ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय मानक संस्थेचा 78 वा स्थापना दिन उत्साहात साजरा
मान्यवरांकडून उत्पादन गुणवत्तेसाठी संस्थेचे योगदान आणि प्रयत्नांची प्रशंसा
उत्कृष्ट गुणवत्ता मानकांचे पालन करणाऱ्यांचा ऑल - इंडिया फर्स्ट लायसन्सी पुरस्कारानं सन्मान
Posted On:
06 JAN 2025 3:54PM by PIB Mumbai
मुंबई , 6 जानेवारी 2025
भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या भारतीय मानक संस्थेचा (Bureau of Indian Standards - BIS) 78 वा स्थापना दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने मुंबईत अंधेरी इथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. या कार्यक्रमात भारतीय मानक संस्था देशातील गुणवत्ताविषयक परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी करत असलेले प्रयत्न अधोरेखित केले गेले. देशभरातील ग्राहकांना सुरक्षित, विश्वासार्ह, आणि उच्च – गुणवत्तायुक्त उत्पादने उपलब्ध होतील याची सुनिश्चिती करत, ग्राहकांच्या उत्पादनांशी संबंधित आरोग्यविषयक जोखीमा कमी करणे आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देणे या संकल्पनेवर हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.

व्ही जे टी आय अर्थात वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सचिन डी. कोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. यासोबतच भारतीय मानक संस्थेचे पश्चिम विभागीय उपमहासंचालक संजय गोस्वामी, संस्थेच्या मुंबई शाखा कार्यालय - I चे प्रमुख आणि शास्त्रज्ञ पिनाकी गुप्ता, मुंबई शाखा कार्यालय - II च्या प्रमुख आणि शास्त्रज्ञ प्रेम सजनी पटनाला, पश्चिम प्रादेशिक प्रयोगशाळेचे प्रमुख अनिल कपरी, भारतीय रासायनिक परिषदेच्या (Indian Chemical Council) सरचिटणीस श्रद्धा राणे, तसेच नौसील अर्थात नॅशनल ऑरगॅनिक केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे गुणवत्ताविषयक अधिकारी आणि विश्लेषणात्मक संशोधन विभागाचे उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र दिगंबर गांगल यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

भारतीय मानक संस्थेने आपल्या स्थापनेपासून आजतागायत गुणवत्ता आणि सुरक्षिततेची मानके कायम राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे देशाला वेगेळी ओळख मिळवून दिली असल्याच्या शब्दांत वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेचे संचालक आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. सचिन कोरे यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. भारतीय मानक संस्थेने उत्पादकांसमोर आदर्श उदाहरण ठेवले असून, एक परिपूर्ण उत्पादन कसे असावे आणि ते ग्राहक तसेच उद्योगांसाठी कशा रितीने उपयुक्त ठरावे याची मार्गदर्शक आखणी करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सचिन कोरे यांनी भारतीय मानक संस्थेने ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राबवलेल्या विविध प्रकल्पांचाही उल्लेख केला. या संस्थेने उत्पादने अधिक सुरक्षित, टिकाऊ आणि ग्राहकांचे हित जोपासणारी असायला हवीत यावर भर देत काम केले आहे. वाहन उद्योग क्षेत्राद्वारे हलकी तसेच सुरक्षित वाहने बनवून घेण्याचे आव्हान स्वीकारत, संस्थेने उच्च गुणवत्तेची सुरक्षा मानके सुनिश्चित केली आहेत. यामुळे वाहनांच्या चाचण्या, त्यांचे संरचनात्मक घटक, एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे तंत्रज्ञान विकसित करण्यात यश आले आहे असे डॉ. सचिन कोरे यांनी सांगितले.भारतीय मानक संस्थेने उत्पादनांच्या गुणवत्तेवर भर देतानाच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स अर्थात माहितीसाठा विज्ञानासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनांची तपासणी अधिक वेगवान आणि अचूक केली आहे. उत्पादनांची सुरक्षा आणि टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी उद्योगांना याचा मोठा फायदा होणार असल्याची बाबही डॉ. सचिन कोरे यांनी यावेळी अधोरेखीत केली.
आता भारतीय मानक संस्थेचे मोबाइल अॅप उपलब्ध असून, या अॅपच्या मदतीने ग्राहकांना कुठून उत्पादनांच्या गुणवत्तेचे स्तर आणि त्या कुठून खरेदी करायच्या याबद्दल माहिती मिळवता येईल अशी माहिती त्यांनी दिली.
