कृषी मंत्रालय
कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके मिळायला हवी – कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान
बनावट खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या प्रकरणात दोषींना राज्यांनी कठोर शिक्षा द्यावी – कृषीमंत्री चौहान
Posted On:
28 NOV 2024 6:11PM by PIB Mumbai
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत चांगल्या दर्जाची खते, बियाणे आणि कीटकनाशके मिळतील याची खात्री केली पाहिजे. या संदर्भात, मंत्रालयामार्फत विभागनिहाय आढावा घेण्यात आला, त्यावेळी कृषीमंत्री चौहान यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी दोषींवर कठोर आणि प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या.
नवी दिल्ली येथील कृषी भवन येथे कृषी मंत्रालयाचा विभागनिहाय आढावा घेताना केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांनी शेतकऱ्यांना उच्च दर्जाची कीटकनाशके, बियाणे आणि खते नेहमी उपलब्ध करून दिली पाहिजेत, यावर भर दिला. मंत्री चौहान म्हणाले की, आगामी पीक हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी ते लवकरच राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. याचे कारण म्हणजे, प्रामुख्याने राज्य स्तरावरच प्रभावी उपाययोजना केल्या जातात.
शेतकरी बांधवांना दर्जेदार कीटकनाशके आणि खते मिळावीत यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्रित मोहीम राबवावी, असेही केंद्रीय मंत्री चौहान यांनी सांगितले. या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी खते, बियाणे आणि कीटकनाशकांबाबत संयुक्त मोहीम राबवण्यासाठी कृती आराखडा तयार करून तो लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून ही मोहीम देशभरात कोट्यवधी शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारांमार्फत विनाविलंब प्रभावीपणे राबविता येईल. यावेळी चौहान म्हणाले की, यासंदर्भात शेतकऱ्यांकडूनही अभिप्राय, मते घेण्यात यावीत, कारण प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाच्या बी-बियाणांमुळे शेतक-यावरच प्रभाव पडतो आणि पिकांचे नुकसान होते.
***
N.Chitale/S.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2078698)
Visitor Counter : 13