माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय संगीतशास्त्रज्ञ आणि संग्राहक सुरेश चांदवणकर यांच्या दुर्मिळ तबकड्या संग्रहाचे जतन करणार


चांदवणकर कुटुंबाने तबकड्यांचा विस्तृत संग्रह एनएफडीसी- एनएफएआयकडे केला सुपूर्द

Posted On: 09 OCT 2024 4:05PM by PIB Mumbai

मुंबई/पुणे, 9 ऑक्‍टोबर 2024

 

राष्ट्रीय  चित्रपट विकास महामंडळ - भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफडीसी- एनएफएआय)ने दिवंगत सुरेश चांदवणकर यांच्या अनमोल तबकड्या (रेकॉर्ड ) संग्रहाच्या संपादनाची घोषणा केली.  या वर्षाच्या सुरुवातीला वयाच्या  71 व्या वर्षी निधन झालेले सुरेश चांदवणकर हे एक शास्त्रज्ञ, संग्राहक  आणि संगीतशास्त्रज्ञ होते. 1970 च्या सुरुवातीपासून, चांदवणकरांना 78 RPM रेकॉर्ड्सचा संग्रह करण्याची आवड होती, जी भारताच्या समृद्ध श्राव्य (ऑडिओ) इतिहासाचे रक्षण करण्याच्या व्यापक प्रयत्नात रूपांतरित झाली.

जसबीर सिंग बैदवान, व्यवस्थापक, एनएफडीसी- एनएफएआय प्रेरणा चांदवणकर आणि रुचा चांदवणकर यांना कृतज्ञता पत्र सुपूर्द करताना

ते ‘सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स’ चे संस्थापक सदस्य होते, या  व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी भारताच्या संगीताच्या भूतकाळाचे दस्तऐवजीकरण आणि ज्ञान सामायिक करण्यासाठी सहकारी उत्साही लोकांसोबत सहयोग केला. त्यांचे लेखन, विविध प्रकाशने आणि जर्नल्समध्ये प्रकाशित झाले असून वैशिष्ट्यपूर्ण , दुर्मिळ रेकॉर्डिंग आणि विस्मरणात गेलेल्या  कलाकारांच्या कथांबद्दल अनमोल माहिती त्यात आहे जी त्यांचा वारसा चिरकाल टिकवून ठेवेल. दान केलेल्या या संग्रहात त्यांनी अनेक दशकांपासून गोळा केलेल्या शेलॅक आणि विनाइल रेकॉर्डचा  समावेश आहे.

या संग्रहाचे काळजीपूर्वक कॅटलॉगिंग आणि जतन व्हावे यासाठी त्यांच्या पत्नी  प्रेरणा चांदवणकर आणि कन्या रुचा चांदवणकर यांनी एनएफडीसी- एनएफएआय ला भेट दिली. सुरेश चांदवणकर यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या  पत्नी  म्हणाल्या की सुरेश चांदवणकर हे  अतिशय दानशूर  होते. संगीत आणि ग्रामोफोन रेकॉर्ड्सची त्यांची आवड त्यांनी आयुष्यभर जपली आणि ही आवड शक्य तितक्या व्यापकपणे सामायिक  करण्याचा प्रयत्न केला. प्रथम मुंबई आणि पुण्यातील संगीत प्रेमींसाठी त्यांनी असंख्य श्रवण सत्रे आयोजित केली.  नंतर त्यांनी इतिहासाचा हा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी आपल्या रेकॉर्ड संग्रहाचे डिजिटायझेशन सुरू केले. आणि इतरांना आनंद मिळावा यासाठी त्यांनी  आपले डिजिटाइज्ड संकलन  इंटरनेटवर मोफत उपलब्ध करून दिले.

प्रत्येकाला त्यांच्या अद्भुत संगीत संग्रहाचा आनंद घेण्याची संधी मिळावी यासाठी ते आयुष्यभर झटले. त्यांनी अनेकदा नमूद केले की, त्यांच्या पश्चात, त्यांचा संग्रह एका प्रस्थापित संस्थेला देण्यात यावा, जे त्यांचे रेकॉर्ड संग्रह जतन करण्याचे, त्याचे डिजीटायझेशन करण्याचे आणि  प्रत्येकासाठी संगीत उपलब्ध करून देण्याचे कार्य चालू ठेवेल. आणि म्हणूनच, चांदवणकर कुटुंबाला आनंद झाला आहे की त्यांचा संग्रह एनएफडीसी- एनएफएआय  ने स्वीकारला आहे, जो त्यांचा वारसा जतन करेल आणि त्यांचे कार्य आयुष्यभर चालू ठेवेल.”

एनएफडीसी-भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयने चांदवणकर कुटुंबियांच्या उदार देणगीबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. हा संग्रह संशोधक, इतिहासकार आणि संगीत रसिकांसाठी एक अमूल्य संसाधन असल्याचे नमूद केले आणि सुरेश चांदवणकर यांचा हा वारसा जिवंत राहील आणि भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

चांदवणकर कुटुंबीयांनी दिलेली ही महत्त्वपूर्ण देणगी म्हणजे भारताच्या संगीत वारशाचे मोठे संवर्धन आहे.

एनएफडीसी- एनएफएआय बद्दल: 

भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) ही भारतातील एक प्रमुख संस्था आहे जी भारतीय सिनेमाच्या विकास, जतन आणि संवर्धनासाठी समर्पित आहे. चित्रपट संबंधी  कामांचा व्यापक संग्रह आणि सर्जनशील प्रतिभेला चालना देण्याच्या वचनबद्धतेसह, एनएफडीसी- एनएफएआय भारतीय चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी आणि समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.

    

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2063490) Visitor Counter : 69


Read this release in: English