ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनटीपीसी आरजीपीपीएल रत्नागिरी टाउनशिप ठरली आयजीबीसी नेट झिरो जल प्रमाणपत्र मिळविणारी भारतातील पहिली टाउनशिप

Posted On: 19 DEC 2024 10:17PM by PIB Mumbai

मुंबई, 19 डिसेंबर 2024

एनटीपीसीची रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायवेट लिमिटेड (आरजीपीपीएल) टाउनशिप भारतीय हरित बांधकाम परिषद (आयजीबीसी) नेट झिरो जल प्रमाणपत्र मिळविणारी भारतातील पहिली टाउनशिप ठरली आहे. हे यश एनटीपीसीच्या शाश्वतता आणि जल व्यवस्थापन पद्धतींमध्ये नेतृत्वाप्रती वचनबद्धतेची ग्वाही देते.

आरजीपीपीएल रत्नागिरी हा एनटीपीसीच्या पश्चिम विभाग-I (डब्ल्यूआर-I) चा भाग असून या प्रकल्पाने पर्जन्यजल संधारण, सांडपाण्याचा परिणामकारक पुनर्वापर आणि नवोन्मेषी तंत्रज्ञानाधारे पाणीवापरात कपातीसह शाश्वत जल व्यवस्थापन पद्धतींमध्ये अपवादात्मक प्रयत्नांचे दर्शन घडविले आहे. नेट झिरो जल प्रमाणपत्र मिळविण्यात टाउनशिपने प्राप्त केलेले यश एनटीपीसीची पर्यावरणीय भूमिका कारभारात आणून शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्याप्रती समर्पण अधोरेखित करते.

या प्रसंगी कमलेश सोनी, प्रादेशिक कार्यकारी संचालक, पश्चिम विभाग-I, एनटीपीसी, म्हणाले,

"आयजीबीसी निव्वळ शून्य जल प्रमाणपत्र आरजीपीपीएल रत्नागिरीने मिळविणे हा एनटीपीसीसाठी अभिमानाचा क्षण आहे आणि शाश्वततेप्रती आमच्या वचनबद्धतेची ग्वाही आहे. या यशाने ऊर्जा क्षेत्रात हरित पद्धतींसाठी उच्च मानक  प्रस्थापित केले असून एकात्मिक जल व्यवस्थापन शाश्वत भविष्याकडे नेण्यासाठी कसे साह्यभूत ठरते याचे उदाहरण आहे. अधिक हरित आणि स्वच्छ भारतात योगदान देण्यासाठी आम्ही नवोन्मेषी उपाययोजनांच्या निर्मितीसाठी कार्यरत राहू."

या प्रमाणपत्राने एनटीपीसीचे ऊर्जा क्षेत्रात शाश्वततेला प्रोत्साहनपर उपक्रम राबविणारे नेतृत्व म्हणून स्थान पक्के झाले आहे. जल संवर्धन आणि पर्यावरणीय जबाबदारीच्या राष्ट्रीय उद्दीष्टांशी आपली कार्यपद्धती जुळवून घेण्याबाबत एनटीपीसीचा सक्रीय दृष्टीकोन हे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे ठळकपणे समोर आला आहे.

एनटीपीसीचे डब्लूआर-I मधील आद्य प्रकल्प असलेल्या आरजीपीपीएल रत्नागिरी टाउनशिपने मिळविलेल्या प्रमाणपत्रामुळे कंपनीचा विकास आणि पर्यावरणीय जबाबदारीत संतुलन साधण्याचा, समुदाय आणि पर्यावरणासाठी दीर्घकालीन लाभ मिळविण्यासाठीचा निश्चय अधोरेखित झाला आहे.

N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2086291) Visitor Counter : 54


Read this release in: English