समीर मध्ये डिझाईन आखण्याच्या टप्प्यावरच इलेक्ट्रोमॅग्नेटिक अडथळे दूर करण्यासाठी संशोधन आणि विकास प्रक्रियेचा पाठपुरावा अविरत सुरु आहे. भारत सरकार देशात, लष्कर, अंतराळ, वाहन उद्योगातील उत्पादने आणि वैद्यकीय उपकरणांच्या विकास आणि निर्मितीसाठी स्वदेशी परिसंस्थेला प्रोत्साहन देत आहे. या सर्व प्रणाली प्रत्यक्ष कार्यान्वित होण्यापूर्वी लष्करी मानके आणि नागरी मानके या दोन्हीसाठी पात्र असणे आवश्यक असून ते बंधनकारक आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम क्षेत्र आणि संपूर्ण भारतातील लष्कर, नौदल, हवाईदल आणि वाणिज्य किंवा औद्योगिक स्वदेशी उपकरण उत्पादकांच्या चाचणी, पात्रता आणि ई एम आय /ई एम सी यांच्या अनुपालनाशी निगडित मागण्या पूर्ण होतील. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी लष्करी मानके, सीई आणि एफसीसी (युरोपियन इकॉनॉमिक एरियासाठी CE आणि युनायटेड स्टेट्ससाठी FCC) प्रमाणीकरणासाठी पात्र होण्यासाठी, उद्योगांकडून समीरच्या सेवा वापरल्या जातील.

लष्करी मानके -461 F आणि आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन 61000-5-या व्यावसायिक मानकांनुसार आखण्यात आलेले प्रस्तावित राष्ट्रीय स्तरावरील ई एम आय /ई एम सी चाचणी सुविधा संरक्षण उत्पादन केंद्र, महाराष्ट्रातील तसेच देशातील उद्योगांसाठी फायदेशीर ठरेल.या भागातील संरक्षण उत्पादन केंद्र, पश्चिम नौदल कमांड तसेच उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे त्याचा अधिक लाभ होईल.
समीर विषयी
समीर ही भारत सरकारच्या तत्कालीन इलेक्ट्रॉनिक्स विभागांतर्गत मुंबई येथे स्थापन करण्यात आलेली एक स्वायत्त संशोधन आणि विकास प्रयोगशाळा आहे. या संस्थेला मायक्रोवेव्ह अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन आणि विकास कार्य हाती घेण्याचा व्यापक अधिकार आहे. समीर स्पेशल मायक्रोवेव्ह प्रोडक्ट युनिट (SMPU) ची एक शाखा असून मायक्रोवेव्ह, मिलिमीटर लहरी आणि प्रगत संप्रेषण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशासाठी स्वयंपूर्ण आणि स्वदेशी उपायांना चालना देण्यात मोलाचे योगदान देत आहे.
N.Chitale/S.Patil/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2094658)
Visitor Counter : 40