पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दुसऱ्या भारत - कॅरिकॉम परिषदेतील पंतप्रधानांच्या उद्घाटनपर भाषणाचा मराठी अनुवाद

Posted On: 21 NOV 2024 10:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 नोव्‍हेंबर 2024

 

मान्यवर अतिथी,

राष्ट्राध्यक्ष इरफान अली आणि पंतप्रधान डिकन मिशेल यांच्यासह दुसऱ्या भारत – कॅरिकॉम परिषदेचे आयोजन करताना मला अतिशय आनंद होत आहे. मी, कॅरिकॉम परिवारातल्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो आणि परिषेदच्या उत्कृष्ट आयोजनासाठी राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांचे विशेष आभार मानतो.

काही महिन्यांपुर्वी, ‘बेरील चक्रीवादळा’मुळे झालेल्या विनाशामुळे काही देशांमध्ये जीवित आणि मालमत्ता यांची लक्षणीय हानी झाली. सर्व भारतीयांच्या वतीने, मी तीव्र दुःख व्यक्त करतो.

मान्यवरहो,

पाच वर्षांच्या खंडानंतर आज आपली बैठक पार पडते आहे. या पाच वर्षांमध्ये, जग अनेक बदलांना सामोरे गेले आहे आणि मानवतेला अनेकविध तणाव आणि संकट यांचा सामना करावा लागला आहे.

दक्षिण गोलार्धातल्या म्हणजेच ग्लोबल साऊथ मधल्या आपल्यासारख्या देशांवर याचा सर्वात मोठा आणि सर्वाधिक नकारात्मक प्रभाव पडला आहे. म्हणूनच भारत नेहमीच कॅरिकॉम सोबत या सामायिक आव्हांनांना तोंड देण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी प्रयत्नशील राहिला आहे.

मग तो कोविड असो, नैसर्गिक आपत्ती, क्षमता निर्मिती किंवा विकासात्मक उपक्रम, भारत नेहमीच सर्वांच्या खांद्याला खांदा लावून विश्वासार्ह भागीदार म्हणून उभा राहिला आहे.

मान्यवरहो,

आपल्या मागील बैठकीत, आपण अनेक नवीन आणि सकारात्मक उपक्रम राबवण्याची सुरुवात केली. मला आनंद आहे की, ते सर्व उपक्रम प्रगती करत आहेत. भविष्यात, आपल्यातल्या सहकार्याला दृढता देण्यासाठी मी काही प्रस्ताव मांडू इच्छित आहे. हे प्रस्ताव सात मुख्य स्तभांवर आधारीत आहेत आणि हे स्तंभ आहेत C, A, R, I, C, O, M, म्हणजेच CARICOM.

पहिला C म्हणजे क्षमता बांधणी. भारत सातत्याने कॅरिकॉमच्या क्षमता बांधणीसाठी, शिष्यवृत्ती, प्रशिक्षण आणि तांत्रिक सहकार्य यांच्या माध्यमातून योगदान देऊ करत आला आहे. मी आज, भारतातर्फे दिल्या जाणाऱ्या आयटेक (ITEC) मधील शिष्यवृत्तींमध्ये 1000 जागांची वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवतो आहे.

तरूणांमध्ये, तांत्रिक प्रशिक्षण आणि कौशल्य व्यवस्थापन यांना चालना देण्यासाठी आम्ही बेलिझ मध्ये तंत्रज्ञान विकसन केंद्र स्थापित केले आहे. आम्ही त्याचा आकार आणि आवाका सर्व कॅरिकॉम देशांच्या वापरासाठी वाढवू.

कॅरिकॉम क्षेत्रासाठी आम्ही न्यायवैद्यक केंद्र स्थापन करण्यावर कार्यरत राहू. नागरी सेवकांच्या सातत्यपूर्ण क्षमता बांधणीसाठी, आम्ही ‘आय गॉट (I-GOT) कर्मयोगी पोर्टल’ भारतात विकसित केले आहे.

या पोर्टलवर, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा आणि शिक्षण या क्षेत्रातील ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. अशाच पोर्टलची निर्मिती कॅरिकॉम राष्ट्रांसाठीही केली जाऊ शकते. लोकशाही जननी म्हणून, कॅरिकॉम भागीदार देशांसह संसदीय प्रशिक्षणासाठी काम करण्यास भारत तयार आहे.

