पंचायती राज मंत्रालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 प्रदान : महाराष्ट्राला सहा पुरस्कार
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024: महाराष्ट्रातील पंचायतींनी पाडली छाप
महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतींनी मिळवली राष्ट्रीय ओळख - शाश्वत विकासाला दिली चालना
साताऱ्याची ‘मान्याचीवाडी’ ठरली सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत
Posted On:
11 DEC 2024 10:40PM by PIB Mumbai
मुंबई, 11 डिसेंबर 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज 11 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनाच्या प्लेनरी हॉलमध्ये पंचायती राज मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आले. केंद्रीय पंचायती राज आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री प्रा.एस. पी.सिंग बघेल हे देखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते.

शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाप्रति त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी विविध श्रेणीतील 45 पुरस्कार विजेत्यांना या कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ठळक वैशिष्ट्यांमध्ये पुरस्कार रकमेचे डिजिटल हस्तांतरण आणि पुरस्कार विजेत्या पंचायतींचे अभिनव उपक्रम अधोरेखित करणारा लघुपट यांचा समावेश होता. याप्रसंगी ‘पुरस्कारप्राप्त पंचायतींच्या कामांवरील सर्वोत्तम पद्धती’ या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्रातील पंचायतींनी त्यांच्या उल्लेखनीय कार्याने राज्यासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. पंचायती राज मंत्रालयाने स्थापन केलेले हे पुरस्कार, शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरणामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सर्वोत्कृष्ट पंचायतींची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देतात.
महाराष्ट्राने आपल्या ग्रामपंचायती, तालुका पंचायती आणि संस्थांच्या उल्लेखनीय प्रयत्नांचे दर्शन घडवत विविध श्रेणींमध्ये सहा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले आहेत. तालुका, जिल्हा, राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि राष्ट्रीय स्तरांवर आयोजित केलेल्या स्पर्धेसह हे पुरस्कार पिरॅमिड संरचनेचे अनुसरण करतात. त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक भावनेला चालना देत शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने पंचायतींचे मूल्यांकन करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 च्या विजेत्यांनी ग्रामीण नवोन्मेष, शाश्वतता आणि समुदाय-चालित उपक्रमांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.
1. मान्याचीवाडी: सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत (क्रमांक 1)

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळाला आहे. तिने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 - नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार (क्रमांक 1) जिंकला आहे.
शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वांगीण आणि अभिसरण दृष्टीकोनाचा अवलंब करण्यात मान्याची वाडी ग्रामपंचायत सरस ठरली आहे. 420 लोकसंख्येसह, पंचायतमध्ये 98 घरांचा समावेश आहे आणि सहा निर्वाचित प्रतिनिधी (तीन पुरुष आणि तीन महिला) त्याचे नेतृत्व करतात.
या ग्रामपंचायतीने शाश्वत पद्धती आणि एकात्मिक ग्रामीण विकासासाठी आपली वचनबद्धता दर्शवून सर्व 9 शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरण संकल्पनेनुसार अपवादात्मक कामगिरीचे प्रदर्शन केले.
2. तिरोडा: सर्वोत्कृष्ट गट पंचायत (क्रमांक 3)
गोंदिया जिल्ह्यातील पंचायत गटाला सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्यासाठी दाखवलेल्या उत्कृष्ट वचनबद्धतेसाठी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 - मधील नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. या पंचायतीने कुशल प्रशासनाचा आदर्श ठेवून नाविन्यपूर्ण विकास धोरणांचे एकत्रीकरण आणि ग्रामीण वातावरणात टिकाऊपणाला प्रोत्साहन दिले आहे, त्यांच्या या प्रभावी उपक्रमांसाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावर हा बहुमान मिळाला आहे.

याव्यतिरिक्त, भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतीला कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कारांतर्गत तृतीय क्रमांचा पुरस्कार देण्यात येईल.
3. बेला: कार्बन न्यूट्रल पंचायत (क्रमांक 1)

भंडारा जिल्ह्याच्या भंडारा ब्लॉकमध्ये असलेल्या बेला ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 - कार्बन न्यूट्रल विषेश पंचायत पुरस्कार श्रेणीत प्रथम पुरस्कार मिळाला असून कार्बन न्यूट्रॅलिटी साध्य करण्याच्या अपवादात्मक प्रयत्नांसाठी तो प्रदान करण्यात आला. 5,914 लोकसंख्या आणि 2,027 कुटुंबांचा समावेश असलेल्या, या पंचायतीचे नेतृत्व 14 निर्वाचित प्रतिनिधी (8 पुरुष आणि 6 महिला) करतात. बेलाच्या नाविन्यपूर्ण आणि शाश्वत पद्धतींनी पर्यावरणीय आघाडीवर आणि ग्रामीण प्रशासनात एक आदर्श स्थापन केला आहे.
प्रमुख कामगिरी :
- वृक्षारोपण: 91,550 हून अधिक झाडे लावली.
- घनकचरा व्यवस्थापन: स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून खत निर्मिती आणि घरांना स्वतंत्र डस्टबिनचे वितरण.
- कार्बन कमी करणे: सौर यंत्रणा, एलईडी दिवे आणि इतर हरित तंत्रज्ञानाचा अवलंब.
- सामुदायिक सहभाग: जागरुकता मोहिमेद्वारे आणि सार्वजनिक सहभागाद्वारे 100% सहभाग.
4. मोडाळे : स्वच्छ आणि हरित ग्राम पंचायत (क्रमांक 3)

