सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुणे इथल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने साजरा केला 58 वा वर्धापनदिन


वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या (VAMNICOM) शैक्षणिक उपक्रमांत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानविषयक अभ्यासक्रमाची भर

Posted On: 16 JAN 2025 7:29PM by PIB Mumbai

पुणे , 16 जानेवारी 2025

भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या अखत्यारितील पुणे इथल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेचा 58 वा वर्धापनदिन काल बुधवार दि. 15 जानेवारी 2025 रोजी संस्थेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला.

केंद्रीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेअंतर्गतचे (Council of Scientific and Industrial Research - CSIR) प्रमुख संशोधन केंद्र असलेल्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL - National Chemical Laboratory) व्हेंचर सेंटरचे नवोन्मेषक आणि वरिष्ठ मुख्य शास्त्रज्ञ डॉ.प्रेमनाथ वेणुगोपालन हे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासोबतच   सिंजेंटा फाऊंडेशन इंडियाचे भारतातले संचालक राजेंद्र जोग आणि ऑटोमॅटनचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण मुथियान हे मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेचा 58 व्या स्थापना दिन आणि आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष 2025 च्या पूर्वसंध्येला, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM) आणि सिंजेंटा फाऊंडेशन यांच्यात एका ऐतिहासिक सहकार्यपूर्ण भागीदारीची घोषणाही केली गेली. या सहकार्यपूर्ण भागीदारी अंतर्गत भारत-बँकर या पथदर्शी कार्यक्रमाचाही प्रारंभ  केला गेला.  ग्रामीण भागातील युवा वर्गाला बीएफएसआय अर्थात बँकिंग, अर्थविषयक सेवा आणि विमा (Banking, Financial Services, and Insurance) या क्षेत्रांत प्रगती करता यावी यादृष्टीने त्यांना आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करणे आणि त्याला समांतरपणे भारताच्या ग्रामीण भागातील बँकिंग विषयक परिसंस्थेला बळकटी देणे ही या कार्यक्रमाची उद्दिष्ट्टे आहेत. भारतातील सहकारी पतक्षेत्रात योगदान देता यावे यासाठी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेसोबत सामंजस्य करार करावा असा सिंजेंटा फाऊंडेशन इंडिया मानस आहे. सिंजेंटा फाऊंडेशन इंडियाचे भारतातील संचालक राजेंद्र जोग यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी सिंजेंटा फाऊंडेशनने कृषी उद्योग क्षेत्राअंतर्गत विविध पातळ्यांवर केलेले काम, तसेच शिक्षण, संशोधन आणि विस्ताराच्या माध्यमातून समाजिक उन्नतीकरता सिंजेंटाद्वारे राबवल्या जात असलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमांविषयीची माहिती उपस्थितांना दिली.

केंद्रीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेअंतर्गतचे (Council of Scientific and Industrial Research - CSIR) प्रमुख संशोधन केंद्र असलेल्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL - National Chemical Laboratory) व्हेंचर सेंटरचे नवोन्मेषक आणि वरिष्ठ मुख्य शास्त्रज्ञ डॉ. प्रेमनाथ वेणुगोपालन यांनी देखील प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थितांना संबोधित केले. आपल्या संबोधनात त्यांनी ऑटोमॅटन एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) विषयक माहिती दिली. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्र शिक्षण (Machine Learning) या तंत्रज्ञानाशी संबंधित पद्धतशीर शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देता यावा यासाठी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने ऑटोमॅटनसोबत केलेल्या सहकार्यपूर्ण भागिदारीतून एक मोठी झेप घेतली असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्र शिक्षण (Machine Learning) या तंत्रज्ञानासंबंधीचे सखोल ज्ञान मिळावे आणि या तंत्रज्ञानाचा कृषी उद्योग क्षेत्रात प्रत्यक्ष वापर करण्यासाठी त्यांना सज्ज करता यावे अशा रितीने या अभ्यासक्रमाची रचना केली गेली आहे. हा कार्यक्रम सहकार मंत्रालयाच्या उपक्रमांशी सुसंगत असा आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राथमिक  कृषी पत संस्थांचे (PACS - Primary Agricultural Credit Societies) संगणकीकरण करून त्यांचे सामान्य सेवा केंद्रांमध्ये (Common Service Center) रुपांतर करणे आणि प्राथमिक  कृषी पत संस्था तसेच ग्रामीण बँकिंग व्यवस्थेच्या व्यापक परिसंस्थेसाठी सक्षम असे ग्रामीण युवा मनुष्यबळ तयार करणे यांसारख्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. याअंतर्गत प्रशिक्षण मिळालेले युवा प्रतिनिधी सहकारी दूत म्हणून काम करू शकतील आणि त्याद्वारे ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासालाही चालना मिळणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करता आल्याने, विद्यार्थांना शेतकऱ्यांना माहिती आधारीत निर्णय घेण्याच्यादृष्टीने सक्षम करण्याचे प्रयत्न करता येतील. यासाठी ते शेतकऱ्यांना प्रत्यक्ष त्यावेळची आणि ऐतिहासिक माहिती पुरवू शकतील, संसाधनांचा पूरेपूर वापराचे नियोजनाविषयी सांगू शकतील आणि त्यांच्या वाढत्या लोकसंख्येची मागणी पूर्ण करण्याच्यादृष्टीने उत्पादनात वाढ साध्य करू शकतील. यामुळे हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यातही मदत होऊ शकणार आहे.

या अभ्यासक्रमाचे यशस्वी प्रारुप प्रत्यक्षात लागू केल्यानंतर आणि त्याबाबतचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा स्थापन केली जाणार आहे. या प्रयोगशाळेत प्रशिक्षित विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक हवामानाचे नमुने, मातीची गुणवत्ता आणि या आधीच्या पीक उत्पादनाशी संबंधित मोठ्या प्रमाणातील माहिती साठ्याचे विश्लेषण करण्याचे काम करू शकतील अशी माहिती डॉ. प्रेमनाथ वेणुगोपालन यांनी दिली. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेतील उद्योजकता विकास केंद्राने (Centre for Entrepreneurship Development) प्राथमिक कृषी सहकारी संस्था (PACS) आणि स्टार्ट-अप्स क्षेत्रासाठी प्राथमिक सहकार्य व्यवस्थेला (incubation)  बळकटी देऊन सहकारी परिसंस्थेत महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल त्यांनी या केंद्राची प्रशंसाही केली. यासोबतच सहकार क्षेत्राअंतर्गत व्यवसायाशी संबंधित समस्या तसेच एकूणात भारतातील सहकार क्षेत्रासमोरील समस्या सोडवण्यासाठी नवोन्मेषाची भूमिका यावर भर देऊन काम करत सहकार क्षेत्राच्या सक्षमीकरण करण्याची गरजही वेणुगोपालन यांनी यावेळी व्यक्त केली.


S.Patil/T.Pawar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2093548) Visitor Counter : 62


Read this release in: English