दुसरा, A आहे तो शेती आणि अन्न सुरक्षा यांच्यासाठी. कृषी क्षेत्रात, ड्रोन, डिजीटल शेती, शेतीचे यांत्रिकीकरण आणि मृदा परीक्षण सारख्या तंत्रज्ञानामुळे भारतातील कृषीक्षेत्राचा कायापालट झाला आहे. नॅनो खतांसह, आम्ही नैसर्गिक शेतीवरही लक्ष केंद्रीत करत आहोत. अन्न सुरक्षेला चालना देण्यासाठी आम्ही (मिलेट)भरडधान्य किंवा श्रीधान्याला प्रोत्साहन देत आहोत. भारताच्या या पुढाकारावरूनच, संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले होते. भरडधान्य ही बल व उर्जा देणारी (सुपरफूड) असून ती कोणत्याही वातावरणात पिकवली जाऊ शकतात. कॅरिकॉम देशांसाठी, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा वाढवण्याचे प्रभावी माध्यम म्हणून ती उपयुक्त ठरू शकतात. आपल्या प्रदेशातील एक लक्षणीय समस्या आहे‘सर्गासम सीवीड’. त्याचा परिणाम हॉटेल आणि पर्यटन उद्योगावर होतो.

भारतात, याच सीवीड पासून खतनिर्मितीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. कृषी उत्पादनात वृद्धी करताना हे तंत्रज्ञान या समस्येवर तोडगा ठरू शकते. भारत हे सर्व अनुभव कॅरिकॉम देशांबरोबर सामायिक करण्यास तयार आहे.

तिसरा, ‘R’ हा नवीकरणीय उर्जा आणि वातावरण बदलांसाठी आहे. आपल्या सर्वांसाठी प्राधान्याचा मुद्दा म्हणजे पर्यावरणीय आव्हाने. या क्षेत्रात जागतिक समन्वयन वाढवण्यासाठी, आम्ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी युती, मिशन लाईफ (पर्यावरणासाठी जीवनशैली) आणि जागतिक जैवइंधन आघाडी यासाठी पुढाकार घेतला आहे.

आपण सारे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे भाग आहात याचा मला आनंद वाटतो. इतरही पुढाकारांमध्ये आपण सहभागी व्हावे असे मी आपणाला आवाहन करतो. नवीकरणीय उर्जा क्षेत्रात आम्ही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहोत. आमचा प्रस्ताव आहे की, प्रत्येक कॅरिकॉम देशामध्ये किमान एक सरकारी इमारत सौरउर्जेवर चालवण्यास मदत करावी.

चौथा आहे, ‘I’ म्हणजे नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि व्यापार

आज भारताला तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्स चे केंद्र म्हणून ओळखले जाते. भारतात विकसित तांत्रिक उपाययोजना आमच्या वैविध्यपूर्ण समाजातून तयार होतात आणि काळाच्या कसोटीवर उतरतात यातच भारताचे वेगळेपण सामावलेले आहे. म्हणूनच, जगभरातल्या कोणत्याही देशात त्यांच्या यशाची खात्री देता येते. भारताच्या डिजीटल सार्वजनिक सुविधा ज्याला इंडिया स्टॅक असेही संबोधले जाते, त्याद्वारे आम्ही अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणतो आहोत.

आज, भारतातले लाखो लोकांना थेट लाभ हस्तांतरण एका क्लिकवर प्राप्त होते. संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, फ्रान्स, श्रीलंका, नेपाळ आणि मॉरिशिअस सारखे देश यापुर्वीच भारताच्या युनिफाईड पेमेंट इन्टरफेस (युपीआय)शी जोडले गेले आहेत.

माझा असा प्रस्ताव आहे की, कॅरिकॉम राष्ट्रांमध्ये युपीआय स्वीकारण्यासाठी आपण एकत्रित काम करू शकतो. आम्ही, नागरिकांसाठी क्लाऊड आधारीत डिजीलॉकर प्लॅटफॉर्म विकसित केला आहे ज्यात त्यांचे दस्तऐवज सुरक्षित ठेवू शकतात.