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी गट अंतर्गत मोडाळे ग्रामपंचायतीला स्वच्छ आणि हरित पंचायत म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीतील स्वच्छ आणि हरित ग्राम पंचायत या तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1,683 लोकसंख्येसह आणि 325 कुटुंबांचा समावेश असलेल्या, मोडाळे ग्रामपंचायतीने पर्यावरणीय शाश्वतता आणि स्वच्छतेसाठी अपवादात्मक वचनबद्धता दर्शविली असून इतर ग्रामीण समुदायांसाठी प्रेरणा म्हणून काम केले आहे.
प्रमुख कामगिरी :
- स्वच्छता आणि साफसफाई : 325 शौचालये बांधली आणि 1,275 सांडपाणीवाहिन्या बसवल्या.
- पर्यावरणीय प्रयत्न: जैवविविधता पुनर्संचयित करण्यासाठी 90,000 रोपे लावली.
- अक्षय ऊर्जा: सौर पथदिवे, पंप आणि बायोगॅस युनिट कार्यान्वित.
5. मान्याची वाडी: ग्राम उर्जा स्वराज विशेष ग्राम पंचायत पुरस्कार (क्रमांक 1)

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये असलेल्या मान्याची वाडीला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 - ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार (श्रेणी 1) ने ऊर्जा स्वावलंबन आणि नाविन्यपूर्ण ग्रामीण विकास पद्धती प्राप्त करण्याच्या अनुकरणीय प्रयत्नांसाठी प्रदान करण्यात आला आहे. 420 लोकसंख्या आणि 98 कुटुंबांचा समावेश असलेल्या या पंचायतीने शाश्वत ऊर्जा उपायांमध्ये एक बेंचमार्क स्थापित केला आहे आणि इतर ग्रामीण समुदायांसाठी अनुकरण करण्याजोगे एक प्रारूप उभे केले आहे.
प्रमुख कामगिरी:
- ऊर्जा शाश्वतता: 65 घरांमध्ये बायोगॅस संयंत्रे आणि सर्व 35 पथदिवे सौरऊर्जेवरील.
- शेतकरी आधार: 25 पैकी 16 शेतकरी सौरऊर्जेवर चालणारे पाणी पंप वापरतात.
- ओळख: राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर 76 पुरस्कार मिळाले.
6. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी (यशदा): पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार (श्रेणी 3)

महाराष्ट्रातील पुणे स्थित यशदा संस्थेला पंचायती राज संस्थांच्या (पी आर आय) क्षमता बळकट करण्यासाठी आणि शाश्वत विकासाच्या (एस डी जी ) स्थानिकीकरणाची (एस डी जी जी ओ) क्षमता बळकट करण्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 - पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राज्याच्या सर्व सहा प्रशासकीय विभागांच्या प्रशिक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या स्थित असलेली यशदा ही तिच्या स्थापनेपासून राज्य ग्रामीण विकास संस्थेच्या (एस आय आर डी) चौकटीचा अविभाज्य भाग आहे. एस आय आर डी क्षमता बांधणी, संशोधन आणि ग्रामीण विकास उपक्रमांच्या संपूर्ण पट्ट्यात ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी समर्पित आहे तसेच पी आर आय चे सक्षमीकरण करण्यात आणि शाश्वत ग्रामीण विकासाला चालना देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
प्रमुख कामगिरी:
- एस डी जी स्थानिकीकरण: पथदर्शी प्रकल्प विकसित केला आणि 30 ग्रामपंचायतींमध्ये सहभागी विकास निर्देशांक तयार केला.
- प्रशिक्षण कार्यक्रम: भारतभरातील पंचायत प्रतिनिधींसाठी कार्यशाळा आणि प्रशिक्षण आयोजित केले.
- धोरणात्मक सहयोग: विकेंद्रित शासन उपक्रमांसाठी युनिसेफ आणि इतर संस्थांसोबत भागीदारी केली.
रापंपु 2024 चे विजेते व त्यांचे अपवादात्मक योगदान येथे पहा
राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांबद्दल:
2022 मध्ये, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार नऊ एल एस डी जी संकल्पनांसह समरूप करण्यासाठी पुन्हा आरेखित केले गेले, ज्यामध्ये सर्व 17 एस डी जी समाविष्ट आहेत. पंचायती राज संस्थांच्या क्षमतेचा फायदा घेऊन एसडीजींच्या स्थानिकीकरणाला गती देणे हा या धोरणात्मक संरेखनाचा उद्देश आहे.
राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांची प्रमुख वैशिष्ट्ये:
संकल्पना आधारित श्रेणी: खालील 9 एल एस डी जी संकल्पनांअंतर्गत पंचायतींचे त्यांच्या कामगिरीवर आधारित मूल्यमापन केले जाते:
- दारिद्र्य-मुक्त आणि वर्धित उपजीविका पंचायत
- निरोगी पंचायत
- बालस्नेही पंचायत
- पुरेसा जलसाठा पंचायत
- स्वच्छ आणि हरित पंचायत
- स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा असलेली पंचायत
- सामाजिक न्याय्य आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित पंचायत
- सुशासनासह पंचायत
- महिला-स्नेही पंचायत
* * *
PIB Mumbai | S.Patil/Sushma/Bhakti/Nandini/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2083535)