VP8Y.jpeg)
भारतीय मानक संस्थेसोबत सहकार्यविषयक सामंजस्य करार करताना आपल्याला अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. या करारामुळे वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेतील विद्यार्थ्यांना भारतीय मानकांचा अभ्यास करण्याची संधी मिळेल, भविष्यात उद्योगक्षेत्रात त्यांना ती उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले. एक शैक्षणिक संस्था म्हणून वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेद्वारा भारतीय मानक संस्थेला प्रशिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमांच्या माध्यमातून सहकार्य करत राहण्याची तसेच प्रयोगशाळा विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देखील डॉ. सचिन कोरे यांनी यावेळी दिली. यावेळी डॉ. सचिन कोरे यांनी भारतीय मानक संस्थेला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
भारतीय रासायनिक परिषदेच्या (Indian Chemical Council) सरचिटणीस श्रद्धा राणे यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतातून त्यांनी भारतीय मानक संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत, संस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेतील गुणवत्ता आणि विश्वासार्हतेचा पाया रचण्यासाठी दिलेल्या योगदानाविषयी सांगितले. संस्थेने कायमच उत्पादनांची गुणवत्ता, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि टिकाऊपणावर भर दिला. सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग आणि इलेक्ट्रिकल उपकरणांच्या प्रमाणिकरणासारख्या प्रयत्नांतून संस्थेने ग्राहकांच्या विश्वासाला बळकटी दिली असल्याचे त्या म्हणाल्या. संस्थेने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, ऊर्जा कार्यक्षम उत्पादने, पर्यावरणपूरक पॅकेजिंग आणि कचरा व्यवस्थापनासाठी मानकांच्या निर्मितीसाठी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.
भारतीय मानक संस्थेने आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत राहून भारतीय उत्पादनांना जागतिक पातळीवर स्पर्धात्मक उत्पादनांचे स्वरुप देण्याचे काम केले आहे असे त्यांनी सांगितले.
भारतीय मानक संस्था आणि भारतीय रासायनिक परिषदेत दीर्घकालीन सहकार्यपूर्ण भागिदारी सुरू आहे.
भारतीय मानक संस्थेचे (BIS) पश्चिम विभागीय उपमहासंचालक संजय गोस्वामी यांनी संस्थेच्या वतीने राबवल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्टँडर्डायझेशन सेल्स, मानक मंथन, मानक संवाद, औद्योगिक सहली, आणि अल्प कालावधीचे अभ्यासक्रम यांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेने मानकीकरणाला चालना देण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरुच ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे उद्योग, शैक्षणिक संस्था आणि ग्राहक यांच्यात मानकीकरणाबाबत जागरूकता निर्माण होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
भारत लवकरच आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल आयोगाच्या (IEC) बैठकीचे आयोजन करणार असल्याची घोषणाही संजय गोस्वामी यांनी यावेळी केली. या बैठकीमुळे भारतीय मानक संस्थेच्या जागतिक स्तरावरील मानक निर्मितीतील सहभागाला आणखी बळकटी मिळेल, तसेच भारताची जागतिक मानकांवरील पकड अधिक दृढ होईल असे संजय गोस्वामी म्हणाले.
डॉ. नरेंद्र गांगल यांनीही आपल्या मनोगतातून बदलत्या हवामानाशी संबंधित आव्हानांविषयी सांगितले. भारताच्या शाश्वत विकासाच्या वाटचालीत भारतीय मानक संस्थेचे योगदान आणि भूमिका महत्वाची आहे असे ते म्हणाले. संस्थेने विकसित केलेल्या मानकांमुळे पर्यावरणीय शाश्वततेला मोठे पाठबळ मिळाले असल्याचे सांगत त्यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.
VRVW.jpeg)
या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय मानक संस्थेच्या वतीने देशातील कठोर गुणवत्ता मानकांचे पालन करणाऱ्या ऑल - इंडिया फर्स्ट लायसन्सीना सन्मानितही केले गेले. यासोबतच भारतीय मानक संस्थेच्या 78 व्या स्थापना दिनानिमित्त, येत्या 8 जानेवारी 2025 रोजी मुंबईत हिरानंदानी गार्डन्स, पवई इथल्या BIS CETTM संकुलात मानके महोत्सव अर्थात स्टँडर्ड कार्निव्हलचेही आयोजन केले गेले आहे. या महोत्सवानिमीत्त पोस्टर मेकिंग, मीम निर्मिती आणि घोषवाक्य लेखन अशा सर्जनशील स्पर्धांचेही आयोजन केले असून, त्याचे प्रदर्शनही या महोत्सवात मांडले जाणार आहे.
भारतीय मानक संस्थे (Bureau of Indian Standards - BIS) विषयी
भारतीय मानक संस्था (BIS) ही भारताची राष्ट्रीय मानक संस्था आहे, ही संस्था भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत आहे. मानकांची रचना, प्रमाणन, प्रयोगशाळांमधील चाचणी, हॉलमार्किंग आणि व्यवस्थापन प्रणालींचे प्रमाणन यासंबंधीचे काम ही संस्था करते. उत्पादनांच्या गुणवत्तेच्या सुनिश्चिततेशी संबंधित विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुरक्षित, विश्वासार्ह आणि गुणवत्तायुक्त उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित करणे, ग्राहकांच्या आरोग्यविषयक जोखमी कमी करणे, पर्यावरणाचे संरक्षण करण्याची उद्दिष्ट साध्य करत भारतीय मानक संस्था देशातील गुणवत्ताविषय़क परिसंस्था आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महत्वाचे योगदान देत आहे.
S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2090572)
Visitor Counter : 92