महिला आणि बालविकास मंत्रालय
राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातल्या दोन मुलांचा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने केला सन्मान
नवी दिल्ली येथे आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
दिव्यांग व्यक्तींसाठी प्रेरणादायी 14 वर्षांची मुंबईतली मुलगी आणि अमरावती येथील 17 वर्षांच्या शूर युवतीचा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांने गौरव
Posted On:
26 DEC 2024 7:30PM by PIB Mumbai
मुंबई, 26 डिसेंबर 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (26 डिसेंबर 2024) राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित समारंभात 7 श्रेणीत 17 मुलांना त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले. 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सात मुले आणि दहा मुलींना त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला. या सतरा बाल पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील दोन मुलींचाही समावेश आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले तसेच संपूर्ण देशाला आणि समाजाला त्यांचा अभिमान असल्याचे त्या म्हणाल्या. याप्रसंगी मुलांशी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की त्यांनी असामान्य कार्य केले आहे, आश्चर्यकारक कामगिरी केली आहे, त्यांच्यात अमर्याद क्षमता आहेत आणि अतुलनीय गुण आहेत. तसेच, या मुलांनी देशातील इतर मुलांसमोर आदर्श ठेवला आहे, असे ही त्या म्हणाल्या. अशी प्रतिभावंत मुले-मुली विकसित भारताचे निर्माते बनतील, असे त्यांनी सांगितले. पुरस्कार विजेती मुलेमुली देशभक्तीची उदाहरणे असून आपल्या देशाच्या उज्जवल भविष्याविषयीचा आपला विश्वास ती बळकट करतात, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आज आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. तिसऱ्या वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना त्यांनी संबोधित केले. साहिबजादांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाच्या स्मृतीनिमित्त आपल्या सरकारने वीर बाल दिवस सुरू केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. मोदी यांनी आज शौर्य, नवनिर्मिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा आणि कला या क्षेत्रात वीर बाल पुरस्काराने सन्मानित झालेल्या 17 मुलांचे कौतुक केले. आजचे पुरस्कार विजेते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या भारतीय मुले आणि युवांच्या क्षमतेचे प्रतीक आहेत. पंतप्रधानांनी यावेळी गुरूंना आणि वीर साहिबजादांना आदरांजली अर्पण केली आणि पुरस्कार विजेत्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले.

14 वर्षांची केया हटकर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित
मुंबईतील 14 वर्षांची केया हटकर दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांची पुरस्कर्ती, लेखिका आणि प्रेरक वक्ता असून कला आणि संस्कृती क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्पाइनल मस्क्युलर ऍट्रोफी या दुर्मीळ, क्षीण करणाऱ्या आणि जीवाला धोका पोहोचवू शकणाऱ्या आव्हानात्मक स्थितीला आड येऊ न देता ही युवती 'डान्सिंग ऑन माय व्हील्स' आणि 'आय एम पॉसिबल' या दोन सर्वोत्कृष्ट खपाच्या पुस्तकांची लेखिका आहे. साहित्यिक कामगिरीखेरीज केया ‘आय एम पॉसिबल’ आणि ‘एसएमए-एआरटी’ या ना-नफा उपक्रमांची संस्थापक आहे. चौदा वर्षांची ही मुलगी प्रेरक भाषणे देते. ती सर्वसमावेशकतेची पुरस्कर्ती आहे आणि अपंगत्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे कार्य ती करते.

17वर्षांची करीना थापा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित
धाडस आणि प्रसंगावधान दाखवत 36 लोकांचे प्राण वाचवल्याबद्दल महाराष्ट्रातल्या अमरावती इथल्या 17 वर्षांच्या करीना थापा हिला राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. एका आगीच्या दुर्घटनेत करीनाने मोठे धाडस दर्शवले. बचावकार्य सुरू असताना सतरा वर्षाच्या मुलीने घटनास्थळावरून मोठ्या तत्परतेने गॅस सिलेंडर दूर करून संभाव्य आपत्ती टाळली आणि अनेक लोकांचे प्राण वाचवले. महापालिका आयुक्तांनी तिला यावर्षी (2024) अग्निशमन दलाची ॲम्बेसेडर म्हणून मान्यता दिली.

* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2088215)
Visitor Counter : 49