संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपूरमधील वायुसेना नगर येथील मेंटेनन्स कमांडच्या मुख्यालयात 14 जानेवारी 2025 रोजी साजरा केला जाणार नववा सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिवस

Posted On: 12 JAN 2025 4:05PM by PIB Mumbai

नागपूर, 12 जानेवारी 2025

 

नागपूरमधील वायुसेना नगर येथील मेंटेनन्स कमांडच्या मुख्यालयात 14 जानेवारी 2025 रोजी नवव्या सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिवसाचे आयोजन केले जाणार आहे. भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ फिल्ड मार्शल के एम करिअप्पा यांच्या औपचारिक सेवानिवृत्तीची आठवण म्हणून दरवर्षी 14 जानेवारी रोजी सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिवस साजरा केला जातो.  फिल्ड मार्शल के एम करिअप्पा 1953 मध्ये सेवेतून निवृत्त झाले होते. हा महत्त्वाचा दिवस आपल्या निवृत्त सशस्त्र दल कर्मचाऱ्यांच्या निःस्वार्थ सेवा आणि बलिदानाचा सन्मान करतो तसेच आपल्या देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षण करण्याच्या त्यांच्या अटल वचनबद्धतेचा गौरव करतो.

सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिन दरवर्षी या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्यांचे स्मरण करण्यासाठी तसेच आपल्या आयुष्याचा मुख्य भाग देशसेवेसाठी समर्पित करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. यासोबतच हा दिवस सशस्त्र दलातील निवृत्त कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांची दखल  घेण्यासाठी, त्यांना जनतेशी संलग्न होण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी आणि पर्यायाने भारताच्या घटनात्मक चौकटीत प्रशासनाचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने सरकारांना प्रेरित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणूनही काम करतो.

या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन जयराम गडकरी तसेच विविध सेवाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सशस्त्र दलातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी, डीआयएव्ही, डीएव्ही,स्पर्श, डीएनव्ही, ईसीएचएस, पीएसएएस, पीडीएएस, बँका आणि सेवा कल्याण संस्था यांसारख्या विविध सरकारी संस्थांद्वारे मदत डेस्क स्थापन करण्यात येणार आहे. तिन्ही सेना दलातील सुमारे 1200-1500 निवृत्त कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित राहातील असा अंदाज आहे. 

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2092232) अभ्यागत कक्ष : 60
Read this releasein: English