वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या दरम्यान आर्थिक व्यवहार यंत्रणांची पायाभूत सुविधा उभारणी तसेच आंतरपरिचालन आता शक्य

Posted On: 07 OCT 2024 7:40PM by PIB Mumbai

मुंबई, 7 ऑक्‍टोबर 2024

 

भारताचा धोरणात्मक भागीदार असलेला युएई अर्थात संयुक्त अरब अमिरात हा देश 3 दशलक्ष भारतीयांचे निवासस्थान देखील आहे आणि भारतीयांसाठी आकर्षक पर्यटन स्थळ असलेल्या या देशाला दरवर्षी सुमारे 6 दशलक्ष लोक भेट देतात. भारत आणि युएई या दोन देशांतील आर्थिक व्यवहार यंत्रणांची भागीदारी या चैतन्यमय आणि ऐतिहासिक संबंधांना आणखी नवा आयाम जोडत आहे.

या दोन्ही देशांच्या दरम्यानचे नाते आणखी वृद्धींगत करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया  त्याच्या एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट ली. या आंतरराष्ट्रीय उपकंपनीच्या माध्यमातून युएईमधील अल एतिहाद पेमेंट्स(एईपी) शी सहयोगी संबंध प्रस्थापित करत असून यामुळे युएईमध्ये जयवान ही देशांतर्गत कार्ड प्रणाली कार्यान्वित करणे शक्य होणार आहे. एईपी ही युएईमधील राष्ट्रीय पेमेंट्स विषयक संस्था असून, सर्वोत्कृष्ट वित्तीय बाजारपेठविषयक पायाभूत सुविधा विकसित तसेच कार्यान्वित करण्यासाठीच्या राष्ट्रीय पेमेंट्स धोरणाचा भाग म्हणून युएईच्या सेंट्रल बॅंकेतर्फे (सीबीयुएई) वर्ष 2023 मध्ये तिची स्थापना करण्यात आली. जयवान कार्ड प्रणाली ही एनआयपीएल आणि एईपी यांच्यातील सखोल सहयोगातून निर्माण झालेली यंत्रणा आहे. भारतात एनपीसीआय द्वारे मोठ्या प्रमाणार विकसित आणि कार्यान्वित करण्यात आलेल्या रुपे कार्ड च्या संकल्पनेवर जयवान कार्ड प्रणाली आधारित असून डिजिटल व्यवहारांच्या क्षेत्रात युएईला सार्वभौमत्व शक्य करून देण्यासाठी एईपीतर्फे सर्वांसाठी सामायिक करण्यात येत आहे.

दोन्ही देशांची सरकारे आता युपीआय(भारत) आणि एएएनआय(युएई) या दोन राष्ट्रीय पेमेंट्स मंचांना परस्परांशी जोडण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहेत. या जोडणीमुळे दोन्ही देशांमध्ये सीमापार आर्थिक व्यवहार सुरळीतपणे करण्याची सोय होईल. या सुविधेमुळे युएईमध्ये स्थायिक झालेल्या 3 दशलक्षांहून अधिक भारतीयांना युपीआय आणि एएएनआयच्या सोयीचा वापर करून वास्तव वेळेत भारतात पैसे पाठवणे शक्य होईल कारण स्वतःच्या देशात पैसे पाठवण्याच्या प्रक्रियेत जलदगती, पारदर्शकता, सुलभता आणि किफायतशीरपण आणण्याच्या हेतूनेच ही नवी यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे.

या घडामोडीसह आता भारताशी रुपे प्रणाली सामायिक करणारा जीसीसी क्षेत्रातील युएई हा पहिलाच देश ठरला आहे. जयवान कार्डच्या कार्याची सुरुवात होणे हा या प्रकल्पाचा पूर्ण झालेला पहिला टप्पा आहे. 

युएईमधील पीओएस यंत्रांमध्ये रुपे कार्ड्स स्वीकारली जाण्याच्या बाबतीत देखील लक्षणीय प्रगती साध्य झाली आहे. युएईच्या बाजारांमध्ये देखील युपीआयची स्वीकारार्हता विस्तारण्यात येत असून युएईला दरवर्षी भेट देणाऱ्या 6 दशलक्ष भारतीय पर्यटकांची सोय करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2062952) Visitor Counter : 14


Read this release in: English