माहिती आणि प्रसारण मंत्रालय
55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीबाबत पत्र सूचना कार्यालयाच्या प्रधान महासंचालकांनी साधला गोव्यामधील प्रसारमाध्यमांसोबत संवाद
गोव्यामध्ये आयोजित होत असलेल्या 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या(इफ्फी) पूर्वावलोकनाचा भाग म्हणून आज केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा आणि भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पीआयबी पश्चिम क्षेत्राच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी पणजी येथे प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नवी दिल्लीच्या पत्र सूचना कार्यालयाचे अतिरिक्त महासंचालक धर्मेंद्र तिवारी हे देखील यावेळी उपस्थित होते.
आगामी 55व्या इफ्फीची तयारी आणि या महोत्सवाच्या वार्तांकनासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी असलेल्या सुविधा याबाबत चर्चा करण्यासाठी माध्यम व्यावसायिकांसोबत या संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. 20 ते 28 नोव्हेंबर 2024 दरम्यान आयोजित होणार असलेल्या इफ्फीदरम्यान प्रसारमाध्यमांसाठीच्या प्रमुख उपक्रमांवर या चर्चेत भर देण्यात आला.
पीआयबी गोवा, चे संचालक नाना मेश्राम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर पश्चिम क्षेत्राच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी एक सविस्तर सादरीकरण केले. या सादरीकरणात इफ्फी 2024 साठी प्रसारमाध्यमांना सुविधा देणारे उपक्रम आणि त्यांना उपलब्ध करून देण्यात येणारी साधने यावर भर देत या महोत्सवाच्या संवाद धोरणाची माहिती देण्यात आली.
प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा यांनी उपस्थितांशी संवाद साधताना प्रसारमाध्यम अधिस्वीकृती आणि या महोत्सवात पत्र सूचना कार्यालयाची एकंदर जबाबदारी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांची माहिती दिली. माध्यम नोंदणी आणि अधिस्वीकृतीसाठी पीआयबीने एक सर्वसमावेशक प्रक्रिया राबवली, असे त्यांनी सांगितले आणि तिच्या सद्यस्थितीची माहिती देखील दिली.
ओझा यांनी इफ्फीमध्ये प्रसारमाध्यमांना मदत करण्यामध्ये पीआयबीच्या व्यापक भूमिकेबाबतही विवेचन केले, विशेषतः पत्रकार परिषदा, महत्त्वाच्या कार्यक्रमांचे वार्तांकन आणि माध्यम सुविधा या संदर्भात त्यांनी माहिती दिली. मुलाखतींसाठी उत्तम सोयीसुविधांनी युक्त असलेले कक्ष, प्रमुख कार्यक्रमांचे लाईव्ह स्ट्रिमिंग आणि एलईडी स्क्रीन अपडेट्स सारख्या विविध साधनांच्या माध्यमातून रियल टाईम माहितीचे प्रसारण, व्हाटस्ऍप ग्रुप नोटिफिकेशन्स, प्रसिद्धी पत्रके आणि सोशल मीडिया पोस्ट्स यांसह सर्वसमावेशक माध्यम सुविधा पीआयबीकडून उपलब्ध केल्या जातील यावर त्यांनी भर दिला.
इफ्फी 2024 चे यश सर्व हितधारकांच्या सक्रीय सहभागावर अवलंबून आहे असे सांगत त्यांनी प्रसारमाध्यमांनी संपूर्ण सहकार्य देण्याचे आवाहन केले. “आपण एकत्रितपणे इफ्फीला नव्या उंचीवर नेऊ शकतो”, असे ओझा म्हणाले. “ या महोत्सवाचे जे महत्त्व आहे ते जागतिक पातळीवर राखण्याची सुनिश्चिती करण्यात तुमचे पाठबळ आणि सहकार्य अत्यावश्यक आहे.”
जागतिक पातळीवर इफ्फीची प्रसिद्धी वाढवण्यामध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्यावर वत्स यांनी आपल्या संबोधनात भर दिला आणि माध्यमांना सक्रीय राहण्यासाठी आवश्यक असलेले पाठबळ पुरवण्यासाठी, रियल टाईम अपडेट्स, मल्टिमीडिया रिलिजेस आणि समर्पित माध्यम कक्ष यांच्यासह पीआयबीकडून वापर होणार असलेली साधने आणि प्रणालींची चर्चा केली. 18 नोव्हेंबर 2024 पासून पासेसचे वितरण सुरू करून या महोत्सवापूर्वी प्रसारमाध्यम अधिस्वीकृती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. संवादाच्या दृष्टीकोनातून हा महोत्सव अतिशय सुरळीतपणे पार पडेल हे सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यंदाच्या इफ्फीसाठी पीआयबीच्या विविध उपक्रमांना देखील शर्मा यांनी अधोरेखित केले. पहिल्यांदाच डिजिटल आशय निर्मात्यांच्या डिजिटल मीडिया अवकाशातल्या वाढत्या प्रभावाची दखलघेत त्यांना स्वतंत्रपणे नोंदणी करण्याची संधी असेल. त्या व्यतिरिक्त, प्रसारमाध्यमांची चित्रपट रसास्वादक्षमता वाढवण्यासाठी आणि महोत्सवाचे वार्तांकन अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या सहकार्याने फिल्म अॅप्रिसिएशनमधील एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील आयोजित केला जाईल. समावेशकतेच्या बांधिलकीला अनुसरून पीआयबी कोंकणीमधूनही प्रसिद्धी पत्रके प्रसिद्ध करेल, ज्यामुळे स्थानिक प्रेक्षकांना माहिती मिळेल आणि त्यांचा सहभाग वाढेल.
या सादरीकरणानंतर प्रश्नोत्तरांचे सत्र पार पडले. यामध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारले व महोत्सवाची नांवनोंदणी पद्धत, माध्यम प्रतिनिधींसाठी असलेल्या सुविधा आणि महोत्सवाचे एकंदर वार्तांकन याबाबतचे विचार व अभिप्राय मांडले.
पीआयबी चे अतिरिक्त महासंचालक धर्मेंद्र तिवारी यांच्या आभार प्रदर्शनाने या सत्राची सांगता झाली. तिवारी यांनी सर्व माध्यम प्रतिनिधींचे त्यांच्या सहभागाबद्दल आभार मानले व इफ्फी 2024 च्या यशासाठी त्यांनी दर्शवलेल्या प्रतिबद्धतेसाठी धन्यवाद दिले. पीआयबी मुंबईचे सहसंचालक सय्यद राबीहाश्मी, पीआयबी मुंबईच्या सहायक संचालक निकीता जोशी आणि केंद्रिय जनसंवाद कार्यालय पणजी शाखेचे क्षेत्रिय प्रचार अधिकारी रियाझ बाबू हेदेखील यावेळी उपस्थित होते.
या सत्रात गोव्यातील मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या वार्तालाप कार्यक्रमाच्या अनुषंगाने पीआयबी चे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा यांनी इफ्फीसाठी पीआयबीने केलेल्या तयारीचा आढावा घेतला व इफ्फीच्या आयोजनस्थळी असलेल्या पीआयबीच्या माध्यम कक्षाला भेट दिली.
***
N.Chitale/S.Patil/S.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2071886)
Visitor Counter : 63