ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
जागतिक मानक दिन 2024: बीआयएस मुंबई शाखा कार्यालय-II तर्फे औद्योगिक नवोन्मेष आणि मानके यासंबंधी कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
10 OCT 2024 12:50PM by PIB Mumbai
मुंबई, 10 ऑक्टोबर 2024
जागतिक मानक दिनानिमित्त भारतीय मानक ब्यूरो अर्थात बीआयएसच्या मुंबई शाखा कार्यालय-II तर्फे 09 ऑक्टोबर 2024 रोजी ठाणे येथे मानक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ''पायाभूत सुविधा आणि औद्योगिक नवोन्मेषासाठी मानके'', या संकल्पनेवर आयोजित या कार्यक्रमात विविध उद्योग, शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक संघटनांमधील प्रमुख भागधारक सहभागी झाले होते. औद्योगिक नवोन्मेष आणि विकासाला चालना देण्यात मानकांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

मानक परिषदेला चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि ठाणे-बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे महाव्यवस्थापक, ठाणे लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष, शिक्षक, प्राध्यापक यांच्यासह उद्योग क्षेत्राशी संबंधित प्रतिनिधी उत्साहाने उपस्थित होते. औद्योगिक विकास, नवोन्मेष आणि अर्थव्यवस्थेची व्याप्ती विस्तारण्यासाठी मानके कशी साहाय्यभूत होऊ शकतात, याविषयी चर्चा घडवून आणणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, मानक आणि नवोन्मेष क्षेत्रात शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी एक रील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतल्या पहिल्या तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांचा 14 ऑक्टोबर 2024 रोजी नियोजित मानक महोत्सवादरम्यान सत्कार केला जाईल.

औद्योगिक पद्धतींमध्ये गुणवत्ता, सुरक्षा आणि शाश्वतता सुनिश्चित करण्यात मानके बजावत असलेल्या भूमिकेविषयी बीआयएसच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. या प्रयत्नांमध्ये संशोधन आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून शैक्षणिक संस्था कशा प्रकारे योगदान देत आहेत, हे दर्शवण्यात आले.
बीआयएस, उद्योगांमध्ये नवोन्मेषाला चालना देण्यात मानकांचा अवलंब, प्रोत्साहन यासाठी वचनबद्ध राहत जागतिक स्तरावर भारत स्पर्धात्मक राहील, याची सुनिश्चिती करत आहे.

* * *
PIB Mumbai | NM/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2063771)
Visitor Counter : 55