विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते 'किसान कवच'चे अनावरण : कीटकनाशकांपासून शेतकऱ्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी भारताचा स्वदेशी कीटकनाशक सूट
Posted On:
17 DEC 2024 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2024
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); डॉ जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे किसान कवच या भारताच्या पहिल्या कीटकनाशक विरोधी बॉडीसूटचे अनावरण केले. कीटकनाशकांच्या हानिकारक परिणामांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले, हे अभिनव संशोधन शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी आणि कृषी समुदायाला सक्षम करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुरूप असून एक परिवर्तनकारक पाऊल आहे.
या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना, किसान कवच हा शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भातली गंभीर त्रुटी दूर करणारा एक महत्त्वाचा उपाय आहे यावर डॉ. जितेंद्र सिंह यांनी भर दिला .सेपियो हेल्थ प्रा.लि.च्या सहकार्याने ब्रिक-इनस्टेम, बंगलोर यांनी विकसित केलेला हा बॉडीसूट,श्वासोच्छवासाचे विकार, दृष्टी जाणे आणि काहीवेळा मृत्यू यासह अनेकदा गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकणाऱ्या कीटकनाशक-प्रेरित विषापासून संरक्षण देतो.
“किसान कवच हे केवळ एक उत्पादन नाही तर आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्याचे दिलेले वचन आहे कारण ते देशाचे अन्नदाते आहेत,” असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. धुता येण्याजोगा आणि पुन्हा वापरता येण्याजोगा हा सूट असून त्याची किंमत 4,000 रुपये आहे, एका वर्षापर्यंत टिकू शकतो आणि संपर्कात आल्यावर हानिकारक कीटकनाशके निष्क्रिय करण्यासाठी प्रगत फॅब्रिक तंत्रज्ञानाचा वापर करतो, ज्यामुळे शेतकरी सुरक्षित राहतील.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रकल्पाला आकार देण्यात आणि समाजकेंद्रित संशोधन उपलब्ध करून देण्यासाठी जैवतंत्रज्ञान विभाग आणि BRIC-inStem यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.
या कार्यक्रमात शेतकऱ्यांना किसान कवच सूटच्या पहिल्या बॅचचे वाटप करण्यात आले, जे भारतातील कृषी क्षेत्रातील 65% लोकसंख्येचे संरक्षण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे . डॉ. जितेंद्र सिंह यांनी आश्वासन दिले की, उत्पादन वाढले की सूट देखील किफायतशीर किंमतीत उपलब्ध होतील ,ज्यामुळे देशभरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी ते उपलब्ध होतील.
“हे परिवर्तनकारी तंत्रज्ञान केवळ तातडीची गरजच पूर्ण करत नाही तर भारताच्या जनतेसाठी नाविन्यपूर्ण संशोधन करण्याची क्षमता देखील यातून दिसून येते ,” असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2085483)
Visitor Counter : 43