ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय मानक ब्युरोने मुंबईत ‘जागतिक मानक दिन’ केला साजरा ; शाश्वत विकासातील मानकांचे महत्त्व केले अधोरेखित
आपल्या कृतींना दिशा देणारी नैतिक मानके विचारात घेऊन अधिक न्याय्य समाजासाठी कार्य करा : महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप उके
प्रविष्टि तिथि:
14 OCT 2024 8:38PM by PIB Mumbai
मुंबई, 14 ऑक्टोबर 2024
भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) आज (14 ऑक्टोबर 2024) मुंबईतील सिप्झ येथील भारतरत्नम् - मेगा सामाईक सेवा केंद्रात 'जागतिक मानक दिन' साजरा करण्यासाठी 'मानक महोत्सव' आयोजित केला होता. "उत्तम जगाकरिता सामायिक दृष्टिकोन - शाश्वत विकास उद्दिष्टे 9 वर प्रकाश - कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात उद्योग, नवोन्मेष आणि पायाभूत सुविधा" ही यावर्षीच्या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना होती. भारतीय मानक ब्युरो, दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी, जागतिक मानक दिन साजरा करते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मानके म्हणून प्रकाशित केलेले स्वयंसेवी तांत्रिक करार विकसित करणाऱ्या हजारो तज्ञांच्या सहयोगी प्रयत्नांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
जागतिक मानक दिनाच्या समारंभात प्रेरक भाषणात, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप उके यांनी शाश्वत विकासाला चालना देण्यात आणि सामाजिक आव्हानांना तोंड देण्यात मानकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. या कार्यक्रमात सरकारी अधिकारी, उद्योगातील नेते आणि विद्यार्थी मानकीकरणाच्या भूत, भविष्य आणि वर्तमानावर विचार करण्यासाठी एकत्र जमले होते. “मानके केवळ गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठीच नव्हे तर आपल्या विकास प्रयत्नांमध्ये सर्वसमावेशकता आणि शाश्वततेला चालना देण्यासाठी आवश्यक आहेत”, असे डॉ. उके यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी (SDGs) संरेखित केलेल्या सर्वांसाठी स्वच्छता, घरे आणि वीज या सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या कार्यक्रमांसह अनेक महत्त्वाच्या उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. ही महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमध्ये एकत्रित प्रयत्नांची गरज या संदेशाने अधोरेखित केली आहे. उद्योग आणि प्रशासनातील मानकांच्या महत्त्वावर चर्चा करण्याबरोबरच, सर्वांनी मानवी मूल्यांबाबत आत्मपरीक्षण करावे,आपल्या कृतींना दिशा देणारी नैतिक मानके विचारात घेऊन अधिक न्याय्य समाजासाठी कार्य करा असे आवाहन त्यांनी केले.

भारतीय मानक ब्युरोच्या पश्चिम क्षेत्राचे उपमहासंचालक संजय गोस्वामी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारतीय मानक ब्युरोने राबवलेल्या विविध उपक्रम आणि कामांवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमादरम्यान अखिल भारतीय प्रथम तसेच प्रदेशातील प्रथम परवानाधारकांचा सत्कार करण्यात आला. मानक प्रोत्साहन कार्यासाठी भारतीय मानक ब्युरोला सहकार्य करणाऱ्या परवानाधारक, असेयिंग सेंटर्स आणि स्टँडर्ड क्लब्स सारख्या भागधारकांचा देखील या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
मानक महोत्सवाचा एक भाग म्हणून, भारतीय मानक ब्युरोने स्वयंसेवकांच्या (मानक मित्रा) मदतीने घरोघरी जाऊन जागरूकता मोहीम देखील राबवली. या मोहिमेत युवकांशी संवाद साधताना, स्वयंसेवकांनी भारतीय मानक ब्युरोच्या कामकाजाची माहिती दिली, भारतीय मानक ब्युरो अनिवार्य प्रमाणन अंतर्गत येणाऱ्या सामान्य घरगुती वस्तूंची माहिती दिली आणि भारतीय मानक ब्युरोच्या संकेतस्थळाचे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच, बीआयएस केअर ॲपची वैशिष्ट्ये समजाऊन सांगितली.
मानक महोत्सवादरम्यान लोकांमध्ये गुणवत्ता आणि मानकाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी क्वालिटी वॉक, खुली चित्र स्पर्धा, आंतरशालेय भित्तीचित्र स्पर्धा, आणि नेहरू विज्ञान संग्रहालय येथे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक्सपोजर व्हिजिटचे आयोजन करण्यात आले होते.

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2064839)
आगंतुक पटल : 40
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English