अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

नॅशनल कॅन्सर ग्रीड या संस्थेच्या वार्षिक बैठकीमुळे कर्करोग नियंत्रणासंदर्भात आसियान-भारत सहयोगात वाढ

Posted On: 11 NOV 2024 9:05PM by PIB Mumbai

मुंबई, 11 नोव्हेंबर 2024

दिनांक 6 ते 8 नोव्हेंबर 2024 या कालावधीत मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात  भारतीय नॅशनल कॅन्सर ग्रीड (एनसीजी) या संस्थेची वार्षिक बैठक पार पडली. एनसीजी म्हणजे भारत आणि इतर 15 देशातील 360 हून अधिक कर्करोग संबंधी केंद्रे, संशोधन संस्था, रुग्णांचे गट आणि व्यावसायिक सहकारी संस्था यांच्या सहकार्यात्मक नेटवर्कशी संबंधित संस्था आहे. केंद्रीय अणुउर्जा विभागाच्या (डीएई) आर्थिक मदतीसह एनसीजी सदस्य संस्था दर वर्षी 850,000 कर्करोगग्रस्त  नव्या रुग्णांवर उपचार करतात जे भारतातील एकूण कर्करोग ग्रस्त रुग्णांपैकी 60% आहेत. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीला कर्करोगाशी संबंधित व्यावसायिक, संशोधक, धोरणकर्ते, स्वयंसेवी संस्था आणि रुग्ण सल्लागार असे  300 हून अधिक लोक उपस्थित होते. जगभरातील 14 देशांतील  आंतरराष्ट्रीय पातळीवरील 27 नेत्यांचा सहभाग हे या बैठकीचे उल्लेखनीय वैशिष्ट्य होते. नॅशनल कॅन्सर ग्रीड या संस्थेने केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि जकार्ता मधील आसियान साठीचे भारतीय मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आसियानच्या सदस्य देशांना या बैठकीत सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले. यावेळी प्रथमच, 8 आसियान सदस्य देशातील 18 कर्करोग तज्ञ आणि धोरणकर्ते तसेच आसियान सचिवालयाच्या आरोग्य विभागातील एक प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले. आसियान-भारत निधीअंतर्गत आसियान आणि भारताने मंजूर केलेल्या अशा पाच वार्षिक बैठकांपैकी ही पहिलीच बैठक होती.

आसियान सदस्य देशांना नॅशनल कॅन्सर ग्रीड या संस्थेच्या कार्याशी परिचित होण्याची तसेच या प्रकल्पाअंतर्गत कर्करोग नियंत्रण विषयक कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एनसीजीच्या विविध उपक्रमांवर भर देणारी वैविध्यपूर्ण कार्यक्रम पत्रिका तसेच भविष्यातील उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणारी विचारमंथन सत्रे यांचा या बैठकीत समावेश होता. हा उपक्रम आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करेल आणि आरोग्य क्षेत्रात आसियान-भारत सहकार्याला मोठी चालना देत या क्षेत्रात   कर्करोग नियंत्रण उपक्रमांचा प्रसार वाढवण्याचे कार्य करेल. 

आसियान प्रतिनिधींसोबत, 3 बिमस्टेक (बहु-क्षेत्रीय तांत्रिक तसेच आर्थिक सहकार्यासाठी बंगालच्या खाडी प्रदेशातील राष्ट्रे) सदस्य देशातील 5 ज्येष्ठ कर्करोग उपचार व्यावसायिक आणि धोरणकर्ते देखील या केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पाठबळासह आयोजित बैठकीत सहभागी झाले होते.

केंद्रीय अणुउर्जा विभाग (डीएई) सचिव आणि भारतीय अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ.अजित कुमार मोहंती यांनी केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील कर्करोग नियंत्रणविषयक प्रयत्न वाढवण्याप्रती डीएईच्या कटिबद्धतेचे जोरदार समर्थन केले आहे. अनेक विकसनशील आणि अविकसित देशांनी केलेल्या विनंतीवरुन, व्हिएन्ना येथे 2019 मध्ये झालेल्या आयएईएच्या सर्वसाधारण परिषदेत एनसीजी चा जागतिक घटक असलेल्या एनसीजी विश्वम या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. एनसीजी जागतिक कर्करोग नेटवर्क जगभरातील अनेक कर्करोग नियंत्रण संस्थांशी भागीदारी प्रस्थापित करून जागतिक पातळीवर कर्करोगाच्या समस्येचा ताण कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे.

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2072574) Visitor Counter : 42


Read this release in: English