आम्ही कॅरिकॉम राष्ट्रांमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवू शकतो. भारतात, सार्वजनिक खरेदी अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी, आम्ही सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टल विकसित केले.

या पोर्टलवर, वैद्यकीय उपकरणे आणि संगणकापासून फर्निचर आणि मुलांची खेळणी सर्वकाही उपलब्ध असते. आम्हाला हे पोर्टल कॅरिकॉम देशांसमवेत सामायिक करण्यात आनंद होईल. 5T- व्यापार, तंत्रज्ञान, पर्यटन, प्रतिभा आणि परंपरा यांना प्रोत्साहित करण्यासाठी, आम्ही खाजगी क्षेत्रे आणि सर्व देशांतल्या भागधारकांना जोडणारे ऑनलाईन पोर्टल तयार करू शकतो.

भारत लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात (SME) वेगाने प्रगती करत आहे. गेल्या वर्षी झालेल्या भारत – कॅरिकॉम बैठकीदरम्यान, आम्ही लघु आणि मध्यम उद्योग प्रकल्पांसाठी १ दशलक्ष डॉलर्सचे अनुदान जाहीर केले होते. आपल्याला या अनुदानाच्या अंमलबजावणीला गती दिली पाहिजे. भारत हा अवकाश तंत्रज्ञानातला जगातल्या आघाडीच्या देशांपैकी एक आहे. अवकाश तंत्रज्ञानाचा वापरून कॅरिकॉम राष्ट्रांमध्ये संसाधनं दर्शक, हवामान अभ्यास आणि शेती या क्षेत्रांमध्ये एकत्र काम करू शकतो.

गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये, जी -20 शिखर परिषदेत, आम्ही जी -20 उपग्रहाची पर्यावरण आणि हवामान निरीक्षणासाठी घोषणा केली होती. या उपग्रहाचे 2027 पर्यंत प्रक्षेपण होणार आहे. आम्ही या मोहिमेमधील सर्व माहिती जगभरातल्या सर्व विशेषतः दक्षिण गोलार्धात असलेल्या देशांना सामायिक करू.

पाचवा ‘C’ हा क्रिकेट आणि संस्कृतीचा आहे. क्रिकेट हा आपल्या देशांना जोडणारा महत्त्वाचा आणि अत्यावश्यक दुवा आहे. मग ते 1983 च्या विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना असो किंवा आयपीएल, भारतीयांना वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंविषयी ममत्व आहे.

या वर्षीचा तुमच्या देशात आयोजित झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेने भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या कॅरेबियन देशांविषयीच्या आकर्षणात वृद्धी झाली आणि मी केवळ भारताने विश्वकरंडक जिंकला म्हणून हे म्हणत नाही! मी प्रस्ताव देतो की, क्रिकेटशी असणारे नातेसंबंध मजबूत करण्याबरोबरच, आपण महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक कॅरिकॉम देशांतल्या अकरा तरूण महिला क्रिकेट खेळाडूंना प्रशिक्षण देऊया.

आपला सामायिक सांस्कृतिक वारसा जागतिक मंचावर प्रदर्शित करण्यासाठी आपण पुढच्या वर्षी कॅरिकॉम देशांमध्ये भारतीय संस्कृती दिनांचे आयोजन करू शकतो. बॉलीवूडची लोकप्रियता पाहता, कॅरिकॉम देशांसमवेत चित्रपट महोत्सव आयोजित करण्यासाठी सहकार्य करू शकतो.

सहावा ‘O’ हा सागरी अर्थव्यवस्था आणि सागरी सुरक्षा यांचा आहे. भारतासाठी तुम्ही आता लहान बेटांचे राज्य राहिले नसून ते मोठे सागरी राष्ट्र आहात.

या क्षेत्रात जोडलेले राहाण्यासाठी, आम्ही प्रवासी आणि मालवाहू जहाज वाहातूक पुरवू शकतो असा प्रस्ताव देतो. आपण सागरी क्षेत्राचा नकाशा आणि हायड्रोग्राफी विषयी एकत्रित काम करू शकतो. गेल्या वर्षी, कॅरिकॉम ने आपले सागरी सुरक्षा रणनीती जाहीर केली होती.

