दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय टपाल विभाग 7 ते 11 ऑक्टोबर 2024 या कालावधीत साजरा करत आहे राष्ट्रीय टपाल सप्ताह
भारतीय टपाल विभाग सर्वसमावेशक ग्राहक-केंद्रित सेवा प्रदान करण्यासाठी, आर्थिक साक्षरता, फीलाटली आणि सामाजिक दायीत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहे: महाराष्ट्र सर्कलचे चीफ पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह
Posted On:
09 OCT 2024 8:31PM by PIB Mumbai
मुंबई, 9 ऑक्टोबर 2024
जागतिक टपाल दिवस, युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या (जागतिक टपाल संघटना) स्थापना दिनाचे महत्व अधोरेखित करत असून, दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. यंदा युनिव्हर्सल पोस्टल युनियन आपल्या स्थापनेची 150 वर्षे साजरी करत असून, ‘संवाद सुलभ करण्याची आणि जगभरातील लोकांना सक्षम बनवण्याची 150 वर्षे’ ही यंदाची संकल्पना आहे. भारत सरकारचा टपाल विभाग 7 ऑक्टोबर 2024 ते 11 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राष्ट्रीय टपाल सप्ताह 2024 साजरा करत आहे.

या निमित्ताने, महाराष्ट्र सर्कलचे (मंडळ) चीफ पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह यांनी आज मुंबईत जीपीओ (GPO) येथे आयोजित कार्यक्रमात ‘जागतिक टपाल दिना’च्या ‘संवाद सुलभ करण्याची आणि जगभरातील लोकांना सक्षम बनवण्याची 150 वर्षे’, या संकल्पनेसह विशेष पोस्टकार्ड आणि विशेष टपाल तिकीट प्रकाशित केले.
कार्यक्रमाला संबोधित करताना महाराष्ट्र सर्कलचे चीफ पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह म्हणाले की, टपाल हे गेल्या पिढीसाठी एकमेव संवादाचे माध्यम होते, तरी जगभरातील टपाल विभाग सध्याच्या काळातही वैशिष्ट्यपूर्ण भूमिका बजावू शकतील.

ब्रिटीश राजवटीत 1854 साली झालेल्या स्थापनेपासून, ते आताच्या बहुआयामी टपाल, आर्थिक आणि किरकोळ सेवा प्रदाता या भूमिकेपर्यंत, भारतीय टपाल विभागाने देशाच्या बदलत्या गरजांशी जुळवून घेतले आहे. भारतीय टपाल विभागाला यंदा 170 वर्षे पूर्ण होत आहेत. अमिताभ सिंह म्हणाले की, भारतीय टपाल विभाग सर्वसमावेशक ग्राहक-केंद्रित सेवा प्रदान करण्यासाठी, आर्थिक साक्षरता, फीलाटली (टपाल तिकिटांचा संग्रह आणि अभ्यासाचा छंद) आणि सामाजिक जबाबदारीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
महाराष्ट्र सर्कलमध्ये टपाल विभागा द्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवांची थोडक्यात माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करावे
गेल्या पाच वर्षांत, महाराष्ट्र सर्कलने 5,976 टपाल सहाय्यक, 6,950 पोस्टमन/मेल गार्ड आणि 5,761 मल्टी-टास्किंग कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. याशिवाय, 11,589 ग्रामीण टपाल सेवक (GDS) ग्रामीण भागातील शाखा टपाल कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत. टपाल विभागाने दुर्गम भागातील ग्राहकांना जलद आणि सुरक्षित टपाल सेवा देण्यासाठी दर्पण 2.0 हे अँड्रॉइड मोबाईल ॲप सुरु केले आहे.
महाराष्ट्र सर्कलने चालू आर्थिक वर्षात 40 लाख इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) खाती उघडली असून, ही योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत 1.5 कोटी IPPB खाती उघडण्यात आली आहेत.

महाराष्ट्र सर्कल विषयी थोडक्यात माहिती:
महाराष्ट्र सर्कल मध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांचा समावेश असून, यात 6 प्रदेश, 43 टपाल आणि 7 RMS विभाग आहेत. महाराष्ट्र आणि गोव्याच्या ग्रामीण भागात 61 मुख्य टपाल कार्यालये, 2,160 उप टपाल कार्यालये आणि 11,816 टपाल कार्यालये (LWE भागातील 829), असे टपाल विभागाचे विस्तृत जाळे पसरले आहे.
महाराष्ट्र सर्कलने राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त (7 ते 11 ऑक्टोबर, 2024) आयोजित केलेल्या दिवसनिहाय उपक्रमांबद्दल माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करावे
* * *
PIB Mumbai | N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2063664)