गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रो टप्पा-IV प्रकल्पाच्या रिठाला-कुंडली कॉरिडॉरला मंजुरी दिली
Posted On:
06 DEC 2024 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रोच्या टप्पा - IV प्रकल्पाच्या रिठाला - नरेला - नाथुपूर (कुंडली) या 26.463 किलोमीटर कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे,ज्यामुळे राष्ट्रीय राजधानी आणि शेजारील हरियाणा यांच्यातील संचारसंपर्क आणखी वाढेल.हा कॉरिडॉर मंजूर झाल्यापासून 4 वर्षात पूर्ण होणार आहे.
प्रकल्पाचा खर्च रु.6,230 कोटी आहे आणि चार वर्षांमध्ये दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड,(डीएम आर सी) भारत सरकार आणि राष्ट्रीय राजधानी दिल्ली प्रदेश सरकारच्या (जीएनसीटीडी ) विद्यमान 50:50 स्पेशल पर्पज व्हेईकलद्वारे (एसपीव्ही) कार्यान्वित करणार आहे.
ही लाइन सध्या कार्यरत असलेल्या शहीद स्थळ (नवीन बस अड्डा) - रिठाला (रेड लाइन) कॉरिडॉरचा विस्तार असेल आणि राष्ट्रीय राजधानीच्या उत्तर-पश्चिम भागांमध्ये जसे की नरेला, बवाना, रोहिणीचा काही भाग इत्यादी भागात कनेक्टिव्हिटी वाढवेल. या संपूर्ण भागामध्ये 21 स्थानके असतील. या कॉरिडॉरची सर्व स्टेशन्स एलिव्हेटेड असतील.
पूर्ण झाल्यानंतर, रिठाला - नरेला - नथुपूर कॉरिडॉर उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील शहीद स्थळ नवीन बस अड्डा स्थानकाला दिल्ली मार्गे हरियाणातील नथुपूरशी जोडेल, ज्यामुळे संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळेल.
टप्पा- IV प्रकल्पाचा हा नवीन कॉरिडॉर एनसीआरमधील दिल्ली मेट्रो नेटवर्कचा विस्तार करेल ज्यामुळे अर्थव्यवस्थेला आणखी चालना मिळेल. रेड लाईनच्या या विस्तारामुळे रस्त्यांवरील गर्दी कमी होऊन परिणामी, मोटार वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
या संपूर्ण खंडामध्ये 21 स्थानके असतील. या मार्गिकेवरची सर्व स्थानके उन्नत असतील.या मार्गिकेवर येणारी स्थानके आहेत: रिठाला , रोहिणी सेक्टर 25, रोहिणी सेक्टर 26, रोहिणी सेक्टर 31, रोहिणी सेक्टर 32, रोहिणी सेक्टर 36, बरवाला, रोहिणी सेक्टर 35, रोहिणी सेक्टर 34, बवाना औद्योगिक क्षेत्र 1 सेक्टर 3,4, बवाना औद्योगिक क्षेत्र - 1 सेक्टर 1,2, बवाना जेजे कॉलनी, सनोथ, न्यू सनोथ, डेपो स्टेशन, भोरगड गाव, अनाज मंडी नरेला, नरेला डीडीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नरेला, नरेला सेक्टर 5, कुंडली आणि नथुपूर .
हा कॉरिडॉर दिल्ली मेट्रोचा हरियाणापर्यंतचा चौथा विस्तार असेल. सध्या दिल्ली मेट्रो हरियाणातील गुरुग्राम, वल्लभगड आणि बहादूरगडपर्यंत धावते.
65.202 किमी आणि 45 स्थानके असलेल्या टप्पा -IV (3 प्राधान्य कॉरिडॉर) चे बांधकाम सुरू असून आजपर्यंत 56% पेक्षा जास्त बांधकाम पूर्ण झाले आहे. टप्पा -IV (3 प्राधान्य) कॉरिडॉर मार्च 2026 पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण होण्याची शक्यता आहे. याशिवाय, 20.762 किलोमीटरचे आणखी दोन कॉरिडॉर देखील मंजूर झाले असून ते निविदापूर्व टप्प्यात आहेत.
आज दिल्ली मेट्रो सरासरी 64 लाख प्रवाशांना सेवा पुरवते. 18.11.2024 रोजी आतापर्यंत सर्वाधिक 78.67 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. वक्तशीरपणा, विश्वासार्हता आणि सुरक्षितता या एमआरटीएस च्या मुख्य मापदंडांमध्ये उत्कृष्टतेचे प्रतीक स्थापित करून दिल्ली मेट्रो ही शहराची जीवनरेखा बनली आहे.
सध्या दिल्ली आणि एनसीआर मध्ये डीएमआरसी द्वारे 288 स्थानकांसह सुमारे 392 किमी लांबीचे एकूण 12 मेट्रो मार्ग चालवले जात आहेत. आज, दिल्ली मेट्रोचे भारतात सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क आहे आणि ते जगातील सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्कपैकी एक आहे.
S.Kakade/N.Mature/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2081759)
Visitor Counter : 29