माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सीजीआय माकड, संगीत आणि जादू: इफ्फी 2024 मध्ये प्रेक्षकांना थक्क करणारा ‘बेटर मॅन’
“बेटर मॅनच्या माध्यमातून, प्रेक्षकांना गुंतागुंतीच्या जीवनाचा प्रतिध्वनी ऐकू येईल, तसेच संगीत आणि संदेशातून प्रेरणा मिळेल, अशी आशा : पॉल करी
#IFFIWood, 22 नोव्हेंबर 2024
"जर तुम्ही बर्फाच्या अगदी पातळ थरावर स्केटिंग करत असाल, तर तुम्ही कदाचित नाचू शकता." दिग्दर्शक मायकेल ग्रेसीच्या इंस्टाग्राम पोस्टमधील या धाडसी शब्दांसह, बेटर मॅनने 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा प्रारंभाचा चित्रपट म्हणून वातावरण तयार केले.चित्रपटाचे स्वरूप कसे असेल याविषयी निर्भीडतेने केलेल्या त्यांच्या या वक्तव्याला प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला. संगीत क्षेत्रातील दिग्गज रॉबी विल्यम्स यांच्या जीवनावर आधारित कल्पनारम्य चित्रपटाने मध्येच एक अनपेक्षित वळण घेतले आहे. ज्यामध्ये सीजीआय माकड मुख्य भूमिकेत आहे.
महोत्सवादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत, निर्माते पॉल करी यांनी या सिनेमॅटिक चमत्काराच्या निर्मितीबद्दल अंतर्दृष्टी सामायिक केली. ते म्हणाले, “आम्हाला या युगाचा विचार करतानाच प्रामाणिकपणे चित्रपट बनवायचा होता.’’ “रॉबी विल्यम्स सारख्या संगीत क्षेत्रातील ‘आयकॉन’ मानल्या जाणा-या व्यक्तीला माकडाच्या रूपात, मानव नसलेले पात्र म्हणून चित्रीत करण्याची कल्पना आम्ही वापरली. अर्थात हे दाखवणे खुळेपणाचे आणि धाडसाचेही होते. तरीही आम्ही तो धोका पत्करला आणि काहीतरी विलक्षण घडवले. सर्व अडचणींवर मात करून हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.”
करी यांनी स्पष्ट केले की ‘बेटर मॅन’ हा संगीतमय जीवनपट आहेच त्यापेक्षा अधिक त्यामध्ये आत्मिक आनंद शोधणारी, आत्म-शोधाची ही एक तीक्ष्ण, मर्मभेदक कथा आहे. आपण कोण आहोत हे जाणून घेवून, आत्मसात करणे आणि प्रतिकूलतेवर मात करताना संगीत आणि कल्पनेतून सांगितला जाणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे, असेही ते म्हणाले. या चित्रपटासाठी शेकडो कलाकारांनी जबरदस्त ‘व्हिज्युअल इफेक्ट्स’ तयार करण्यासाठी सहयोग दिला, यावर करी यांनी प्रकाश टाकला.
दिग्दर्शक मायकेल ग्रेसीच्या दृष्टीचे कौतुक करताना, करी यांनी त्यांचे वर्णन संगीत, नृत्य आणि सिनेमॅटोग्राफीचे मेळ साधण्यासाठी एक अद्वितीय प्रतिभा असलेले दिग्दर्शक ग्रेसी हे "कोरियोग्राफिंग शॉट्सचे मास्टर" आहेत, असे केले. “मायकेलची रॉबी विल्यम्ससोबतची वास्तविक जीवनातील मैत्रीमुळे चित्रपटाला खोली मिळाली आहे आणि त्यामुळे चित्रपटाची सत्यता वाढली आहे. हा चित्रपट केवळ एका कथा सांगतो असे नाही तर, पाहणा-याला अधिक चांगला माणूस बनवते, हा एक गुंतागुंतीच्या व्यक्तीने मनापासून साजरा केलेला उत्सव आहे."
नायकाच्या प्रेमासंबंधीची भूमिका करणारी रेशेल बनो हिने ही भावना व्यक्त केली. "एक अभिनेत्री म्हणून, मी प्रसिद्धीच्या उंबरठ्यावर असलेल्या, आंतरिक संघर्षांशी लढा देणाऱ्या एका तरुणाच्या कथेशी खोलवर जोडले गेले." बनो पुढे म्हणाल्या, “हा चित्रपट केवळ रॉबी विल्यम्सच्या संगीतकार म्हणून प्रतिभेबद्दलचा नाही; तर आपण सर्वजण तोंड देत असलेल्या सार्वत्रिक संघर्षांबद्दल आहे. ही एक अशी कथा आहे की, आपण कुठूनही आलो असलो तरी तिच्या पात्रांमध्ये आपण स्वतःला पाहत राहतो.”
आपल्या समारोपाच्या टिपणीमध्ये, पॉल करी म्हणाले, “नायकाचा प्रवास वैश्विक - सार्वत्रिक आहे, मग तो भारत, ऑस्ट्रेलिया किंवा जगात कुठेही असो. आम्हाला आशा आहे की , 'बेटर मॅन' द्वारे, प्रेक्षक जीवनातील गुंतागुंतींचा प्रतिध्वनी ऐकतील, संगीत आणि संदेशातून प्रेरणा घेतील.
इफ्फी 2024 मध्ये शुभारंभाचा चित्रपट म्हणून, 'बेटर मॅन' या चित्रपटाने महोत्सवामध्ये एक उच्च ‘बेंचमार्क’ तयार केला आहे. चित्रपटाची धाडसी संकल्पना, लक्षवेधक दृश्ये आणि भावनेला हात घालणारा गाभा, यामुळे सर्व सीमारेषा तोडण्याबरोबरच रूढ संकल्पना तोडून आव्हान देणा-या कथाकथनाच्या सामर्थ्याचा पुरावा म्हणजे हा चित्रपट आहे.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | N.Chitale/Suvarna/Darshana | IFFI 55
(Release ID: 2076138)
Visitor Counter : 21