सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

31व्या ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळ्याचे येत्या 10 ते 19 जानेवारी दरम्यान नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात आयोजन


दहा दिवसीय मेळाव्यात 200 हून अधिक लोकनृत्य आणि आदिवासी कलाकार तसेच 150 हस्तशिल्पकार होणार सहभागी

Posted On: 08 JAN 2025 8:10PM by PIB Mumbai

नागपूर, 8 जानेवारी 2025

 

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील नागपूरच्या सिव्हिल लाईन येथील  दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राद्वारे दरवर्षी आयोजित केला जाणारा 'ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा आणि लोकनृत्य  सोहळा'   येत्या 10 ते 19 जानेवारी दरम्यान आयोजित केला जाणार असून या मेळाव्याचं हे 31 वे वर्ष असल्याचं या केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.या दहा दिवसीय मेळ्यामध्ये विविध राज्यांची लोकनृत्यं, हस्तशिल्पप्रदर्शन त्याचप्रमाणे व्यंजनांची दालने राहणार आहेत.  मेळाव्याचे उद्घाटन 10 जानेवारी शुक्रवार रोजी  संध्याकाळी  6.30 वाजता होणार असून दुपारी  2 ते रात्री  9.30 पर्यंत या मेळाव्यामध्ये नागरिकांना स:शुल्क प्रवेश करता  येणार आहे. 

या  दहा दिवसीय मेळाव्यामध्ये नागरिकांना 10 ते 19 जानेवारी  या कालावधीत दुपारी 2.00 ते 9.30 या वेळेत हस्तकला मेळाव्यात प्रवेश दिला जाणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता मुख्य मंचावर लोकनृत्यांचे   सादरीकरण सुरू होईल. हस्तकला मेळाव्यात सुमारे 150 हस्तकलाकार सहभागी होणार असून 200 हून अधिक लोक-आदिवासी कलाकार सहभागी होणार आहेत. ऑरेंज सिटी क्राफ्ट  मेळाव्यामध्ये क्राफ्ट स्टॉल्ससोबतच भारतातील विविध राज्यांतील पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही खास आकर्षणाचे केंद्र असतील. 

लोक आणि आदिवासी नृत्य सादरीकरणादरम्यान 10 ते 13 जानेवारी  दरम्यान  सायंकाळी 6.30 वाजता होजागिरी नृत्य (त्रिपुरा), मयूर, चारकुला (उत्तर प्रदेश), कालबेलिया (राजस्थान), मस्करत (पुडुचेरी), भांगडा (पंजाब) आणि गोटीपुआ (ओरिसा) हे नृत्य प्रकार सादर केले जातील.

14 जानेवारी मंगळवार रोजी संध्याकाळी 6.30 वाजता राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 'महाराष्ट्राची लोकधारा' हा महाराष्ट्राची लोकनृत्यं तसेच लोककलांचं सादरीकरण करणारा कार्यक्रम प्रस्तुत केला जाईल. 

15 जानेवारी रोजी कार्यक्रमाचे पहिले सादरीकरण संध्याकाळी 6.30 वाजता एसवीके शैक्षणिक संस्थेच्या दिव्यांग मुलांद्वारे "भारतीय लोक आणि आदिवासी नृत्य शैली" वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाने होईल. कार्यक्रमाचे दुसरे सादरीकरण निकालस महिला महाविद्यालयाचे “कॅनव्हास टू कॅटवॉक” हे असेल. यानंतर संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध लोकगायक डॉ.  श्रीमती शैलेश श्रीवास्तव, मुंबई भारतीय पारंपरिक लोकगीते सादर  करतील.

16 ते 19 जानेवारी  रोजी  संध्याकाळी 6.30 वाजेपासून लोक आणि आदिवासी नृत्य सादरीकरणामध्ये घूमर/फाग (हरियाणा), सिद्धी धमाल (गुजरात), कारकट्टम (तामिळनाडू), रौफ (जम्मू काश्मीर) आणि अफिलो कुवो (नागालँड) आणि सिंघी छम/स्नो लायन (सिक्कीम) यांचे  सादरीकरण असतील. या सर्व कार्यक्रमांसोबतच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून शासकीय अनुदान (रेपर्टरी ग्रँट) प्राप्त करणाऱ्या संस्थांची लोकनृत्येही नागपूर विभागात सादर होणार आहेत. 

10 ते 15 जानेवारी 2025 पर्यंत कच्ची घोडी (राजस्थान) कलाकार सादरीकरण करतील तसेच 16 ते 19 जानेवारी पर्यंत बहुरूपी (राजस्थान) कलाकार विविध वेशभूषेत आपल्या  कला प्रेक्षकांसमोर सादर करतील.

या कार्यक्रमात विविध राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते हस्तकलाकार आणि भारतातील प्रतिभावान कलाकार मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. यामध्ये हँड ब्लॉक प्रिंटिंग, एम्ब्रॉयडरी, जामदानी सूट, रंगकोट साडी, बनारसी साडी, लेदर, मेटल क्राफ्ट, ज्वेलरी, पंजा दारी डोअरमॅट, जरी वर्क, मॅट विव्हिंग, बेल मेटल, काश्मिरी आर्ट, चंदेरी साडी-सूट, चिकनकारी, फुलकरी, पंजाबी यांचा समावेश आहे. यासोबतच फर्निचर, कार्पेट, हातमाग, हस्तकलेच्या वस्तू प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध असतील.  

ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळाव्यात हस्तकलाच्या स्टॉल्ससोबतच भारतातील विविध राज्यांतील पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही खास आकर्षणाचे केंद्र असतील. पारंपारिक राजस्थानी,पंजाबी  या खाद्यपदार्थांसोबतच सोबतच महाराष्ट्रीयन तसेच  विदर्भाच्या खाद्य संस्कृतीचे  पदार्थ  उपलब्ध  राहणार आहेत 

सिविल लाईन स्थित डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह आणि आमदार निवास येथे मेळाव्यासाठी सशुल्क पार्किंगची सोय करण्यात आली आहे.या कार्यक्रमाचे प्रवेश शुल्क 30 रुपये प्रति व्यक्ती ठेवण्यात आले असून सर्व कलाप्रेमी प्रेक्षक व नागरिकांनी या  सोहळ्यास उपस्थित  राहण्याचे आवाहन आयोजक दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालक आस्था कार्लेकर यांनी केले आहे. एचएमपीव्ही या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यामध्ये सुद्धा केंद्र सरकार द्वारे दिल्या जाणाऱ्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाणार असल्याचे देखील कार्लेकर यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळाव्याच्या आयोजनाची माहिती देणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये या केंद्राचे सहाय्यक संचालक (कार्यक्रम) दीपक कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी दीपक पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. 

 

* * *

PIB Nagpur | N.Joshi/D.Wankhede/D.Dubey/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2091280) Visitor Counter : 64


Read this release in: English