आयुष मंत्रालय
आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल शिखर परिषदेचे केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रतापराव जाधव यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन
Posted On:
30 SEP 2024 8:50PM by PIB Mumbai
मुंबई, 30 सप्टेंबर 2024
'ग्लोबल सिनर्जी इन आयुष : ट्रान्सफॉर्मिंग हेल्थ अँड वेलनेस थ्रू मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल' या संकल्पनेवरील आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल शिखर परिषद 2024चे आज मुंबईत उद्घाटन झाले. केंद्रीय आयुष(स्वतंत्र कार्यभार), आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने, पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि प्रमुख भागीदारांच्या सहकार्याने या शिखर परिषदेचे आयोजन केले आहे.
परिषदेला संबोधित करताना प्रतापराव जाधव म्हणाले, "परदेशातील अधिकाधिक लोकांना आयुर्वेदिक उपचारांसाठी भारतात येणे शक्य व्हावे यासाठी आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल शिखर परिषद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आम्ही भारताचे नैसर्गिक सौंदर्य आणि इथे असलेल्या सर्वांगीण आरोग्य सेवा- आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी दरवर्षी हजारो आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करतात. सर्वसमावेशक आरोग्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कल्याण समाविष्ट करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. जी-20 अध्यक्षपद भूषवताना आम्ही आयुषला जागतिक स्तरावर स्थान दिले आहे, या पद्धती देशभरातील विविध आरोग्य सेवा प्रणाली आणि संस्थांमध्ये समाविष्ट केल्या आहेत."
आयुष मंत्री पुढे म्हणाले की, "लोकांना अस्सल, अधिकृत आयुष सेवा अनुभवण्यात रस आहे, परंतु बऱ्याच वेळा असे आढळून येते की, एकतर त्यांना या सेवांची माहिती नसते किंवा त्यांना या सेवांमध्ये प्रवेश मिळत नाही. मात्र अशा प्रकारच्या परिषदांमुळे सेतू तयार होण्यास मदत मिळते आणि आरोग्यविषयक पारंपरिक उपचारांना बळकटी मिळते. असे उपचार सर्वांना परवडण्यासारखे, सर्वांपर्यंत पोहोचण्यासारखे असतात. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री जाधव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या त्यांच्या संभाषणाचा उल्लेख करून म्हणाले की, महाराष्ट्रात आयुष मंत्रालय आणि आयुष विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री शिंदे यांनी मांडला आहे.
प्रतापराव जाधव म्हणाले,"आयुष मंत्रालयाला येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात आयुर्वेदाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण कामे करायची आहेत. राज्यात अनेक नवीन आयुर्वेदिक महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून पदव्युत्तर जागांसह अनेक आयुर्वेदिक महाविद्यालयांमधील जागा वाढविण्यात आल्याचे जाधव म्हणाले. आरोग्यसेवा पुरवणा-या पहिल्या आयुष जनऔषधी केंद्राचे उद्घाटन येत्या 9 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याचे मंत्री जाधव यांनी सांगितले.
* * *
S.Kane/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2060461)
Visitor Counter : 39