संरक्षण मंत्रालय
माझगाव डॉक शिपबिल्डर्स कडून ‘निलगिरी’ आणि ‘सुरत’ युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द
Posted On:
20 DEC 2024 10:00PM by PIB Mumbai
मुंबई, 20 डिसेंबर 2024
नवरत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी (सीपीएसई) असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल)ने दोन अत्याधुनिक युद्धनौका भारतीय नौदलाकडे समारंभपूर्वक सुपूर्द केल्या आहेत. ‘निलगिरी’ ही रडारवर अदृश्य राहण्याची क्षमता असलेली प्रकल्प 17ए वर्गातील पहिली युद्धनौका आणि ‘सुरत’ ही रडारवर अदृश्य राहण्याची क्षमता असलेली प्रकल्प 15बी वर्गातील चौथी विनाशिका नौदलाला सुपूर्द करण्याचा कार्यक्रम आज 20 डिसेंबर 2024 रोजी एमडीएल, मुंबई इथे झाला.
रिअर ॲडमिरल आर.अधिश्रीनिवासन, सीएसओ (टेक) आणि संजीव सिंघल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एमडीएल यांनी स्वीकृतीच्या दस्तावेजावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी एमडीएलचे संचालक तसेच ‘सुरत’चे प्रमुख अधिकारी (नियुक्त) कॅप्टन संदीप शोरे, ‘निलगिरी’चे प्रमुख अधिकारी (नियुक्त) कॅप्टन नितीन कपूर आणि युद्धनौका योजना विभागातील चमू, युद्धनौका देखरेख चमू (मुंबई), प्रकल्प चमू आणि नौदलातील अधिकारी उपस्थित होते.
'निलगिरी'ची ठळक वैशिष्ट्ये
'निलगिरी' ही प्रकल्प 17ए मधील आघाडीच्या नौकेत आधुनिक तंत्रज्ञान, रडारवर अदृश्य राहण्याची क्षमता आणि चालविण्यास सुलभतेसाठी अत्याधुनिक यंत्रणा आहेत. भारतीय नौदलाच्या युद्धनौका योजना विभागाने आरेखन केलेल्या या नौकेच्या मुख्य भागाचा आकार आणि वरील भागातील रडार-पारदर्शकतेमार्फत रडारवर अदृश्य राहण्याची क्षमता विकसित केली आहे.
सर्वसमावेशी शस्त्रास्त्रे आणि संवेदक असलेली ‘निलगिरी’ शत्रूच्या पाणबुड्या, पृष्ठभागावरील युद्धनौका, नौका-विरोधी क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांपासून संरक्षणासाठी सज्ज आहे. तिच्यावर नौदलाच्या कमी पल्ल्याच्या बंदुका आणि इतर दारूगोळाही आहे. ही युद्धनौका स्वतंत्रपणे कार्यरत राहू शकते किंवा नौदल कृती दलाचा भागही होऊ शकते. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारताचा युद्धनौका योजनेतील स्वावलंबन दर्शविते.
'सुरत'ची ठळक वैशिष्ट्ये
'सुरत' या प्रकल्प 15बी वर्गातील चौथ्या विनाशिकेवर सुपरसॉनिक ब्राह्मोस पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे, बराक-8 मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, हमसा-एनजी सोनार, अवजड टॉर्पिडो प्रक्षेपकांचा समावेश असलेली स्वदेशी बनावटीची पाणबुडी-विरोधी युद्ध (एएसडब्ल्यू) यंत्रणा आणि एएसडब्ल्यू अग्निबाण प्रक्षेपक आहेत.
उच्च म्हणजे 72% स्वदेशी घटक असलेल्या या नौकेने यापूर्वीच्या पी15ए (59%) आणि पी15 (42%) वर्गांना या बाबतीत मागे टाकले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’कार्यक्रमाद्वारे स्वावलंबनाचा भारताचा निश्चय ‘सुरत’ने दृढ केला आहे. नियोजित वेळेपूर्वी सुपूर्द करण्यात आलेली ही विनाशक युद्धनौका अष्टपैलू आणि युद्धसज्ज मंच असून ती स्वतंत्रपणे कार्यरत राहू शकते किंवा नौदल कृती दलाचा भागही होऊ शकते.
माझगाव डॉक शिपबिल्डर्सने भारताच्या स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका आणि पाणबुड्या बांधण्यात निर्णायक भूमिका बजावली असून तिचे लिअँडर व गोदावरी युद्धनौका, खुक्री कॉर्वेट अर्थात लहान संरक्षक जहाजे, दिल्ली व कोलकाता विनाशिका , शिवालिक युद्धनौका, विशाखापटणम विनाशिका आणि स्कॉर्पिन पाणुबड्यांच्या उत्पादनात योगदान आहे.
N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2086679)
Visitor Counter : 35