या रणनीतीमध्ये, काही समस्या जसे अमली पदार्थांची तस्करी, चाचेगिरी, अवैध मासेमारी, मानवी तस्करी तसेच अप्रयुक्त आर्थिक सहकार्य क्षमता यांच्यावर प्रकाश टाकला हा. भारताला, या सर्व मुद्द्यांवर तुमच्यासमवेत सहकार्य वृद्धींगत करण्यात आनंद वाटेल.

सातवा, ‘M’ हा औषधे आणि आरोग्य सेवा यांच्यासाठी आहे. कॅरिकॉम राष्ट्रांची आरोग्य सुरक्षा हा भारतासाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषयी आहे.

भारताने जन औषधी केंद्र सुरू केली आहेत जी सर्वसामान्य माणसाला दर्जेदार व किफायतशील आरोग्य सेवा देते. सर्व कॅरिकॉम राष्ट्रांमध्ये आपण अशाच पद्धतीची केंद्रे स्थापित करावीत असा प्रस्ताव मी मांडतो. भारत आणि सर्व कॅरिकॉम राष्ट्रांदरम्यान औषधोपचारांसाठी परस्प मान्यतेचा करार करून या प्रयत्नाला गती देऊ शकतो.

कॅरिकॉम राष्ट्रांमध्ये औषध परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबतही आम्ही विचार करू इच्छितो. कर्करोग आणि इतर असंसर्गजन्य आजार हे कॅरिकॉम देशांसाठी महत्त्वाचे आव्हान आहे. त्याला तोंड देण्यासाठी, आम्ही भारतात विकसित करण्यात आलेले कर्करोग उपचार मशीन ‘सिद्धार्थ 2’ चा पुरवठा करू शकतो.

दुर्गम ठिकाणी सोयिस्कर आणि जागेवर उपचारांसाठी, आम्ही भारतात ‘भीष्म’ फिरती रुग्णालये विकसित केली आहेत. हे रुग्णालय काही मिनिटांत उभारली जाऊ शकतात आणि सर्व प्रकारच्या आघातांवर त्वरीत उपचार प्रदान करतात. कॅरिकॉम मित्रदेशांना ही फिरती रुग्णालये उपलब्ध करून देण्यात आम्हाला आनंद वाटेल.

दिव्यांग/अपंग व्यक्तींना, कृत्रिम अवयवांद्वारे मानवी सहाय्य प्रदान करण्यासाठी आम्ही कॅरिकॉम राष्ट्रांमध्ये वार्षिक जयपूर फूट कॅम्प आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडतो आहे. आम्ही डायलिसिस सामग्री तसेच सागरी रूग्णवाहिला प्रदान करण्याचा प्रस्तावही मांडतो.

जीवनशैलीशी निगडीत आजार जसे मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा सामना करण्यासाठी योग अत्यंत प्रभावी ठरतो. मन आणि शरीर समरस होण्यावर लक्ष केंद्रीत करणारी ही परंपरा भारतीय संस्कृतीकडून मानवतेला मिळालेली देणगी आहे.

2015 मध्ये, संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून जाहीर केला. लहान वयापासूनच योग अंगिकारण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आपण शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करू शकतो. भारतातून योग शिक्षक आणि प्रशिक्षक कॅरिकॉम राष्ट्रांमध्ये पाठवण्याचा प्रस्ताव आमच्याकडून देतो. यासह आपण योग उपचार आणि कॅरिकॉम देशांमध्ये भारतीय पारंपरिक औषधांचा वापर करण्याविषयी काम करू शकतो.

मान्यवरहो,

‘कॅरिकॉम- CARICOM’ च्या सात स्तंभांमध्ये एक गोष्ट सामायिक आहे- ती म्हणजे ते सर्व आपल्या प्राधान्यक्रम आणि गरजा यांच्यावर आधारित आहेत. आपल्या सहकार्याचे हे मूलभूत तत्व आहे. या विषयावर आपल्या सर्वांचे विचार ऐकण्यास मी उत्सुक आहे.

खूप खूप आभार.

 

* * *

S.Nilkanth/V.Salvi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2076272) Visitor Counter : 6


Read this release in: English